विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 4 November 2021

देवासच्या पवारांचा इतिहास (थोरली पाती) भाग ५

 


देवासच्या पवारांचा इतिहास (थोरली पाती)
भाग ५
पोस्तसांभार ::
महेश पवार
राजे धार पवार युवा सामाजिक प्रतिष्ठान
वसईची मोहीम- तुकोजीराव पवारांचा पराक्रम.
इसवी सन १५३० पासून वसई प्रांत पोर्तुगिजांनी काबीज केला होता. त्यांनी हिंदू लोकांना बाटवून धर्मपरिवर्तन,हिंदुचे देवालये नष्ट करणे , ख्रिस्तीधर्माचा प्रसार करणे असे उद्योग चालवले होते.
इ.स.१७३८ च्या नोव्हेंबर महिन्यात वसईची मोहीम हाती घेण्यात आली. या संग्रामात राणोजी शिंदे ,मल्हारराव होळकर, तुकोजीराव पवार , यशवंतराव पवार , राणोजी भोसले ,पिलाजी जाधव , आंग्रे , बांडे वगैरे नामांकित सरदार चिमाजीअप्पांच्या नेतृत्वात लढण्यासाठी दाखल झाले .
या मोहिमेत ठाणे, माहीम ,तारापूर,धारावी, वसई या ठिकाणी झालेल्या लढाया महत्त्वाच्या होत्या. 30 डिसेंबर १७३८ रोजी मराठा फौजांनी माहीमच्या कसब्यात प्रवेश केला आणि किल्ल्याला वेढा घातला किल्ल्याचा किल्लेदार अॅन्टोनिये दिमेलो हा अधिकारी होता. मराठ्यांनी किल्ल्यावर रात्रंदिवस तोफांचा मारा सुरु केला , शिवाय सुरुंग लावून तट व बुरूज पाडून किल्ल्यात घुसण्याचा मार्ग तयार केला; तेव्हा दिनांक ९ जानेवारी १७३९ रोजी पोर्तुगिजांनी किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन केला. त्यानंतर मराठ्यांनी केळंबे व शिरगाव ही ठाणी जिंकून घेतली, पुढे तारापूर या बळकट ठाण्यास वेढा दिला. २४ जानेवारीला सुरुंगाने किल्ल्यास खिंडारे पडताच मराठ्यांनी किल्ल्यात प्रवेश करून तारापूरचा किल्ला ताब्यात घेतला. पोर्तुगीजांचे ४००० सैन्य व ५०० घोडे मराठ्यांच्या हाती लागली.या लढाईत किल्लेदार ल्युईस व्हेलेझो हा मरण पावला.
माहीम व तारापूरचा किल्ला काबीज करताना मराठ्यांनी जे हल्ले केले त्यात आणि पोर्तुगीजांनी जे प्रतिहल्ले केले ते परतवण्यात तुकोजीराव पवारांनी पराक्रमाची शर्थ केली. पोर्तुगिजांच्या तोफांचा व बरकंदाजीचा मारा चालू असतांना तुकोजीराव पवार यांनी आपली फौज व निशान बरोबर घेऊन इतर मराठे सरदार हल्ला करण्यास तयार झाले आहे की नाही हे न पाहताच पोर्तुगीजांवर तुटून पडले. या युद्धात तुकोजीरावांच्या अंगी असलेले अचाट साहस, अतुलनीय पराक्रम आणि रणांगणात लढण्याचा अव्दितिय उत्साह हे गुण प्रकर्षाने जाणवले .
चिमाजीअप्पांनी ह्या घटने विषयी लिहिलेल्या बातमीपत्रात अभिमानाने उल्लेख केला आहे की ; " सारे झुंज नजरेस पडले, सारे नामांकित लोक बरे वजनें चालून गेले ." " बाजी भीवराव , रामचंद्र हरी, यशवंतराव पवार आणि तुकोजीराव पवार हे आपापले ध्वज घेऊन ' तु आधी कि मी आधी ' अशा स्पर्धेने व इभ्रतिने एकदम किल्ल्याकडे धावले.
त्यानंतर चिमाजीअप्पांनी धारावी जिंकण्याचे काम तुकोजीराव पवार , खंडोजी मानकर ,तुबाजी अनंत व रामाजी महादेव यांच्यावर सोपवले. या सरदारांनी मोठा पराक्रम गाजवून ६ मार्च १७३९ रोजी धारावी काबीज केले.तुकोजीराव पवारांच्या पराक्रमाबद्दल व यशाबद्दल हजर असलेल्या एका मातब्बर सरदाराने चिमाजी अप्पांना पुढील प्रमाणे पत्र लिहिले , "तुकोजी पवार यांनी धारावी चा कोट काबीज करण्यात चाकरी उत्तम रबेसीने केली आहे. यांस बक्षीस उत्तम दिले पाहिजे, वरकड वर्तमान जबानी तुकोजी पवार सांगता विदित होईल."
धारावी किल्ला काबीज केल्यानंतर आत सापडलेल्या मालाची मोजदाद करून यादी केली गेली, त्यात ८ तोफा ,१ फुटकी तोफ , २ गरनाळे व दारू आणि गोळे या वस्तू नमूद केल्या .
देवास(थोरली पाती)च्या शिलेखान्यात या तोफांपैकी एक तोफ आहे !ती तोफ आजही तुकोजीराव पवारांच्या पराक्रमाची साक्ष देते.
महेश पवार
संदर्भ :- पवार घराण्याचा इतिहास.
लेखक :- मा.वि.गुजर

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...