विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 15 December 2021

*छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मगाव ....मौजे गांगवली*

 


*छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मगाव ....मौजे गांगवली*
" आशिया खंडातील सर्वोत्तम प्रशासक " असं परकीय इतिहासकारांनी गौरवलेल्या छत्रपती शाहू महाराजांचा जन्म ज्या पावन पवित्र भूमीत झाला ते गाव म्हणजे गांगवली.....बखरकार या गावाचा उल्लेख " गांगोली" करताना दिसून येतो......राजधानी रायगड रस्त्यावरील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं गाव......कुंभारवाडी ,तोंडलेकरवाडी , खरबाचीवाडी, मोकाशीवाडी , आणि बौध्दवाडी अशा पूर्वापार पाच वाड्या आहेत......
महाराणी येसूबाईंच्या मामांचा म्हणजेच जाधवांचा भव्य वाडा इथल्या वैजनाथ मंदीराशेजारी होता..... आईच्या माहेरची मंडळी जवळच राहत असल्याने रायगडावरून येसूबाई बाळंतपणासाठी गांगोलीमध्ये आल्या.....आणि शके 1604 , दुदुंभी संवत्सर वैशाख वद्य सप्तमी वार गुरूवार फिरंगी दिनांक 18 मे 1682 रोजी याच गांगवलीतल्या वाड्यामध्ये हिंदवी स्वराज्याच्या चौथ्या छत्रपतींनी पहिला श्वास घेतला......
संपूर्ण लाकडी बांधकाम असलेल्या या वाड्यात त्याच पावसाळ्यातील दोन महिने छत्रपती संभाजी महाराज, जोत्याजी केसरकर , रायाप्पा , कवी कलश हे सर्वजण मुक्कामास होती.......याच मुक्कामात जगदगुरू तुकोबारायांचे चिरंजीव महादजी महाराजांची महत्वपूर्ण भेट छत्रपती संभाजी राजांसोबत झाली......इथल्या वैजनाथ मंदिराच्या पायरीवर बसून झालेल्या चर्चेनुसार, देहू ते पंढरपूरला जाणारी आषाढी एकादशीचा पालखी सोहळा सुरू करण्याचे तसेच मोगली सैन्याकडून पालखीवर होणार्या हल्ल्यापासून संरक्षण देण्याचे आश्वासन दिले.....
गांगवली गावात मूळ वस्ती कांगणे आणि घाग कुटुंबाची......कालांतराने कांगणे यांनी त्यांचे भाचे तेंडली गावचे तोंडलेकरांना वास्तव्यासाठी आणले....त्यानंतर कुले , बाईत या घराण्याची कुटुंबंही स्थायिक झाली......या गावचे ग्रामदैवत जागृत देवस्थान कालिका मातेचे वंशपरंपरागत पहारेकरी गांगोलकर यांचे आडनावावरून " गांगोली " हे नाव पडल्याचे जाणकार सांगतात.
गांगवलीतील या पाच वाड्यांमध्ये कांगणे , घाग , तोंडलेकर, दाखिणकर, जाधव , शिंदे , कुळे , बाईत , कदम , हुजरे , खरस , दपके , येलमकर तसेच बारा बलुतेदारांची वस्ती आढळते......या पाच वाड्यांमध्ये कुणबी , मराठा , कुंभार , नाभिक , बौध्द , धनगर , आदिवासी असा बहुजन समाज कालपरत्वे स्थिरावलेला दिसून येतो......
याच गावामध्ये कवी कलश आणि मोगली सरदार शहाबुद्दीन खानामध्ये घनघोर युद्ध होऊन खानाला इथून पिटाळून लावल्याचा उल्लेख कागदपत्रांमध्ये सापडतो.....संपूर्ण गावच शिवकालीन खेडं असल्याने, मराठेशाहीतल्या खुणा जागोजागी आढळतात....पोलिस पाटील समीर तोंडलेकर यांच्या जमीनीत असलेल्या तत्कालीन दारूगोळा कारखानाचे अवशेष , शांताराम तोंडलेकरांच्या शेतातील शिवकालीन तलाव , विष्णू दाखिणकरांच्या ताब्यातील पेठेचा माळ ( कदाचित इथं पूर्वीची बाजारपेठ असावी ).....पहारेकरींची रहाट तसेच जुन्या घरठाणांच्या खाणाखुणा दिसत असलेली घागांची वाडी यावरून गावाचं तत्कालीन रूप नजरेस भरतं.......वैजनाथ मंदिराच्या पूर्वेला रस्त्यालगत पडलेल्या असंख्य वीरगळ, सतीशिळा , एक शिवपिंडी गांगवलीचा किमान 800 वर्षांपूर्वीचा शिलाहारकालीन अस्तित्वाचा पुरावा दर्शवतात.....
