विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 21 December 2023

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔ अग्निदिव्य भाग - 20


 

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔ अग्निदिव्य भाग - 20


नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜

अग्निदिव्य

__📜🗡भाग - 20 📜🚩🗡___

लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार

_🚩📜🚩___

वजीर जाफरखानाला रात्री बादशहाबरोबर जेवण्याचा बहुमान मिळाला. त्याला अगदी धन्य धन्य झाले. असे अतिदुर्मीळ योग फक्त भाग्यवंतांनाच मोठ्या मुश्किलीने लाभतात. तो बादशहासमोर दाखल झाला ते त्याच्या वैभवाचे पूर्ण प्रदर्शन करीतच. त्याच्या प्रत्येक कृतीतून, हालचालीतून, बोलण्यातून राजनिष्ठेचे पुरेपूर प्रदर्शन होईल याची तो काटेकोरपणे काळजी घेत होता. भले तो बादशहाच्या सख्ख्या मावशीचा नवरा होता, पण होता नोकरच ना. त्याचे जीवित आणि भवितव्य पूर्णपणे बादशहाच्या मर्जीवर अवलंबून आहे याची त्याच्याइतकी स्पष्ट जाणीव अन्य कोणालाही नसेल. त्याने बादशहाला नजर करण्यासाठी अत्यंत मूल्यवान नजराणे आणले होते. त्यात जसे उत्तमोत्तम जडजवाहीर होते, वस्त्रे, शस्त्रे होती तशीच अतिदुर्मीळ सुगंधी अत्तरे आणि औषधेसुद्धा होती. या सर्वांवर कडी करणारी एक खास चीज त्याच्या नजराण्यात होती. बादशहाचा स्वभाव आणि आवड जाणून त्याने ती नजराण्यात मुद्दाम सामील केली होती. ती चीज त्याने खास मदिनेवरून मागविली होती. आणि कित्येक महिन्यांपासून तो ती बादशहाला नजर करण्याची संधी शोधत होता. ती वस्तू होती वासराच्या मऊमुलायम पातळ कातडीवर सोन्याच्या शाईने लिहिलेली कुराणाची प्रत.

जाफरखानाची अपेक्षा होती त्याप्रमाणे बादशहाने कुलीखान किंवा त्याची मोहीम याविषयी किंवा दख्खनशी संबंधित कोणत्याच विषयाची चर्चा केली नाही. बादशहा सारा वेळ धान्याच्या किमती, त्याचा साठा, पुरवठा, बाजारभाव, सरकारी धान्यवसुली, ठिकठिकाणच्या जकातीचे उत्पन्न, राज्यातील व्यापाऱ्यांची परिस्थिती, रयतेची परिस्थिती, शेतकऱ्यांची हालत, येत्या हंगामात होणाऱ्या शेतीच्या उत्पन्नाचा अंदाज, सैन्याची भरती, त्यांचे तनखे, शस्त्रे यांविषयीच बोलत राहिला. त्याने नजराण्याकडे इतकेच नव्हे तर त्या खास चिजेकडेसुद्धा साधा निर्देशही केला नाही.

जेवण अगदीच साधे होते. त्यात पदार्थही मोजकेच होते. जेवताना शराब असणे शक्यच नव्हते पण साधा हुक्कासुद्धा नव्हता. मोजकेच जेवून बादशहाने जेवण संपविले. जाफरखनालासुद्धा मग जेवण आटोपते घ्यावे लागले. तो बिचारा अर्धपोटीच राहिला असावा. जेवणानंतर आलेला विडासुद्धा अगदी साधा होता. जर्दा किंवा किवामचा त्यात लवलेश नव्हता. खाना आटोपता आटोपता एक खिदमतगार बादशहाच्या कानाशी लागून काही सांगून गेला. निर्विकार चेहऱ्याने त्याने फक्त मान हलविली आणि मग जाफरखानाला सोबत घेऊनच बादशहा खलबतखान्यात दाखल झाला.

