२२ सप्टेंबर १८८७ रोजी भाऊराव पाटील यांचा जन्म कुंभोज ता. हातकणंगले, जि: कोल्हापूर पायगोंडा व गंगुबाई या दांपत्याच्या पोटी आजोळी झाला. मूळ गाव कर्नाटकमधील मुडबिद्री तेथून स्थलांतर करुन महाराष्ट्रात आले. पन्हाळा, ऐतवडे बुद्रूक ता-वाळवा,कराड जवळील येळगाव या ठिकाणी मुडबिद्रीच्या देसायांचे विभाजन झाले. ऐतवडे बुद्रूकची पाटीलकी मिळाली आणि कर्मवीर पाटील झाले.वडील रोड कारकून त्यामूळे वडिलांच्या बदलीच्यामुळे कर्मवीरांची फरकट होत असे. भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण दहिवडी,विटा या ठिकाणी झाले पुढे मार्च १९०२ मध्ये भाऊरावांनी कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. शाहू महाराजांनी उभारलेल्या दिगंबर जैन वस्तीगृहामध्ये राहिले आणि खऱ्याअर्थाने तेथील अनुभवामुळे भाऊराव बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी, उधदरासाठी पुढे सरसावले. सहावी नापास झालेला एक अवलिया शिक्षण महर्षी झाला आणि रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून क्रांती केली. श्रम, स्वावलंबन, समता या गोष्टीवर याच रयतचा पुढे वटवृक्ष झाला.
१९०९ मध्ये कुंभोज मधील अण्णासाहेब पाटील यांची कन्या आदाक्का यांच्याशी विवाह झाला. याच आदाक्का पुढे लक्ष्मीबाई म्हणून ओळखू लागल्या.
भाऊरावांच्या मनावर क्रांतीचे संस्कार घडले होते त्यांचे मन जातीयतेविरुद्ध व अस्पृश्यतेविरूद्ध बंड करू लागले. वारणेचा वाघ सत्याप्पा भोसले यांचा सहवास लाभला आणि भाऊरावांनी आपलं सारं आयुष्य समाजासाठी वाहून दिले.
शिक्षण हाच सर्व सुधारणांचा पाया आहे हे त्यांनी ओळखले होते म्हणून १९०९ मध्ये पूर्वीच्या सातारा जिल्यातील वाळवा तालुक्यातील "दुधगाव" येथे मित्रांच्या सहकार्याने ' दुधगाव विद्यार्थी आश्रम ' ही छोटीशी संस्था सुरु केली. हाच भाऊरावांच्या जीवनातील शैक्षणिक क्रांतीचा प्रारंभ होता.
भाऊराव काही काळ राजर्षी शाहू महाराजांच्या सहवासात राहिले त्यांच्यावर सत्यशोधकी विचारांचा प्रभाव पडू लागला आणि ज्यावेळी २५ सप्टेंबर १९१९ साली कराडजवळील काले गावात सत्यशोधक समाजाची परिषद भरली त्यावेळी त्या परिषदेत विचार मांडत असताना बहुजनांना शिक्षण देण्याची किती गरज आहे हे ठणकावून सांगितले. शेतकरी म्हणजे माझी रयत आणि याच रयतेला शिक्षण देणारी संस्था म्हणजे " रयत शिक्षण संस्था" हे नाव जाहीर करून टाकले. आणि ४ ऑक्टोंबर १९१९ रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर काले येथे ' रयत शिक्षण संस्थेची " स्थापना केली.आपल्या वसतिगृहातील विद्यार्थांचा खर्च भागवायचा कसा यासाठी लोकांचा सुद्धा सहभाग आवश्यक आहे म्हणून प्रत्येक घराघरामधून मुष्टीफंड योजना राबविली.
कमवा आणि शिका ही योजना राबवून विद्यार्थांना स्वावलंबी व निष्ठावान विद्यार्थी कर्मवीरांनी घडविले. इ. स १९२४ मध्ये या संस्थेचे स्थलांतर सातारा येथे झाले, त्यास व्यापक स्वरूप प्राप्त झाले आणि वसतिगृह सुरु केले त्याचे नामकरण ' श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस ' असे केले. याच्या उद्घाटनास महात्मा गांधी उपस्थित होते.
या बाबत गांधीजी म्हणतात, 'भाऊराव साबरमती आश्रमात जे मला जमले नाही, ते तुम्ही येथे यशस्वी करून दाखविले. तुमच्या या कार्यास माझे शुभाशीर्वाद आहेत.'
१९३२ साली भाऊरावांनी पुणे येथे ' युनियन बोर्डिंग हाऊस ' या वसतिगृहाची स्थापना केली. रयत शिक्षण संस्थेची घोडदौड पुढे वेगानेच चालू राहिली.
४ एप्रिल १९३३ ला सयाजीराव महाराज गायकवाड यांनी शाहू बोर्डिंगला भेट दिली तिथं पिटलं भाकरी खाल्ली आणि प्रभावित होऊन ४००० हजार रुपये देणगी दिली. भारतसेवक समाजाचे अग्रणी पूज्य ठक्करबाप्पा यांनी ५०० रू देणगी दिली तसेच फलटणचे श्रीमंत मालोजीराजे निंबाळकर यांनी १० एकर जमीन, एक बंगला, रोख ५००० रू देणगी दिली. डॉ बाबासाहेबांनी २५ रू ची देणगी दिली होती अशा अनेकांचं पाटबळ भाऊरावांना मिळालं.
१९४७ साली महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सातारा येथे उच्च शिक्षण देणारे पहिले महाविद्यालय सुरू केले. १९५४ साली कराड मध्ये संत गाडगे महाराज महाविद्यालय सुरू केले अशी अनेक महाविद्यालये सुरु केली. रयत शिक्षण संस्थेचे घोडदौड सुरू असताना संस्थेचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी संस्थेचे अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला, अनुदान बंद झालं तरीही कर्मवीर खचले नाहीत त्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि ५३००० रू ची वर्गणी गोळा करून संस्था चालविली. पुढे ३० जानेवारी १९४९ साली पुन्हा रयत संस्थेचे अनुदान सरकारने सुरू केले यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदानही विसरता येत नाही.
पुढे भारत सरकारने २६ जानेवारी १९५९ रोजी ' पद्मभूषण ' ही पदवी बहाल केली पण भाऊरावांनी तेंव्हा म्हटले होते, " मला माझ्या रयतेनं दिलेली ' कर्मवीर ' ही पदवी त्याहून श्रेष्ठ वाटते."
सारं आयुष्य रयतेसाठी जगले, भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था उभी करून, "स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद" सांगून ९ मे १९५९ या दिवशी अनंतात विलीन झाले.. असे महामेरू,पद्मभूषण,कर्मवीर भाऊराव पायगोंडा पाटील यांना त्रिवार मानाचा मुजरा.
आज त्यांची पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..

No comments:
Post a Comment