ज्या वाड्यात छत्रपती शाहूंचा जन्म झाला त्या वाड्याच्या जोत्याचे अवशेष चाळीस वर्षांपूर्वीपर्यत होते. ...परंतु 1980 मध्ये तत्कालीन जि.प. अध्यक्ष पी.एन.पाटील यांच्या कारकीर्दीत, पंचायत समिती सभापती रा.ग.शिंदे यांनी याच ऐतिहासिक वारसा असलेल्या वाड्यावरच प्राथमिक आरोग्य केंद्र बांधलं.....आणि जो मान शिवनेरीला , पुरंदरला , राजगडाला तोच मान ज्या वास्तूला मिळाला असता तो पायाच उध्वस्त झाला......किती दुर्दैव .......वाड्याचे मोठमोठे कोरीव दगड आरोग्य केंद्राच्या जोत्यामध्ये वापरले गेले......इतिहास पुसला गेला.....आमचं दुर्दैव.....
महाशिवरात्रीला इथं अख्ख्या माणगाव तालुक्यातून भाविक येत असतात.....तोंडलेकर यांनी दाखणे गावावरून दाखिणकर कुटुंबाला वैजनाथाच्या पूजेसाठी आणल्याचे बोललं जातं.......तेव्हापासून आजतागायत पूजेचा मान दाखिणकर कुटुंबाकडेच आहे......इथल्या देवस्थानात दिवाबत्तीची सोय निरंतर चालू राहावी यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी तोंडलेकर कुटुंबांना दिलेली 11 खंडीची जमीन त्यांनी दाखिणकरांना कसण्यासाठी दिली ...याबाबतची सनद असल्याचा उल्लेख वयस्कर कुंभार करतात......दुर्दैवाने म्हणा किंवा कोकणी माणसाच्या भोळेपणाने काही वर्षांपूर्वी ही सनद कुणीतरी इतिहासकार घेऊन गेला.......जी सनद परत मिळालीच नाही.....
चिपळूण दसपटी परिसरातून स्थलांतरित झालेले शिंदे मोकाशी यांचेकडे ब्रिटिश कालखंडात फौजदारकी होती.......तब्बल 105 व्या वर्षी सुध्दा वैजनाथाची अखंडीत सेवा करणारे कै.रामचंद्र बाबाजी दाखिणकर , आखिल भारतीय सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष आणि सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राजेशभाऊ दाखिणकर याच गावचे सुपुत्र......
गर्द वनराई , संथ वाहणारी वैपूर्णा नदी , प्रशस्त घाट , झुळझुळणारा वारा आणि इथला अस्ताला जाणारा सूर्य असं भारवलेलं वातावरण पाहिल्यानंतर आजपर्यंत वैजनाथ मंदिर परिसराला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला नाही याची खंत वाटते.....
खरबाचीवाडी येथील नव्याने उभारलेली छत्रपती शिवरायांची सिंहासनाधिष्ठीत मूर्ती , कुंभारवाडीतलं संत गोरोबा काकांचं मंदिर ,साजेरी देवीचं जागृत स्थान , हनुमंतरायाचं देखणं शिल्प , हे सारं पाहण्यासाठी एकदातरी गांगवलीला जायलाच पाहिजे.....कवी कलश आणि शहाबुद्दीनचं युध्द झालेली युध्दभूमी शोधलीच पाहिजे......कधीतरी वैजनाथच्या पायरीवर कोरलेली " पांडव परिक्रमा " या शब्दांकडे कौतुकानं निरखून पाहिलंच पाहिजे....
अशी ही आमची ऐतिहासिक गांगवली.....
*शब्दांकन - श्री.रामजी कदम*
*बोरवाडी माणगाव रायगड*

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...