मुद्दाम बोलावून घेतलेले उमराव आधीच हजर झाले होते. मोगली रिवाजानुसार फक्त बादशहाच बसत असे. बाकी साऱ्यांना उभेच राहावे लागे, मग तो दरबार असो, खलबतखाना असो वा खासगी महाल. रिवाजाप्रमाणे सलाम, दुवा, कुर्निसात वगैरे सोपस्कार पार पडले. थट्टामस्करी वा वायफळ गप्पा हा बादशहाचा स्वभाव नव्हे, पण आज शाही लहर जरा वेगळीच असावी.

आज वजीरेआझमना शाही खाना आवडलेला दिसत नाही. बिचारे फारच थोडे जेवले. अर्धपोटीच राहिले म्हणा ना.

नाही नाही आलमपन्हा, तसे काही नाही. शाही महालात, प्रत्यक्ष शहनशाहे आलींसाठी तयार झालेला खाना आवडला नाही म्हणणारा दुर्भागीच म्हणावे लागेल. इतका सेहतमंद सादगीपूर्ण खाना क्वचितच कधी नशिबी येतो. मात्र आलमपन्हांसमोर बसून जेवताना थोडा संकोच वाटणे लाजमी नाही का?

यकीनन. तरी तुमचे खान्याकडे लक्ष नव्हते एवढे खरे. माबदौलतांना एक कहाणी आठवते. एक काफिर फकीर आणि त्याचा मुर्शद कोठेतरी जात असतात. कोणा नामुराद बेवकूफाने त्या काफिर फकिराला दोन सोन्याच्या विटा तोहफा म्हणून दिल्या होत्या. दर अर्ध्या घटकेने तो फकीर आपल्या मुर्शदाला विचारी की, ‘जमुरे सब खैरियत से तो हैं? चोरा-चिलटांची काही भीती तर नाही? कुठला धोका तर नाही ना?’ तीन-चार पडाव झाले हा सिलसिला जारी राहिला. एका पडावावर पथारीवर अंग टाकता टाकता फकिराने पुन्हा तेच सवाल केले. मुर्शदाने जवाब दिला की उस्ताद, ज्या वस्तूची तुम्हाला फिकीर लागून राहिली होती ती मागच्या मुक्कामावरच मी विहिरीत टाकून दिली. आता बेफिकीर होऊन झोपा. वजीरेआझम तुमची अवस्था त्या काफिर फकिरासारखी झाली आहे. माबदौलतांनी आपल्या मौसाजींची फिकीर दूर केली आहे. आता त्यांनी बेखौफ होऊन कारोबारावर लक्ष द्यायला हरकत नाही.

वजीर जाफरखान पार गडबडून गेला. त्याला काहीच अर्थबोध होईना. बाकी उमरावसुद्धा बादशहाचा नूर पाहून चमकले. त्यांनासुद्धा काही संदर्भ ध्यानात येईना.

आलाहजरत आलमपन्हांची बंद्यावर कायम मेहेरनजर राहिली आहे. हुजुरे आलींच्या अशा मेहेरबानींचे आणि उपकारांचे ओझे शिरावर घेऊन हयात काढण्यात गुलामाला आनंद वाटत आलेला आहे. पण गुस्ताखी माफ असावी. अलीजांनी आमची कोणती फिकीर दूर केली आहे काही ध्यानात येत नाही.

जनाब जाफरखान आपण मुघल सलतनतीचे वजीरेआझम, मुख्य वजीर. पुऱ्या सलतनतीमध्ये माबदौलतांच्या नंतर आपला रुतबा गणला जातो. परंतु वजिराला नुसती सोने-चांदी, हिरे-मोती, रेशीम-अत्तरे, किनखाप यांचीच पारख आणि माहिती असून चालत नाही, तर खऱ्या राज्यकर्त्याला गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, डाळी, घोस्त, जनावरे अशा प्रत्येक लहानात लहान वाटणाऱ्या बाबींचा चालू बाजारभाव अगदी तोंडावर असला पाहिजे. आज पाहिले तर वजीरेआझमना या कशाचीच माहिती नाही. किंबहुना त्यांचे माबदौलतांच्या बोलण्याकडे फारसे लक्षच नव्हते.

कसूर माफ असावी अलीजा, पण मन जरा विचलित झाले आहे हे खरे.

का? लाडक्या बेगमेने बेवफाई केली म्हणून की तिला भर जवानीत सजा-ए-मौत दिली म्हणून?

