विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 29 November 2023

बाजीराव या माणसाला एवढं वलय का प्राप्त झालं आहे?

 बाजीराव या माणसाला एवढं वलय का प्राप्त झालं आहे?

लेखन :: कौस्तुभ कस्तुरे



बाजीराव या माणसाला एवढं वलय का प्राप्त झालं आहे? मला अत्यंत गमतीची वाटणारी दोन तीन उदाहरणं देतो, माणूस कसा होता हे यातून निश्चित समजेल.
१७३६च्या अखेरीस बाजीराव अटेरच्या मोहिमेवर निघाले. वास्तविक या वेळेस अंतरवेदीत उतरून सादतखानाच्या प्रदेशात धुमाकूळ घालावा, आज अंतरवेदीत मराठ्यांची दहशत बसवावी एवढंच काय ते रायानी मनात ठेवलं होतं. अटेरवर हल्ला चढवून पुढे बाजीरावांनी आपले एक जबरदस्त सरदार मल्हारराव होळकर यांना यमुना ओलांडून पुढे पाठवलं. होळकरांसोबत त्यांचे सरदार विठोजी बुळे देखील होते. यमुना ओलांडून होळकर-बुळे कोळजळेश्वर किंवा आत्ताच्या जलेसरपाशी आले तोच सादतखानाने त्यांच्यावर तुफान हल्ला चढवला. बुळे जखमी झाले, आणि मल्हाररावांना जलेसरपासून माघार घेऊन पुन्हा यमुनेच्या अलीकडे यावं लागलं.
आता गंमत अशी, की सादतने ही बातमी महम्मदशाहला कळवताना लिहिलं, "हुजूर, मी बाजीरावाचा पराभव केलाय, असा की तो कधीच आता नर्मदा ओलांडून हिंदुस्थानात येणार नाही. त्याचे सरदार होळकर आणि बुळे मी मारलेत". बादशहानेही खुश होऊन सादतला हत्ती घोडे आणि पोशाख पाठवला. राव अटेरला होते. होळकर आणि बुळे माघारी आले तेवढ्यात सादतखानाने मारलेली बढाई रावांच्या कानी आली. "काय? आमच्या मल्हाररावांना आणि विठोजीरावांना मारेल इतका सादत कधी शूर झाला?" राव चमकले असावेत बहुदा, थोडेफार चिडलेही. बेडकी कितीही फुगली तरी तिचा बैल होत नाही, हे सादतखानाला आता दाखवून देऊ म्हणून जी मोहीम मुळात ठरली नव्हती ती रावांनी अचानक उघडली. कोणती? "बाजीराव नर्मदा उतरून येत नाही काय? रे मूर्खांनो, बाजीराव नर्मदा उतरून दक्षिणेत गेलाच नाही, आणि तो तुमच्या अंगणात येऊन बसतो की नाही पहा" म्हणून रायांनी थेट आपल्या फौजा बदनसिंग-चुडामण जाटांच्या मुलखातून थेट आग्र्याच्या पश्चिमेकडून दिल्लीत घुसवल्या. बाजीरावांचं वाक्य आहे, "सादतखानाने बढाई मारली की हरिभक्तास रेवापार होऊ देत नाही, त्याचा गैरसमज दूर केला पाहिजे".
रामनवमीच्या यात्रेत दिल्लीचे यात्रेकरू बाहेर आले होते, त्यांना "झाम्बडाझाम्बड" केलं म्हणजे धाक घातला, किंचित लूटमार केली असावी. ही लोकं आभाळ कोसळल्यासारखी दिल्लीत ओरडत सुटली, शत्रू आला, बाजीराव आला. बादशाहाला समजेना काय चाललंय, कमरुद्दीन आणि सादत आग्र्याच्या रोखाने होते. दुसऱ्या दिवशी अमिरखान वगैरे सरदारांना बादशहाने बाजीरावांवर पाठवलं, तेव्हा बाजीराव मालच्यावर होते, आणि पिलाजी जाधवराव हे वेशीवर. पिलाजींची लहानशी फौज पाहून अमीरखानाला चेव चढला, पिलाजींनी काढता पाय घेतला हे पाहून तो असुरी आनंदाने पाठलाग करू लागला. पण घटकाभरात त्याला सगळा खेळ समजला. सावज आपण आहोत आणि शिकारी बाजीराव, हे समजायला आता उशीर झाला होता. मुख्य फौजेत गेल्यावर पिलाजी एकदम मागे वळले. आता आमिरखानासमोर पंधरा वीस हजार मराठी फौज उभी होती. पुढे काय झालं हे सांगत नाही वेळेअभावी, पण एवढंच सांगतो की या मुघली फौजेला स्वतःच्या पायावर उभं राहता येत नव्हतं आणि दिल्लीच्या दुकानदारांनी मालाच्या खाटा रिकाम्या करून त्यांचा वापर स्ट्रेचरसारखा केला.काय लांडगेतोड केली असेल पहा. पुढे सादत आज कमरुद्दीन दिल्लीकडे येतायत म्हटल्यावर बाजीराव दख्खनकडे वळले. बादशाहाला या स्वारीत "बाजीराव काय आहे" हे पुरतं समजून चुकलं.
निजाम यावेळेस दक्षिणेत होता, बादशहाने त्याला उत्तरेत बोलवून घेतलं.नेमकी गम्मत म्हणजे बाजीराव दिल्लीहून दक्षिणेत येताना आणि निजाम उत्तरेत जाताना एकाच वाटेने येत जात होते. मध्येच निजाम मार्गावर आहे हे पाहून बाजीरावांनी पिलाजी जाधवरावांना निजामाच्या भेटीस पाठवलं. आता गम्मत पहा, जो निजाम बाजीरावांना हरवायला उत्तरेत जात होता तो प्रत्यक्ष बाजीराव समोर आल्यावर म्हणाला, "दिल्लीदरबारात माझ्या मुलाला चांगलं पद मिळावं म्हणून बादशहांची भेट घ्यायला जातोय मी, बरं झालं आपली भेट झाली".
बाजीराव दक्षिणेत आले, निजाम उत्तरेत गेला, आणि बादशहाकडून पैसा, माळव्याच्या सुभेदारीचं आमिष घेऊन तो दक्षिणेकडे निघाला. राव शेवटी राव होते, निजाम उत्तरेत जातानाच त्याला जोखलं होतं. तो नर्मदा उतरायच्या आत रावांनी फौजेनिशी जाऊन भोपाळला निजामाची रसद बंद केली.भोपाळचा प्रसंग मोठा आहे तो सगळा सांगत नाही, पण वर जी दुसरी गम्मत सांगतो म्हणालो ती इथे आहे. दिवसा निजामाने वेढा फोडायचा प्रयत्न केला की त्याला आत ढकललं जाई, जास्त मारगिरी होत नसे. रात्री जेवण झालं की शेकोटी पेटवून बाजीराव आणि साथीदार गप्पा मारत असत. काही लोक मोर्च्यात असत. असंच टाईमपास आणि गम्मत म्हणून रावांच्या फौजेतून निजामावर पेटलेले बाण सोडले जात. ते बिचारे दिवसभर लुटुपुटूची लढाई खेळून दमलेले असून रात्री झोपेच्या वेळेस कुठून, कसा, कधी एखादा पेटता बाण येईल, दारुकोठार भडकेल, राहुट्या जळतील याची काळजी करत बसलेला असे. हे जे मी सांगतोय तीही गोष्ट स्वतः बाजीरावांनी चिमजीप्पांना सांगितलेली आहे बरं, मनाचं काही नाही यात.
निजाम उगाच नाही रावांना "शहामतपनाह" म्हणजे शौर्यवान आणि मराठ्यांचं "रब्बूलनी" म्हणजे दैवत म्हणलेला. बाकी, बाजीरावांच्या या अशाच साऱ्या गमतीजमती शहामतपनाह मध्ये मी दिल्या आहेतच विस्तृत, संदर्भनिशी.
- कौस्तुभ कस्तुरे
(लेख हा अगदी सोप्या भाषेत ठेवायचा म्हणून संशोधकीय थाट दिला नाहीये, कोणाला एखादा संदर्भ हवा असल्यास कमेंटमध्ये विचारलं तरी चालेल).
*पुढील नकाशात अटेर कुठे आहे, जलेसर कुठे आणि दिल्ली कुठे हे लक्षात येईल. नकाशा पुस्तकातील असल्याने परवानगीशिवाय कोणालाही वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...