विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 3 June 2023

मराठी मातीतला गनिमी कावा पंजाबमध्ये रुजवणारा एक योद्धा : योगी माधवदास उर्फ बंदा बहादुर

 



मराठी मातीतला गनिमी कावा पंजाबमध्ये रुजवणारा एक योद्धा :
योगी माधवदास उर्फ बंदा बहादुर
________________________________
भारताच्या इतिहासाचा अभ्यास करतांना एक गोष्ट लक्षात येते. शालेय इतिहासात भारतीय योद्ध्यांच्या विजिगीषु संघर्षाला महत्त्व देण्याऐवजी परकीय आक्रमकांच्या गुणगान करण्यावर जास्त भर देण्यात आला आहे.
मुघल सम्राट बाबरबद्दल शालेय विद्यार्थ्यांना जेवढी माहिती असते तेवढी बाबरशी संघर्ष करणाऱ्या राणा सांगाबद्दल नसते. शालेय इतीहासात अकबराच्या तुलनेत समकालीन महाराणा प्रताप यांच्या संघर्षाला कमी महत्त्व दिल्या गेले आहे.
इतिहासात होऊन गेलेले काही भारतीय योद्धे इतके उपेक्षित राहीले की त्यांचा साधा उल्लेख सुद्धा इतिहासाच्या पुस्तकात येत नाही.
असाच एक उपेक्षित योद्धा म्हणजे बंदा बहादुर उर्फ बंदा बैरागी.
गांभीर्याने संशोधन न झाल्यामुळे बंदा बहादुर यांची सुरूवातीची माहीती खुप कमी प्रमाणात उपलब्ध आहे.
बंदा बहादूर यांचा जन्म राजौरी ( काश्मीर) येथे 1670 मध्ये झाला. एका मान्यतेनुसार ते नाथसंप्रदायातील मराठी संत माधवदास गिरी होते. ऐन युवावस्थेत त्यांनी वैराग्य स्विकारले, योगसाधना प्राप्त करून महाराष्ट्रात नांदेड येथे संन्यस्त आयुष्य जगु लागले.
संपुर्ण आयुष्य मुघल साम्राज्याशी टक्कर घेणारे सिखांचे दहावे गुरू गोवींदसींगजी नांदेड येथे आले. 1708 साली गुरू गोवींदसींग यांनी संत माधवदास बैरागी यांची भेट घेतली ,आणि उर्वरीत आयुष्य मुघल आक्रमकांपासुन आपल्या मातृभुमीचे रक्षण करण्याचा उपदेश केला.
1707 साली औरंगजेबाचा मृत्यु झाला होता आणि परंपरेप्रमाणे इतर शहजाद्यांचा पराभव करून शहजादा मुअज्जम उर्फ बहादुरशाह ( प्रथम ) हा शहेंशाह बनला होता. तिकडे सरहिंदचा नवाब वजिरखान याच्या अत्याचारांनी परिसीमा गाठली होती. जमीनदारी आणि गरीब जनतेवर आलेली वेठबीगारी यामुळे सामान्य माणूस जेरीस आला होता. अशा परिस्थितीत इकडे गुरू गोवींदसींगजी नांदेडला असतांना त्यांच्यावर पठाण मारेकऱ्यांनी हल्ला केला (18 ऑक्टोबर 1708 )त्या हल्ल्यात गुरुजी शहिद झाले.
त्यानंतर खालसा सैन्याचे नेतृत्व बंदा बहादुर उर्फ बंदा बैरागी यांच्याकडे आले. बंदा बहादूर यांनी तिन सैनिक पाच धनुष्य आणि एक नगारा एवढे साहित्य घेऊन पंजाबकडे प्रयाण केले.
