विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 27 May 2023

उत्तर मराठेशाहीतील एक मोठे प्रस्थ विश्वनाथ सदाशिव उर्फ बाबूजी नाईक-बारामतीकर जोशी भाग ३

 

उत्तर मराठेशाहीतील एक मोठे प्रस्थ
विश्वनाथ सदाशिव उर्फ बाबूजी नाईक-बारामतीकर जोशी
लेखन :प्रकाश लोणकर

भाग ३
२--नानासाहेब पेशवे आणि बाबूजी नाईक: थोरल्या बाजीरावांचे रावेरखेडी इथे एप्रिल १७४० मध्ये अकस्मात निधन झाले.त्यांच्या जागी पेशवेपदी कुणाची निवड करावी असा प्रश्न छ.शाहू महाराजांपुढे उभा राहिला.नागपूरकर रघुजी भोसले(प्रथम)तसेच अन्य काही मातब्बर मराठा सरदारांनी बाबूजी नाईकांना पंतप्रधान(पेशवे)पद द्यावे म्हणून छ.शाहू महाराजांकडे खटपट सुरु केली.पण छ.शाहू महाराजांनी बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेबांस पेशवा नियुक्त केले.पेशवेपदाची महत्वाकांक्षा फलद्रूप न झाल्याने बाबूजी नाईक बारामतीकर आणि भट पेशवे घराण्यातील संघर्षात तेल ओतले गेले.ह्यावेळी बाबूजी नाईक ४५ वर्षांचे तर नानासाहेब अवघ्या २० वर्षे वयाचे होते..मे १७४३ मध्ये छ.शाहू महाराजांनी बाबूजी नाईकांच्या गुजरातेतील पेशवे विरुद्ध गायकवाड वादातील कामगिरीबद्दल नानासाहेबांचा विरोध असून देखील पुणे परिसरातील २२ गावे आणि बारामती महालाची जहागीर बाबूजी नाईकांना इनाम दिली.बाबूजींचे वास्तव्य बारामती इथे सुरु झाल्याने त्यांना बारामतीकर नाईक जोशी संबोधले जाऊ लागले.पेशवे पद हुकल्याच्या रागातून बाबूजी नाईकांनी बाजीराव पेशव्यांच्या छत्तीस हजार रुपये थकीत कर्जाची नानासाहेबांकडे एक रकमी परतफेड करण्याचा तगादा सुरु केला.त्यासाठी त्यांनी शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाजासमोर आमरण उपोषण करण्यासाठी एका ब्राह्मणाला पण बसविले.ब्राह्मण हत्तेचे पातक नको असेल तर संपूर्ण थकीत रक्कम एकरकमी देण्याची बाबुजींनी मागणी केली.नानासाहेबांचे मुतालिक असलेल्या महादजीपंत पुरंदऱ्यानी आपले सर्व जडजवाहीर,देवघरातील सोन्याचांदीचे देव,सोन्याचांदीची उपकरणी अगदी शंख ठेवण्याची अडणी सुद्धा,विकून रातोरात छत्तीस हजार रुपयांची रक्कम उभारून बाबूजी नाईकांचे थकीत कर्ज फेडून नानासाहेबांवरील नामुष्की टाळली!.
३--रघुजी भोसल्यांनी कर्नाटक मोहिमातून आणलेली संपत्ती पाहून नानासाहेबांसहित बऱ्याच सरदारांचे कर्नाटक मामला आपणास मिळावा म्हणून प्रयत्न चालले होते.बाबूजी नाईक पण त्यासाठी इच्छुक होते.छ.शाहू महाराजांनी बाबूजी नाईकांची मागणी मान्य केली पण त्यात त्यांना अपयश आल्याने इ.स.१७४६ मध्ये कर्नाटकचा मामला छ.शाहू महाराजांनी नानासाहेबांना सोपविला.सदाशिवराव भाऊनी कर्नाटकातून बरीच खंडणी वसूल केली.त्याने बाबूजी आणखीनच चवताळले.नानासाहेब मोहिमांमध्ये गुंतलेले पाहून सातारा दरबारातील त्यांच्या बाबूजी नाईक बारामतीकर,रघुजी भोसले,प्रतिनिधी,आनंदराव सुमंत,गायकवाड आदी परंपरागत विरोधकांनी छ.शाहू महाराजांकडे नानासाहेबान विरुद्ध तक्रारी केल्या.छ.शाहू महाराजांनी नानासाहेब विरोधकांच्या तक्रारींवर विश्वास ठेवून ९ मार्च १७४७ रोजी नानासाहेबांस पेशवे पदावरून बडतर्फ केले.पण नानासाहेबांची जागा घेयील असा दुसरा कुणीही लायक सरदार दिसून न आल्याने छ.शाहू महाराजांनी सव्वा महिन्याने म्हणजे १३ एप्रिलला पुन्हा नानासाहेबांस पेशवे पदी नियुक्त केले .इ.स.१७४० ते १७५३ अशी तेरा वर्षे बाबूजी नाईकांनी पेशव्यांशी स्पर्धा,संघर्ष करण्यात घालवली.पेशव्यांची जिरवण्यासाठी ते ताराराणी यांच्या गटात पण काही काळ सामील झाले होते.एप्रिल १७५३ मध्ये त्यांनी नानासाहेबांबरोबर समजोता केला.राघोबा दादांबरोबर ते उत्तरेकडील मोहिमात पण सामील झाले.तिथे दादांशी न पटल्याने त्यांनी पिढीजात सावकारीच्या व्यवसायात अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली.याच सुमारास त्यांनी मोरोपंत पराडकर ह्या आर्यांसाठी( काव्य रचनेचा एक प्रकार) प्रसिद्ध पावलेल्या कवीस आश्रय दिला.नाईकांनी मोरोपंतांची पुराणिक पदावर नियुक्ती केली.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...