विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 30 September 2023

करवीर छत्रपती घराण्याचे राजाराम छत्रपती महाराज (१३ एप्रिल १८५० - ३० नोव्हेंबर १८७०)

 करवीर छत्रपती घराण्याचे राजाराम छत्रपती महाराज (१३ एप्रिल १८५० - ३० नोव्हेंबर १८७०) 

lekhak ::

Pradnyesh Shailaja Dnyaneshwar Molak Florence, तोस्काना















करवीर छत्रपती घराण्याचे राजाराम छत्रपती महाराज (१३ एप्रिल १८५० - ३० नोव्हेंबर १८७०) यांच्या इटली येथील फ्लोरेन्सच्या समाधी स्मारकाला मी नुकतीच भेट दिली. यापूर्वी भारतातून अनेक लोकं तिथं वंदन करण्यासाठी गेले आहेत. तरीसुद्धा बहुसंख्य लोकांसाठी ही वास्तू अपरिचित आहे किंबहुना त्याचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवलाच गेला नाही हे जरी खरं असलं तरीही आपल्याला इतिहासात किती खोल जायला आवडतं हा व्यक्तीसापेक्ष प्रश्न आहे.
कोल्हापूरचे युवराज Sambhajiraje Chhatrapati हे तिथे २/३ महिन्यांपूर्वी राजाराम छत्रपती महाराजांना अभिवादन करण्यासाठी सहकुटुंब गेले होते. त्यांनी तेव्हा यथोचित अशी पूजा करुन लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचवली होती. जेव्हा त्यांना समजलं मी युरोप दौऱ्यावर असताना इटलीला जात आहे तर त्यांनी आवर्जून मला त्या समाधी स्थळास भेट द्यायला सांगितलं. एवढंच नाही तर फ्लोरेन्समधील अजून काही ठिकाणं अन् गोष्टी सुचवल्या. छत्रपती घराण्यातील बऱ्याच लोकांनी तिथे भेट दिली आहे.
तर मित्रांनो, मी तिथे ५ किलोमीटर सायकल करुन पोहोचलो. निळं - पांढरं आभाळ, नदीकाठचा रस्ता, १६० हेक्टरचे भव्य असे गार्डन अशा प्रसन्न वातावरणात राजाराम छत्रपती महाराजांची समाधी आहे. अशा ठिकाणी मी व्हिडिओ करतच पोहोचलो. जशी सायकल पार्क केली तिथे जवळपास ७०/८० विद्यार्थी मला दिसले. मी विचार केला की इथं का आले असतील? तर फ्लोरेन्सच्या विविध मॅप्स् मध्ये या समाधीचा उल्लेख आहे. तसेच Lonely Planet या माध्यमाद्वारे देखील याची माहिती मिळते. या संपूर्ण परिसराचा Monumento all’Indiano असा उल्लेख सगळीकडे आढळतो. थोडक्यात काय तर पार्क, Indiana Palace Cafe, Indiano Bridge आणि Monument to the Maratha Maharajah of Kolhapur, Rajaram Chhatrapati असा हा फ्लोरेन्समधील भव्य व सुंदर भाग!
छत्रपती घराण्यातील राजाराम छत्रपती महाराज हे पहिले राजे होते जे की परदेशात गेले होते. त्यांचं मूळ नाव नागोजीराव पाटणकर. त्यांचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व तर होतच शिवाय त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती. अवघ्या वयाच्या १६ व्या वर्षी ते छत्रपती म्हणून विराजमान झाले. १८ ऑगस्ट १८६६ ते ३० नोव्हेंबर १८७० हा त्यांचा कार्यकाळ अतिशय यशस्वी राहिला. तब्बल १५० वर्षांपूर्वी १९ व्या शतकात १८७० साली राजाराम छत्रपती महाराज त्यांच्या काही सहकाऱ्यांसोबत युरोपात जातात ही गोष्टच भारी वाटते. खरं तर त्यांना लंडन येथे व्हिक्टोरिया राणीला भेटायची इच्छा होती. परंतु राणी तेव्हा लंडनमध्ये नसल्यामुळे तेथील तत्कालीन पंतप्रधान विल्यम इवॉर्ट ग्लॅडस्टोन यांनी त्यांचं आदरातिथ्य करुन योग्य तो मान-सन्मान केला. त्यांच्या भारताच्या परतीच्या प्रवासात त्यांनी युरोपचा काही भाग पहावा असं विल्यम यांनी सुचवलं. त्याप्रमाणे राजाराम छत्रपती महाराजांनी पुढील आखणी केली.
