विनोद जाधव एक संग्राहक

Friday 25 March 2022

महारठी आणि महाराष्ट्र

 



महारठी
आणि महाराष्ट्र
पोस्तसांभार :: ओंकार ताम्हनकर
महारठी हा शब्द महाराष्ट्रातील नाणेघाट, कार्ले, बेडसा, कान्हेरी या लेणी समूहातील लेखात आढळतो. तसेच महारठी हा शब्द कोरलेली नाणी सुद्धा सापडली आहेत.
महारठी (महारथी) हा शब्द २ शब्दांचे एकत्रिकरण आहे. महारठी/रथी. राष्ट्रीय/राष्ट्रिक - रठीक - रठी असा या शब्दाचा प्रवास आहे.
सातवाहनांच्या पूर्वीचा महारठी -
चंद्रगुप्त मौर्य, अशोक यांच्या लेखांमध्ये राष्ट्रीय हा शब्द एखाद्या प्रादेशिक विभागाचा प्रमुख या अर्थाने आलेला दिसतो. उदाहरणार्थ, रुद्रदामनाचा जुनागड लेखानुसार चंद्रगुप्ताने पुष्यगुप्त याची नेमणूक 'राष्टीय' या पदावर केली होती.
या राष्ट्रीय शब्दावरून रठी आणि महारठी असा शब्द तयार झाला असावा असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
सातवाहन काळ
बौद्ध लेण्यांतील शिलालेखांवरून असे दिसून येते की पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांचा प्रदेश, कोकण आणि देशाचा काही भाग यावर या महारठींची सत्ता होती.
सातवाहन काळात सुद्धा महाराष्ट्रात महारठी होते हे सातवाहन राजा सिरी/श्री सातकर्णीची पत्नी नागनिका/नायनिका हिच्या नाणेघाटातील शिलालेखातून कळते. नागनिका ही महारठी त्रणकयिर याच्या कुलातील होती असा उल्लेख आहे. तसेच आपल्याला हे ही माहीत आहे की ती कयलाळ नामक महारठी ची पुत्री होती.
यावरून सातवाहन काळात हे महारठी/महारथी सातवाहन राजसत्तेच्या अंतर्गत शासनव्यवस्था चालवत होते हे दिसून येते.
कार्ले लेण्यांतील उल्लेख
  1. कार्ले येथील लेण्यांमध्ये दान लेखात अशाच गोतीपुत्र महारठी अगीमित्रणक याचा उल्लेख आला आहे. त्याने सिंहस्तंभासाठी देणग्या दिल्या होत्या.
  2. राजा वाशिष्ठीपुत्र स्वामी पुळुमावि याच्या राज्यकाळात महारठी कौशिकीपुत्र मित्रदेवाच्या मुलाने म्हणजे महारठी वाशिष्ठीपुत्र सोमदेव याने लेण्यांतील संघाला कर,उपकर यांसाहित गावाला देय(रोख रक्कम) व मेय(धान्य) दिले, असा उल्लेख आला आहे.
तात्पर्य
या नाणेघाट व कार्ले येथील उल्लेखांवरून काही गोष्टी सिद्ध होतात.
१. महारठी एक मोठं पद होतं.
२. या पदावर असलेली माणसे धनाढ्य किंवा नावाजलेली होती. शासन व्यवस्था पाहणारी होती.
३. महारठी हे पद पिढ्यांपिढया दिलं जात होतं.
अतिरिक्त
महारठी वरून महाराष्ट्र अशा लावला जाणाऱ्या तर्काबाबत.
हल्ली महाराष्ट्र हे नाव महारठी किंवा मरहट्टी वरून आलं आहे असा तर्क लावला जातो. मुळात हा तर्कच चुकीचा आहे. महाराष्ट्र या नावाचे उल्लेख अगदी महारठीच्या काळापासून मिळतात. त्यातील काही महत्त्वाचे उल्लेख पुढील प्रमाणे,
  • महारठी हे शब्द ज्या काळात प्रचलित होते त्याच्याच जवळपासच्या काळात दिपवंसो, महावंसो या बौद्ध धर्मग्रंथांमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख मिळतो. महाराष्ट्र या देशात बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी महाधम्मरखित हा भिक्खू पाठवण्याचा उल्लेख आहे.
  • वररुचिने रचलेल्या प्राकृत भाषेच्या ग्रंथात भाषेचे नाव माहाराष्ट्री असे दिले आहे. यावरून महाराष्ट्रामध्ये बोलली जाणारी भाषा म्हणजे माहाराष्ट्री असा तर्क लागतो.
  • चालुक्य सम्राट द्वितीय पुलकेशी याच्या एहोळे येथील प्रशस्तीलेखात त्याच्या अधिपत्याखाली जे प्रदेश होते त्यात 'त्रिमहाराष्ट्र' आणि त्यातील ९९००० गावे' असा उल्लेख आला आहे.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...