विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 15 December 2021

#आमच्या_घराण्यात_मोगलांवर_कोणीच_विश्वास_ठेवला_नाही...

 


गोष्ट आहे साधारणपणे १७२७-२८ मधली. मूळ मोगल पातशाहीतून फुटून दक्षिणेत स्थिरावलेल्या निजाम उल्क मुल्क ने आता मराठ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली होती. अशातच छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात करवीरकर छत्रपती संभाजी महाराजांनी बंड पुकारले आणि त्याचा फायदा निजामाने घेतला. पुढे १७२८ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी पेशवा बाजीराव बल्लाळ यांना निजामावर पाठवून त्यास वठणीवर आणले. सुप्रसिद्ध पालखेड मोहीम ती हीच आणि मुंगी शेवगावचा तह करुन निजामाने छत्रपती शाहू महाराजांना मोगलांच्या दक्षिणेतील सहा सुभ्यातून चौथाई आणि सरदेशमुखी चे हक्क वसूल करण्याला येथून पुढे कोणतीही हरकत घेतली नाही.
याच दरम्यान छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या काकी राजसबाईंना ( छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी व करवीरकर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री) मोठे नमुनेदार पत्र लिहिले. पत्रात छत्रपती शाहू महाराज म्हटतायत की बाबाजी म्हणजे करवीरकर छत्रपती संभाजी महाराजांना चंद्रसेन जाधव यांच्यामार्फत निजामाला भेटायचे होते. मोगल हे नेहमीच वरचढ होण्यासाठी आणि आपला स्वार्थ हेतू साध्य करण्यासाठी अशा संधीची वाट पाहत असतात. मी त्यांना पुरेपूर ओळखतो. या गोष्टीचा शेवट वाईट होईल हे जाणून यात पुरेपूर कपट भरलेले आहे ते मी आपल्या नजरेला आणतो. दगलबाजी होईल यात शंका नाही. आमच्या घराण्यापैकी मोगलांवर कोणीच विश्वास ठेवला नाही असं असता ही भेट का घडून यावी? चंद्रसेन जाधव एक दगलबाज मनुष्य आहे. आपल्या वडिलांचा (धनाजी जाधव) सल्ला न मानता तो आम्हास सोडून मोगलांना जाऊन मिळाला.
अटकेपार मराठ्यांचे झेंडे लावले जावेत हे स्वप्न दाखवणार्या छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या युगप्रवर्तक आजोबांचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य नर्मदोत्तर ते रामेश्वर पर्यंत वाढवले. छत्रपती शाहू महाराज मोठे गुणग्राहक होते त्यांनी नवीन माणसं आपल्या राज्यासाठी तयार केली मग ते पेशवा बाळाजी विश्वनाथ, बाजीराव बल्लाळ, कान्होजी आंग्रे, सेखोजी आंग्रे, पिलाजी जाधवराव, विठ्ठल शिवदेव विंचूरकर, कान्होजी भोसले, रघुजी भोसले, खंडेराव दाभाडे, त्रंबकराव दाभाडे असोत की चिमाजी आप्पा, बाजी रेठरेकर, पुरंदरे मंडळी, खंडो बल्लाळ चिटणीस, फत्तेसिंग भोसले, श्रीपतराव पंतप्रतिनिधी, नारोराम मंत्री असोत, की नानासाहेब पेशवे असोत. अशी अजून कितीतरी नावं सांगता येतील. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात सातारा शहराचे नाव अख्ख्या हिंदुस्थान मध्ये मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखले जात होते. त्याच्या वैभवाचा कळसाध्याय हा छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत घडून आला. १७०८-१७४९ अशी प्रदीर्घ कारकीर्द छत्रपती शाहू महाराजांची होती. मराठी साम्राज्याच्या वैभवाची इमारत ही छत्रपती शाहू महाराजांच्या काळात उभारली गेली.
आज पुण्यश्लोक राजा शाहूछत्रपती महाराजांची ज्युलियन तारखेनुसार पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने त्यांना शतशः नमन आणि त्रिवार मुजरा 🙏🙏🙏💐🚩
- अतुल तळाशीकर
पत्रासाठी संदर्भ - ताराबाई पेपर्स फारसी खंड - डॉ अप्पासाहेब पवार
भटकंती व इतिहास विषयक लेखांसाठी आमचे whats app ग्रुप नक्की जॉईन करा..!

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...