नाही हुजुरे आली, दोन्ही नाही. बस यूँ ही.

यूँ ही कैसे? माबदौलतांच्या मामूजाननी म्हणजे तुमच्या लाडक्या सालेसाहेबांनी, अमीर उल् उमरा नवाब शाहिस्ताखानांनी आपल्या जिजाजींसाठी आसामच्या कोहस्तानी जंगली मुलखातून मिळवलेली बेहद खूबसूरत नागा जातीची हूर आजच तुमच्या खास जनानखान्यात दाखल झाली आहे. आजची रात्र तिच्या सोबत रंगीन करण्याची तमन्ना बाळगून होतात. पण माबदौलतांनी शाही खान्याची दावत दिली आणि त्याउपर खलबतखान्याची ही मसलत काढली; त्यामुळे या साऱ्या झमेल्यांमधून मोकळे होतो कधी आणि त्या कमसीन परीला आगोशमध्ये घेतो कधी याकडेच सारे लक्ष लागून आहे.

बाकी मानकऱ्यांनी तोंडावर शेले धरून हसू लपविण्याची कोशिश केली. जाफरखानास मात्र धरणी दुभंग होऊन पोटात घेईल तर बरे असे होऊन गेले. अत्यंत खजील होऊन तो बादशहासमोर गुडघ्यांवर बसला आणि बादशहाच्या अंगरख्याची वारंवार चुंबने घेत क्षमायाचना करीत राहिला.

रहम जहाँपन्हा रहम, नाचीज गुलामावर रहम करा. आलाहजरत इतकी बारीकसारीक खबर ठेवतात याचा गुलामाला फक्र आहे. आयंदा अशी गलती होणार नाही. या वेळी गुन्हा पदरात घ्यावा. गरिबाला माफ करा हुजुरे आली.

ऊठ जाफरखान. मुघल सलतनतीची वजिरी म्हणजे अय्याशी, आराम, चैनबाजी आणि लौंड्या नाचवणे नव्हे, हे पक्के ध्यानात ठेव. कोणाचे खासगी शौक सरकारी कामात रुकावट पैदा करणार असतील तर त्याचा कठोर बंदोबस्त केला जाईल हे प्रत्येकाने समजून असा. ज्या गोष्टी इस्लामला मंजूर नाहीत त्या माबदौलत खपवून घेतील असे कोणी गृहीत धरू नये. हे अवामला समजावून सांगणे हे तुम्हा सर्वांचे फर्ज आहे. रही बात जानकारी की। तर नीट ध्यानात ठेव, अशी प्रत्येक बारीकातील बारीक खबर ठेवली म्हणूनच माबदौलत शहनशाहे हिंदोस्ता म्हणून तख्तनशीन आहेत अन्यथा या जागी आज दारा किंवा शुजा बसला असता. आता काळजी करू नकोस, तू शाही दस्तरखानवर खाना घेत होतास तेव्हाच शाही जनानखान्याचा दरोगा तुमच्या त्या कमसीन परीला शाही पनाहमध्ये घेऊन आला आहे. ती आता माबदौलतांच्या हमशिरा जहाँआरा बेगम यांच्या निगराणीत मेहफूज आहे. शाही दस्तरखानची शिरकत तुला त्याचसाठी फरमावण्यात आली होती.

जाफरखानाचे डोळे विस्फारले. जीभ टाळ्याला चिकटली. आज जे प्रत्यक्ष वजीरेआझमच्या बाबत घडले ते आपल्या नशिबी कधीही येऊ शकते ही जाणीव होऊन प्रत्येक उमराव नखशिखान्त हादरला. काही वेळाने भानावर आलेला जाफरखान वारंवार जमिनीवर माथा टेकवून माफीची याचना करू लागला.

