विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 19 February 2023

#गोपाळआष्टीची_लढाई (२० फेब्रुवारी १८१८)

 

#गोपाळआष्टीची_लढाई (२० फेब्रुवारी १८१८)
मोहोळ तालुक्यातील गोपाळआष्टीची लढाई ही मराठेशाहीच्या अस्ताच्या संदर्भातील महत्वाच्या लढायांपैकी एक आहे. इंग्रज सेनानी कॅप्टन स्मिथच्या फौजेशी झालेल्या या लढाईत सेनापती बापु गोखले यांच्यासह गोविंदराव घोरपडे, बहिरजी शितोळे, आनंदराव पवार आणि बाबर यांना वीरमरण आले.
पेशवे बाजीराव दुसरे येथून वऱ्हाड चांद्याकडे निघुन गेले. पुढे आवढ्या नागनाथ येथे १० एप्रिल १८१८ रोजी इंग्रज सेनानी कॅप्टन ॲडम्सने पुन्हां एकदा पेशवे दुसरे बाजीराव यांचा पराभव केला. त्यानंतर ३ मे १८१८ रोजी पेशवे दुसरे बाजीराव यांनी धुळकोट येथे इंग्रज सेनानी माल्कमपुढे पुढे पूर्ण शरणागती पत्करली. माल्कमने पुढे सहाशे स्वार आणि दोनशे पायदळासह पेशवे दुसरे बाजीराव यांना कायमचे ब्रम्हावर्तास पाठवुन दिले.
छत्रपति प्रतापसिंह गोपाळ आष्टीच्या लढाईत पेशव्यांसह फौजेत होते. पेशवे दुसरे बाजीराव त्यावेळी वऱ्हाड चांद्याकडे गेले परंतु छत्रपति प्रतापसिंह कुटुंबासह इंग्रजांच्या ताब्यात गेले. इंग्रजांनी त्यांना घेऊन पुरंदर जवळ भिवडी येथे ९ मार्च १८१८ रोजी तळ दिला. दोन दिवसांत इंग्रजांनी दुर्ग पुरंदरला वेढा घातला आणि पुढे काही दिवसांत किल्लेदार आबा पुरंदरे यांच्याकडून दुर्ग पुरंदर लढून घेतला. इंग्रजांनी यावेळी सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि येथील जनतेच्या मनातील इंग्रजांच्या बद्दलचा द्वेष कमी होण्यासाठी धुर्त चाल खेळली. इंग्रजांनी छत्रपति प्रतापसिंह यांना पूर्ण सन्मानपूर्वक सातारा येथे नेले आणि त्यांनी तेथे छत्रपतींना गादीवर बसवले. पण लवकरच पुढील काळात इंग्रजांनी छत्रपति प्रतापसिंह यांना पदच्युत करून ( सप्टेंबर १८३९) ब्रम्हवर्तास पाठवले.
१६ नोव्हेंबर १८१७ च्या येरवड्याच्या लढाईपासून ते ३ मे १८१८ च्या पर्यंतच्या पेशवे बाजीराव दुसरे यांच्या धुळकोट येथील शरणागती पर्यंत पेशवे बाजीराव दुसरे पुढे आणि इंग्रज मागे असा लढाईचा एकुण रागरंग होता. या दरम्यान पेशव्यांकडील मराठा फौज आणि इंग्रज यांच्यात अनेक ठिकाणी चकमकी आणि लढाया झाल्या. यामध्ये गोपाळ आष्टीची लढाई सर्वात जास्त महत्वाची आहे. या लढाईत सेनापती बापु गोखले यांना वीर मरण आले. मराठा फौजेत असणारे छत्रपति इंग्रजांच्या ताब्यात गेले. या दरम्यानच इंग्रजांनी होळकर शिंदे भोसले यांना उत्तर बाजूला गुंतवुन ठेवले होते. त्यांचा आणि पेशव्यांकडील फौजेचा मेळ बसणार नाही याची इंग्रजांनी पूर्ण काळजी घेतली. याचदरम्यान इंग्रजांनी दुर्ग सिंहगड, दुर्ग अजिंक्यतारा (११ फेब्रुवारी १८१८) दुर्ग चाकण (२५ फेब्रुवारी १८१८) दुर्ग रायगड (०७ मे १८१८) हेही जिंकुन घेतले.
२० फेब्रुवारी १८१८ रोजी गोपाळ आष्टीच्या लढाईत वीर मरण आलेल्या सेनापती बापु गोखले यांच्यासह अन्य वीरांच्या समाध्या युध्द स्थळावर होत्या. इंग्रजांनी तेथे १८७६ ते १८८१ दरम्यान हजार एकरांचा तलाव निर्माण केला त्यात त्या सर्व समाध्या पाण्याखाली गेल्या.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...