पंजाबमध्ये गेल्यावर त्यांनी सैन्याची जमवाजमव सुरू केली .मुघलांच्या आणि जमीनदारांच्या अत्याचाराने त्रस्त जनतेने प्रचंड प्रमाणात बंदा बहादुर यांचे समर्थन केले, आणि अल्पावधीतच त्यांनी पाच हजार घोडदळ आणि आठ हजार पायदळ सेना ऊभी केली. पुर्णपणे मजबूत होईपर्यंत त्यांनी गनिमी कावा पद्धतीने मुघलांना जेरीस आणले . खजिन्यावर छापे टाकुन त्यांनी मुघलांचे खजिने आपल्या ताब्यात घेतले. रसदीने मजबूत झाल्यानंतर 1710 साली त्यांनी सरहिंदवर हल्ला केला.
मुघल इतिहासकार खाफीखानानुसार जवळपास पस्तीस हजाराच्या फौजेने बंदा बहादुरच्या नेतृत्वाखाली सरहिंदच्या समाना शहरावर हल्ला केला. या शहरामध्ये सरहिंदचा नवाब वजिरखान लपलेला होता. हा तोच वजिरखान ज्याने गुरू गोवींदसींगजीच्या छोट्या मुलांना हालहाल करून मारले होते. समाना इथे झालेल्या भिषण लढाईत हा वजिरखान मारल्या गेला आणि अशाप्रकारे गुरूजींच्या मुलांच्या हत्येचा सुड पुर्ण झाला.
त्यानंतर सिखांची जालौन, दोआब , बटाला , पठाणकोट अशी विजयी घोडदौड सुरू झाली.
लौहगढ येथे सिख राज्याची मुहूर्तमेढ बंदा बहादुर यांनी रोवली. बंदा बहादुर यांनी गुरू नानकदेव आणि गुरू गोवींदसींग यांच्या नावाने मोहरा पाडल्या. जमिनदारी समाप्त केली. वेठबीगारी बंद केली. एक महाराष्ट्रातुन आलेला साधा सरळ योगी इतक्या मोठ्या मुघल साम्राज्याला जेरीस आणतो. कसलेले सरदार या योग्याच्या गनिमी कावा युद्धपद्धतीपुढे नांग्या टाकत होते. हे पाहुन बादशहा बहादुरशहा खुद्द बंदा बहादुर यांच्या विरोधात 1710 साली मैदानात उतरला. बहादुरशाह लौहगढ जिंकण्यात यशस्वी झाला पण बंदा बहादुर मात्र बादशहाच्या हाती लागला नाही.
1712 मध्ये मुघल बादशाह बहादुरशाह याचा मृत्यु झाला. त्यानंतर फर्रूखसियर गादीवर बसला. फर्रुखसीयरने बंदा बहादुरला पकडण्याची जबाबदारी समदखानवर सोपवीली. समद खानने तिन वर्षे जंग जंग पछाडुन शेवटी डिसेंबर 1715 साली बंदा बहादुरला पकडण्यात यश मिळवले.
बंदा बहादुर व त्यांचा परीवार आणि साथीदारांना पकडुन दिल्लीत आणण्यात आले. मुघल परंपरेनुसार त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवण्यात आले मृत्यु किंवा धर्मपरिवर्तन ,बंदा बहादुर यांनी वेदनादायी मृत्यु स्विकार केला. बंदा बहादुर यांच्या परिवाराची त्यांच्या डोळ्यादेखत कत्तल करण्यात आली. बंदा बहादुर शहीद झाले पण त्यांनी मुघल साम्राज्याच्या पतनाचा शेवटचा अध्याय लिहुन ठेवला होता...
सगळ्यात शेवटी एक गोष्ट आवर्जुन लिहावीशी वाटते. सर्व हिंदुस्थानी योद्धे धार्मिक लढाई लढत नव्हते तर ती राजकीय लढाई होती . पण परकीय आक्रमक मात्र राजकीय लढाई सोबतच एक धार्मिक लढाईसुद्धा लढत होते...
...नितेश राऊत...

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...