विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 4 November 2021

देवासच्या पवारांचा इतिहास (थोरली पाती) भाग ४

 


देवासच्या पवारांचा इतिहास (थोरली पाती)
भाग ४
पोस्तसांभार ::
महेश पवार
राजे धार पवार युवा सामाजिक प्रतिष्ठान
तुकोजीराव यांचे मुख्य दिसून येणारे गुण म्हणजे स्वामिनीष्ठा,स्वार्थत्याग कर्तुत्वशक्ती व शौर्य हे होते. मराठा साम्राज्याची टोलेजंग इमारत उभारणीचे कामी अव्दितीय पराक्रम गाजवणाऱ्या मराठे सरदारांमध्ये तुकोजीरावांचे स्थान मानाचे आहे.
तुकोजीरावांना छत्रपती शाहू महाराजांनी सन १७१६ मध्ये सेनापंचसस्री हा किताब दिला. पवार घराण्याला छत्रपतींच्या घराण्याकडून मिळालेले इतर सन्मानदर्शक किताब खालीलप्रमाणे
(१) सेनापंचसहस्त्री २)सेनासप्तसहस्त्री ३)सेनाबारासहस्त्री ४) सेनासुभा (सेनापती हुद्दा) ५) सेनाधुरंदर (सेनापती) ६) शाह आमत आवलीपन्हा.)
पुढे सन १७१८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर जी मोहीम काढली होती त्या निवडक मराठे सरदारांमध्ये तुकोजीराव हे आपल्या फौजेसह होते.
अलाहाबादचा मुघल सुभेदार महंमदखान बंगश याने छत्रसाल बुंदेला वर आक्रमण केले, जैतापूरचा किल्ला बुंदेला कडून महंमदखानाने जिंकून घेतला तेव्हा छत्रसाल बुंदेले यांनी महंमदखाना विरुद्ध मराठ्यांना मदत मागितली. सन १७२९ मध्ये मराठे व बुंदेला यांची मोहम्मद खानाचा मुलगा कायम खान याच्याशी लढाई झाली , या लढाईत कायमखानाचा पराभव होऊन तो मारला गेला. महंमदखानाने जैतापुरच्या किल्ल्याचा आश्रय घेतला.त्याला मराठ्यांनी वेढा घालून त्याच्या लष्कराची रसद बंद केली ; तेव्हा नाईलाजाने महंमदखानास हार मानावी लागली.या मोहिमेत तुकोजीराव पवार यांनी विलक्षण शौर्य दाखवले व अदभूत पराक्रम केला. छत्रपती शाहू महाराजांनी तुकोजीराव पवार यांना सातारा येथे बोलावून घेतले व दरबारात जरीपटका, चौघडा व एक हत्ती देऊन त्यांचा गौरव केला.
जरीपटक्याचा हा बहुमान मिळावे ही गोष्ट पवारवंशास नक्कीच भूषणावह आहे.
( पुढे धारचे राजे पानिपतवीर श्रीमंत यशवंतराव पवार यांना श्रीरंगपट्टनच्या स्वारीत व उदगीरच्या लढाईत मोठा पराक्रम केला म्हणून त्यांनाही जरीपटका चा बहुमान देण्यात आला होता.)
सन १७३२ मध्ये बादशहाने सवाई जयसिंग यास माळव्याच्या सुभेदार नेमले, माळव्यातून मराठ्यांना काढण्यासाठी रुपये वीस लक्ष देऊन हल्ला करण्यासाठी पाठवले.तेव्हा मराठे व जयसिंग यांचे युद्ध होऊन जयसिंगाने मराठ्यांशी तह करून सहा लाख रुपये रोख व सुरतच्या २८ परगण्यांची खंडणी मराठ्यांना दिली. या लढाईत तुकोजीराव, कृष्णाजी पवार विश्वासराव ,उदाजीराव पवार यांनी मोठा पराक्रम गाजवला होता.सन १७३४ मध्ये मराठ्यांच्या फौजांनी माळवा व राजपुताना ह्या भागांवर स्वारी करण्यासाठी कूच केले, या स्वारीत तुकोजीराव पवार व जिवाजीराव पवार हे मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे यांच्याबरोबर होते. मराठ्यांना रोखण्यासाठी मीरबक्षी खानडौरान दिल्लीवरून निघाला त्याला वाटेत सवाई जयसिंग जोधपूरचा राजा अभयसिंग व कट्याचा दुर्जनसिंग सामील झाले; तेव्हा खानाचे सैन्य तब्बल दोन लाख एवढे होते.सन १७३५ च्या फेब्रुवारीत खानाची गाठ मुकुंदरा खिंड ओलांडून रामपूरा येथे शिंदे, होळकर व पवार यांच्याशी पडली, मराठ्यांनी मुघल फौजेस वेढा घालून त्यांची रसद बंद केली.हत्ती-घोडे लुटले . मराठे पुढे राजपुतान्यात शिरले , मराठ्यांनी जयपूर, जोधपूरचा मुलूख लुटला. दिनांक २८/२/१७३५ ला संपन्न असे सांबर शहर मराठ्यांनी लुटले.मराठे राजपूतान्यात शिरले हे खानडौराच्या मदतीला आलेल्या रजपुत संस्थानिकांना कळताच त्यांचा धीर सुटला व ते आपल्या मुलखाच्या रक्षणासाठी परत फिरले.नाईलाजाने खानडौरानने मराठ्यांशी तह करून माळव्याचा चौथाईबद्दल दरसाल 22 लक्ष रुपये देण्याचे कबूल केले, या लढाईत तुकोजीराव पवार व जिवाजीराव पवार यांनी गनिमी काव्याने लढुन खानाच्या सैन्यास चांगलेच बेजार केले होते.
महेश पवार.

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...