मग राजाराम महाराजांनी फ्रांस, बेल्जियम, जर्मनी व उत्तर इटली असा परिसर पाहिला. याचा संपूर्ण इतिवृतांत महाराज रोज लिहायचे. ‘Diary of the late Rajah of Kolhapoor, during his visit to Europe in 1870,’ या नावानी हे पुस्तक पुढे प्रकाशित करण्यात आलं. आजही ते वाचण्यासाठी उपलब्ध आहे. मी ही या डायरीची पानं शांतपणे व सविस्तर चाळली व त्यातून बरीच नवी माहिती मिळाली. जर्मनीतील आल्प्सच्या पर्वतरांगातून उत्तर इटलीतील बोलझानो येथे प्रवास करत असताना राजाराम छत्रपती महाराजांना संधिवाताचा त्रास सुरु झाला. या घातक आजारामुळे त्यांना फ्लोरेन्स येथे आणण्यात आलं. २/३ डॉक्टरांनी तपासलं, उपचार केले परंतु त्यांच्या तब्येतीने साथ दिली नाही. आणि, दुर्दैवाने राजाराम छत्रपती महाराजांचे निधन झालं. एका प्रभावशाली, हुशार व तेजस्वी राजाचा असा शेवट होणं मनाला आजही चटका लावून जातं…
पुढे त्यांचे अंत्यसंस्कार हिंदू रितीरिवाजात पार पाडले जावेत असा त्यांच्या सहकाऱ्यांनी आग्रह धरला. त्यावर तिथे वादविवाद झाला. परंतु महाराजा असल्यामुळे अंत्यविधीसाठी विशेष परवानगी मिळाली. अर्नो व मुगनॉन या नद्यांच्या पवित्र संगमावर हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. इटलीमध्ये अशा पद्धतीचा विधी कधीच घडला नव्हता. स्थानिक लोकांमध्ये त्याविषयी कुतुहल निर्माण झाले व बघण्यासाठी गर्दी देखील झाली. या संपूर्ण प्रसंगाचा इतिवृतांत तेथून कोल्हापूरला पाठवण्यात आला.
राजाराम छत्रपती महाराजांचे इटलीतील फ्लोरेन्स येथे समाधी स्मारक बांधण्याची चर्चा सुरु झाली. काही प्रमाणात पत्रव्यवहार झाला. कोल्हापूरहून आर्किटेक्ट क्यापटन चार्ल्स मॉंट यांनी या छत्रीची Indo-Saracenic Style ची डिझाईन तयार करुन पाठवली व चार्ल्स फ्रान्सिस फुलर यांनी अतिशय उत्तमरित्या मार्बल मटेरियलचा बस्ट पुतळा साकारला. १८७४ साली हे समाधी स्मारक तयार झालं व सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. पुतळ्याच्या खालील बाजूस इटालियन, इंग्रजी, मराठी व संस्कृत भाषेत महाराजांचे नाव, मृत्यूची तारीख व स्मारकाची योजना असे उल्लेख आहेत. तसेच ‘Maharaja of Kolhapur’ असा लोगोही आहे.
१९०२ साली छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे या समाधीस्थळी अभिवादन करण्यास गेले. आजतागायत भरपूर लोकांनी तिथे भेट दिली आहे. या समाधीचे नुतनीकरण काही वर्षांपूर्वी झाले. इटालियन सरकार १५० वर्षांनंतरही या स्मारकाचे योग्यरित्या जतन करत आहे याचं समाधान वाटतं. परंतु राजाराम छत्रपती महाराजांबद्दल तिथे माहितीफलक असणं किंवा त्यांचा जीवनपट मांडणं तसंच छत्रपतींचा आणि स्वराज्याचा लेखाजोखा चित्र व माहिती स्वरुपात मांडणं आवश्यक वाटतं. कारण या साऱ्या गोष्टी तिथे नाहीत अन् जगभरातील पर्यटकांना तिथं आल्यावर काहीच समजत नाही याची खंत वाटते. त्यासाठी कोल्हापूर छत्रपती घराणं, महाराष्ट्र व भारत सरकारने काही ना काही पुढाकार घेऊन योग्य पावलं उचलली पाहिजेत असं वाटतं.
