लेखन ::सतीश राजगुरे
छ्त्रपती
शिवाजी महाराज यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हिंदवी स्वराज्य स्थापन
केले. हतबल झालेल्या प्रजेमध्ये नवे चैतन्य निर्माण केले. गुणी लोकांना जवळ
केले. मोगल, आदिलशाही तसेच स्वकीय शत्रू यांना तोंड देत स्वराज्याची
निर्मिती केली.
याकरिता
महाराष्ट्रातील अनेक मातब्बर सरदार महाराजांनी जोडले. प्रसंगी संबंध दृढ
होण्यासाठी काही विवाह करून त्यांच्यासोबत नातेसंबंधही जोडले. कारण
स्वराज्याच्या कामात मराठी घराणी एकत्र येणे खूप आवश्यक होते.
'गुणवंताबाई राणीसाहेब' ह्या छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या आठव्या पत्नी होत. शिवाजी महाराज यांचा गुणवंताबाई यांच्या बरोबर १५ एप्रिल १६५७ रोजी विवाह झाला.
जिजाऊ साहेबांबरोबर विदर्भातून जी घराणी आली होती, त्यामध्ये वऱ्हाडातील म्हणजे आताच्या 'बुलडाणा' जिल्ह्यातील 'चिखली' तालुक्यातील 'करवंड' येथील हे इंगळे-देशमुख घराणे होते. हे घराणे मूळ तंजावरचे, परंतु त्यांचे वतन वऱ्हाडात होते.
इंगळे घराण्यातील एक शाखा राजमाता जिजाऊ व छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या
समवेत महाराष्ट्रात आली होती. म्हणजे हे घराणे शहाजी राजांकडे राहात
होते.
शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांच्या पत्नी दीपंबाबाई या देखील इंगळे घराण्यातीलच होत्या. व्यंकोजी यांच्याकडे तंजावरला जहागिरी होती. कालांतराने करवंडचे इंगळे घराणे तामिळनाडूमधील तंजावर येथे स्थायिक झाले. पुढे व्यंकोजी आणि शिवाजी राजे यांच्यात वितुष्ट आल्यानंतर दीपंबाबाईने शिष्टाई करून सर्व व्यवस्थित केले होते. या घराण्याची वंशावळ उपलब्ध असून, त्यांचे वंशज हरीरुद्र इंगळे तंजावरला राहतात. त्यांची करवंड येथे ६० एकर शेती आहे.
१६४८
साली बेलसर येथे फतहखानाशी शिवरायांनी केलेल्या युद्धात शिवरायांच्या
विरांविषयी कवी परमानंद यांनी शिवभारतात उल्लेख केलेला आहे. यातील शिवाजी
इंगळे यांचा उल्लेख करून ते सांगतात की, "शिवाजी इंगळे यांनी शिरवळच्या
रणक्षेत्रावर मोठा पराक्रम करून पंचवीस लोक मारले होते!" याच शिवाजीराव इंगळे यांच्या गुणवंताबाई ह्या कन्या होत्या.
१५ एप्रिल १६५७ रोजी भोसल्यांशी सोयरिक होऊन गुणवंताबाई शिवरायांच्या पत्नी झाल्या, असा उल्लेख जेधे शकावलीमध्ये देखील आहे. आपल्या
माहेरकडील इंगळे घराणे फुटून मोगलांकडे जाऊ नये, म्हणून जिजाऊसाहेबांनी
इंगळे घराण्यातील लेक सून म्हणून घरात आणली. त्यांची ही खेळी यशस्वी झाली.
कारण पुढे इंगळे यांचा जमाव किल्ले राजगडावर छ्त्रपती शिवरायांच्या
देखरेखीखाली राहिला.
करवंड
येथील इंगळे घराण्यातील काताजी इंगळे-देशमुख प्रतापगडावर युद्ध प्रसंगी
शिवाजी महाराजांच्या दहा अंगरक्षकांपैकी एक होते. १६५९ मध्ये रायबागेच्या
रणांगणावर रुस्तुम-ए-जमान आणि अफझलखानाचा मुलगा फाजल यांच्याशी झालेल्या
युद्धात हिराजी इंगळे शिवरायांच्या घोडदळात होते.
किल्ले
पन्हाळगडावर बाळाजी इंगळे (मुद्राधारी), त्र्यंबक इंगळे (किल्लेदार) आणि
कान्होजी इंगळे यांनी इ.स. १६६२ ते १७०१ पर्यंत औरंगजेबास झुंजवत ठेऊन
अखेर तह करण्यास भाग पाडले. शिवपत्नी गुणवंताबाई राणीसाहेब ह्या
तोलामोलाच्या इंगळे सरदारांच्या कन्या होत्या. त्यांचा मृत्यू १६७० मध्ये
झाला.
आज शिवरायांच्या या सासुरवाडीतील अनेक ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
त्यातील बावन्न गावांच्या देशमुखीचे प्रतिक (गढी).

(चित्रस्त्रोत: दैनिक शिवस्वराज्य)
गढीपासून काही अंतरावर असलेले एक पुरातन समाधीस्थळ- हे इंगळे घराण्यातील एखाद्या व्यक्तीचे असावे, असे म्हणतात.
करवंड गावातील प्राचीन महादेव मंदिर-
(चित्रस्त्रोत: पोस्टबॉक्स इंडिया)
पूर्वी करवंड गावात ५२ बुरुज होते. त्यामुळे गावाला 'बावन्न बुरुजी' असेही
म्हणत. सध्या या बुरुजांचे अवशेष तेवढे दिसतात. गढीमध्ये प्रवेश
करण्यासाठी भव्य द्वार असून ५० फुटांपेक्षाही उंच असलेल्या येथील गढीची
सध्या पडझड होत आहे. गावाच्या वेशीवर असलेले दोन बुरुजही शेवटची घटका मोजत
आहेत.
त्याकाळात
दबदबा असलेल्या मोजक्या घराण्यांमध्ये 'करवंडचे इंगळे' (घराणे) समजले
जायचे. करवंडला जाज्वल्य असा इतिहास लाभला असूनही अनेक लोक या इतिहासापासून
अनभिज्ञ आहेत. अशाप्रकारे छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी या
गावाचे नाते जुळले आहे.
No comments:
Post a Comment