ऊठ, जाफरखान. कसूर आधीच माफ केली आहे. म्हणूनच तू या क्षणी आदबखान्यात नाहीस तर खलबतखान्यात आहेस आणि तुझी वजिरी कायम आहे. मात्र याद राख, तुझे शौक जर सलतनतीच्या कामाकडे दुर्लक्ष करायला मजबूर करीत असतील तर आयंदा मुलाहिजा ठेवला जाणार नाही. ध्यानात ठेवा ही हिदायत प्रत्येक लहान-मोठ्या दरबारी मनसबदारांसाठी आणि मुलाजिमांसाठीसुद्धा आहे. बस्स एका क्षुल्लक गोष्टीसाठी भरपूर वेळ वाया गेला. वजीरेआझम कारवाई शुरू हो।

हुकूम आलमपन्हा…

कुर्निसात करीत जाफरखान बादशहाशेजारी उभा राहिला. रुमालाने चेहरा साफ करून आणि किंचित खाकरत घसा साफ करून, जणू काहीच घडले नाही अशा आविर्भावात त्याने बोलायला सुरुवात केली.

वजीर जाफरखानाने मग नेताजी पालकरला दिलेरखानाने केलेल्या अटकेपासून त्याचे धर्मांतर आणि त्याच्या प्रकृतीची त्या दिवसाची अवस्था यासंबंधीचा गोषवारा सर्वांसमोर सांगितला. त्याला मध्ये अडवून कोणी काही प्रश्न वा खुलासा विचारला नाही, कारण अर्थात खुद्द बादशहा शांतपणे डोळे मिटून ऐकत होता. त्याच्या हातातील जपमाळेचे मणी सरकत होते म्हणूनच केवळ तो जागा आहे हे समजत होते. अन्यथा तो अगदी निश्चल बसून होता. जाफरखानाचे बोलणे संपताच त्याने खाडकन डोळे उघडले. त्याची भेदक हिरवी नजर साऱ्या उमरावांवरून फिरली. जणू तो प्रत्येकाच्या मनात उठणाऱ्या प्रतिक्रिया वाचत होता. मग अगदी हळू आवाजात त्याने बोलायला सुरुवात केली–

माबदौलत जाणतात की, तुम्हा सर्वांच्या मनात एकच सवाल चालू आहे तो म्हणजे या कमअस्सल बेगैरत काफिर बगावतखोराचे माबदौलत एवढे लाड का करीत आहेत? त्याला अजून जिवंत कसा ठेवला आहे? एवढेच नव्हे तर खुद्द वजीरेआझमच्या जनानखान्यात शाही मेहमान म्हणून चैन करायला मोकळा कसा सोडला आहे? सवाल जायज आहेत; मगर फिजूल आहेत. हा माणूस दुसरा शिवा म्हणून आलम दुनियेत मशहूर झाला आहे. आता तो शिवा काय चीज आहे हे उच्चारून माबदौलतांना त्यांची मुबारक जबान नापाक करून घ्यायची नाही. मुरारबाजी नावाच्या शिवाच्या एका शिपायाने जंगे पुरंदरमध्ये जे कर्तब दाखवले, जे सैतानी साहस आणि शिपाईगिरीचा जो नमुना पेश केला त्याचे वर्णन दिलेरखानाने कळवले आहे. ते सारा दरबार जाणतो. त्या शिपाईगिरीला मिसाल फक्त एका खालिदचीच की दुसरी रुस्तमची. त्या दरिद्री कंगाल बगावतखोर शिवाला असे नगिने कुठून मिळतात, अल्ला जाणे! जर शिवाचा एक साधा शिपाई इतका तिखट, तर त्याचा सिपाहसालार सरनोबत, जो दुसरा शिवा म्हणविला जातो तो काय चीज असेल? अल्लाच्या कृपेने ऐन मोक्यावर तो दख्खनमध्ये माबदौलतांच्या पनाहमध्ये होता. इस्लामच्या कामासाठी माबदौलतांना हा मोहरा हवा होता. म्हणून त्याला येथे आणवला.