या समाधी स्मारकातून प्रेरणा घेऊन कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराज समाधी स्मारक हे इंद्रजीत सावंतांच्या संकल्पनेतून, यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून, स्थानिक प्रशासनाकडून व लोकसहभागातून २०१९ ला उभं करण्यात आलं. तिथे शाहू महाराजांची चार म्युरल्स् आपल्याला पहायला मिळतात व अतिशय सुंदर छत्री देखील केली आहे. परिसर स्वच्छ असून पर्यटकांना फार प्रेरणादायी आहे. फ्लोरेन्स येथील समाधीबद्दल अधिक माहिती इतिहास संशोधक Indrajit Sawant, Malojirao JagdaleChandrakant Patil यांनी दिली.
राजाराम छत्रपती महाराजांचे समाधी स्मारकाजवळ जवळपास ४/५ तास घालवले. ‘I come from the land of Marathas & I am very proud to say that. Even today it feels immensely grateful to visit this monument of Rajaram Chhatrapati, here in Florence, Italy,’ असं म्हणत इतर बरीच माहिती तेथील काही परदेशी पर्यटकांना दिली याचा आनंद व समाधान वाटतं.
या लेखाचा शेवट मला थोडा वेगळा करायचाय… आपण २१ व्या शतकात एका आधुनिक युगात जगत असताना काही भारतीयांना परकीय राजांच्या समाधी किंवा स्मारकं नको आहेत. सतत औरंगजेब अथवा टिपू सुलतान यांच्या समाधीस्थळांवर टिका करायची व त्यानिमित्ताने दंगल घडवून आणायचा प्रयत्न गेल्या काही वर्षात होताना दिसतोय. असंच जर का इटालियन लोकांनी व सरकारने राजाराम छत्रपती महाराजांबद्दल विचार केला तर त्यांचं ही स्मारकाबद्दल वाद निर्माण होऊ शकतो. पण इटालियन लोकं व सरकार तसं करत नाहीत. उलट भारतातील एक मोठा राजा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं व त्यांच्या स्मारकाचं जतन वर्षांनुवर्षे ते करत आहेत. आणि मग कुठलाही महाराष्ट्रीयन किंवा भारतीय जेव्हा फ्लोरेन्सला जाऊन ती समाधी बघतो तर त्याला/तिला गर्व वाटल्याशिवाय राहत नाही. खरं तर भारतीयांनी इतिहासाकडे इतिहास म्हणूनच पाहिलं पाहिजे. भविष्यातले वादविवाद जर टाळायचे असतील तर ही गोष्ट जनमानसात अन् पुढील पिढीत रुजवली पाहिजे असं मला वाटतं.
तर आज फ्लोरेन्स येथे राजाराम छत्रपती महाराजांचे समाधी स्मारक दिमाखात उभं आहे याचा अभिमान वाटतो. जन्मस्थळापेक्षा मला समाधीस्थळं अधिक प्रेरणादायी वाटतात. कारण एखाद्या महान व्यक्तीचा शेवट तिथे झालेला असतो. जन्मापासून मृत्यू पर्यंत त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाची शौर्यगाथा त्या समाधीस्थळी जाऊन कळते. आपण अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. सर्वांनी इतिहासातून प्रेरणा घेत वर्तमानात जगायचं कसं हे शिकावं आणि मग भविष्याचा वेध घ्यावा. मी एवढंच म्हणेल या समाधी स्मारकाच्या रुपानं राजाराम छत्रपती महाराज सातासमुद्रापार आजही जीवंत असून तिथे गेल्यावर जेव्हा मराठमोळ्या इतिहासाचे स्मरण केले तेव्हा ‘Italy in India & India in Italy’ असंच काहीसं मला वाटलं…!
जय हिंद… जय महाराष्ट्र!
- साकू, २३ सप्टेंबर २०२२, फ्लोरेन्स

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...