विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 27 May 2023

उत्तर मराठेशाहीतील एक मोठे प्रस्थ विश्वनाथ सदाशिव उर्फ बाबूजी नाईक-बारामतीकर जोशी भाग ४

 

उत्तर मराठेशाहीतील एक मोठे प्रस्थ
विश्वनाथ सदाशिव उर्फ बाबूजी नाईक-बारामतीकर जोशी
लेखन :प्रकाश लोणकर

भाग ४
सैनिकी बाण्यात उत्तम गती असलेल्या बाबुजींनी इ.स.१७५७ मध्ये निजामाकडून नळदुर्ग किल्ला काबीज केला,उदगीर मोहिमेत सदाशिवरावभाऊना उत्तम साथ दिली.त्यामुळे नानासाहेबांनी अहमदशहा अब्दाली विरुद्धच्या पानिपत मोहिमेत सदाशिवरावभाऊ बरोबर बाबूजी नाईकांना पण पाठविले होते.विश्वासराव आणि सदाशिवरावभाऊ युद्धात ठार झाल्याचे ऐकून अन्य काही मराठे सरदारांबरोबर बाबूजी नाईक पण दिल्लीच्या दिशेने पळते झाले.नानासाहेब पेशव्यांना पानिपत संग्रामाची हकीकत कळविण्याची कटू जबाबदारी बाबुजींनी घेतली होती.पानिपत युद्धानंतर अवघ्या सहा महिन्यांनी म्हणजे जून १७६१ मध्ये नानासाहेबांचे निधन झाले.नानासाहेबांच्या निधनानंतर पुण्यात उद्भवलेली दंगल काबूत आणण्यासाठी बाबूजी नाईकांनी सखारामबापू आणि राघोबा दादांस मदत करून दंगल नियंत्रणात आणली.ह्यावेळी त्यांनी पेशवे पदासाठी दावा न करता अवघ्या सोळा वर्षे वयोमान असलेल्या माधवराव ह्या नानासाहेबांच्या द्वितीय पुत्रास पाठींबा देऊन अनेक मान्यवर व्यक्तींना माधवरावांच्या बाजूस आणले.निजामाविरुद्ध्च्या संघर्षात बाबुजींनी माधवरावास बरीच मदत केली.पण युद्धानंतर निजामाकडून पेशव्यांना मिळालेल्या जहागीरीवरून पुन्हा त्यांचे पेशव्यांशी बिनसले आणि ते लष्कर सोडून निघून गेले.नंतर माधवरावांनी त्यांची समजूत घालून त्यांना हैदर विरुद्धच्या मोहिमेत सामील करून घेतले.पण ह्या मोहिमेत सुद्धा स्वतःचे महत्व वाढविण्यासाठी त्यांनी माधवरावांच्या आज्ञा पाळण्यात चालढकल सुरु केली. हि बाब माधवरावांच्या लक्षात आल्यावर भीतीने बाबूजी नाईक पेशव्यांचा तळावरून काळोख्या रात्रीचा फायदा घेऊन पळून गेले.हि खबर माधवरावांस मिळताच त्यांनी बाबूजींची मुले,माणसे,कुटुंब कबिला कैद करून मंगळवेढ्याला रवाना केला.बाबूजी नाईकांना शरण येण्याशिवाय अन्य पर्याय माधवरावांनी ठेवला नव्हता.नोवेंबर १७७२ मध्ये माधवरावांच्या अकाली मृत्यूने बाबूजींच्या मनावर जबरदस्त आघात होऊन ते जहागिरीच्या गावी—बारामतीला जाऊन स्वस्थ बसले.
माधवरावांच्या मृत्यू नंतर त्यांचा धाकटा भाऊ नारायणराव पेशवा झाला.राघोबा दादांच्या दुर्गा ह्या कन्येचा म्हणजे नारायणरावांच्या चुलत बहिणीचा विवाह फेब्रुवारी १७७३ रोजी बाबूजी नाईकांचा मुलगा पांडुरंगराव याच्याबरोबर शनिवारवाड्यात थाटामाटाने पार पडला.यासाठी नारायणराव पेशव्यांनी स्वतः महत्वाच्या व्यक्तींच्या घरी जाऊन आमंत्रणे दिली होती,तसेच अंबारीतून पुणेकर जनतेला ह्या विवाहाच्या अक्षदा वाटल्या होत्या.ह्या विवाहाने बाबूजी आणि राघोबादादा एकमेकांचे व्याही झाले.यापूर्वी थोरल्या बाजीरावांची बहिण भिउबाईचा विवाह बाबूजी नाईकांच्या बंधुशी झाला होता.अशा प्रकारे दुसर्यांदा नाईक आणि पेशवे घराण्यात विवाह संबंध घडून आला.
नारायणरावाच्या हत्ये नंतर बारभाईनी काही दिवस नारायणराव पत्नी गंगाबाईच्या नावाने कारभार चालविला.सवाई माधवरावांच्या जन्मानंतर त्यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली.सवाई माधवरावांच्या जन्माच्या वेळी बाबुजींनी आपली सून दुर्गाबाई(राघोबादादांची मुलगी)गंगाबाईच्या सेवेसाठी पुरंदर किल्ल्यावर पाठवली होती. बारभाई मंडळींच्या विनंतीवरून ते काही काळ बारभाईनच्या राजकारणात सहभागी झाले होते.सवाई माधवरावांच्या जन्मा नंतर बाबूजी नाईक विशेष क्रियाशील राहिले नाहीत.बाबूजी नाईक वयाच्या ८२ व्या वर्षी ६ ऑक्टोबर १७७७ रोजी मृत्यू पावले.मृत्यूचे ठिकाण आणि कारण अजून तरी अज्ञात आहे.
बाबूजी नाईकांचे वास्तव्य असलेला बारामती येथील गढीवजा वाड्यात राज्य सरकारची विविध कार्यालये असून सध्या त्याचे मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीचे (conservation and restoration) काम तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
# प्रकाश लोणकर.
संदर्भ:१-मराठी रियासत खंड पाच-गो.स.सरदेसाई
२-पेशवाई:ले.कौस्तुभ कस्तुरे
३-पेशवे:ले.श्रीराम साठे
४- मराठ्यांचा इतिहास खंड दोन आणि तीन :संपादक ग.ह.खरे आणि अ.र.देशपांडे.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...