शाही खजिन्यातून इनामे, जहागिऱ्या, बक्षिसे, मानमरातबांची लयलूट होते. मोहिमांवर करोडो अश्रफींचा खर्च होतो. हजारो शिपाई आणि शेकडो दरबारी खस्त होतात पण हाती काय येते? खाक? दुर्दैवाने शाही सलतनतीचे सगळे सरदार, मनसबदार, मुत्सद्दी एकजात नालायक आणि अय्याशी झाले आहेत. अगदी तळातल्या शिपायापर्यंत हे दुर्गुण फौजेत आणि सलतनतीतल्या प्रत्येक मुलाजिमापर्यंत पसरले आहेत. या गोष्टीचा माबदौलतांना सख्त अफसोस आहे. माबदौलतांचे जन्नतनशीन परदादा शहेनशहा अकबरे आझम यांनी राजपूत काफिरांना लाडावून ठेवले आणि साहेबी इमान ठेवणाऱ्या नेक इमानदार बंद्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना सही राहवरून भरकटण्यास मजबूर केले. नतीजा? आज सदिया बितली, महम्मद बिन कासिमने सरजमीने हिंदवर तबलीगसाठी जिहाद करून, पण सरजमीने हिंद दार- उल्- हरबच राहिली, सत्ता भले सुलतान आणि आता मुघल शहेनशहांची असली तरी. प्रत्यक्ष हजरत पैगंबर सलल्लाह वसल्लमचे दिव्य मार्गदर्शन लाभलेल्या इस्लामच्या पहिल्या चार खलिफांनी फक्त पस्तीस वर्षांमध्ये दुनियेच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत इस्लाम नेला आणि आम्ही? चेंगिझखान आणि तैमूरलंगाची नस्ल म्हणून मिरवणारे आम्ही पिढ्यान्पिढ्या इथे डोके आपटत आहोत. उपयोग काय?

आजघडीला मुघल सलतनतीत इस्लामचे बंदे सर्वाधिक संख्येने बंगालच्या सुभ्यात आहेत. ते काय बख्तियार खिलजीच्या पराक्रमामुळे? नाही. त्याच भूमीतल्या मूळ काफिर असणाऱ्या काळापहाडमुळे. काफिर हिंदूंचे तेवर मोठे तेज असतात. एखाद्या गफलतीने वा काही अन्य कारणाने धर्मातून बाहेर गेलेल्यांना त्यांच्यात क्षमा नाही. त्याला धर्मात परत न घेता त्याची अवहेलना आणि अपमान करण्यातच ते धन्यता मानतात. दुनियेचा दस्तूर आहे, सुहागन म्हणून तेवर मिरवणारी आणि फक्र महसूस करणारी हसीना जेव्हा दुर्दैवाने बेवा होते आणि जिल्लतभरी जिंदगी बसर करण्याची तिच्यावर पाळी येते, तेव्हा ती दुनियेतील सर्व सुहागनांचा द्वेष करू लागते. प्रत्येक स्त्री आपल्यासारखी विधवा, रंडकी व्हावी अशी तमन्ना करू लागते. तसेच हे धर्म सोडलेले काफिर हिंदू जिल्लत आणि अपमानाने पेटून उठतात आणि सूड उगवण्यासाठी प्रत्येक हिंदूला इस्लामच्या झेंड्याखाली आणण्यासाठी जी जान लावून कोशिश करतात. असाच दुसरा काळापहाड माबदौलतांना दुसरा शिवा म्हणवणाऱ्या या काफिरामध्ये नजर येतो आहे. माशाल्ला असे फक्त अकरा नेक बंदे रुस्तम माबदौलतांना मिळवता आले तर… इन्शाल्लाह सरजमीने हिंद माबदौलत चुटकीसरशी दार-उल्-इस्लाममध्ये तबदील करतील.

आमीन! सुम्मा आमीन!!

खामोश! तुमच्या दुवांच्या अपेक्षेने हे सांगितलेले नाही तर माबदौलत त्यांची दिली तमन्ना आज जाहीर करीत आहेत. यासाठीच सिद्दी फुलादखानाला सख्त हिदायत दिलेली होती की, त्याला हवी तशी मौज त्याने या कैद्यासोबत करावी, पण तो जायबंदी होता कामा नये. त्याच्या कोणत्याही अवयवाला धोका पोहोचता कामा नये. आज माबदौलतांची तमन्ना पूर्ण होण्याचे आसार नजरेत येत आहेत.

इन्शाल्लाह!

हुं! फक्त दुवांनी कामे झाली असती तर हजरत पैगंबर सलल्लाह वसल्लम यांना एकामागोमाग एक जंग लढावी लागली नसती. हिजरत करण्याची आवश्यकता भासली नसती. जो कोशिश करतो फक्त त्यालाच अल्ला मदत करतो.

बादशहा क्षणभर थांबला. त्याची तीक्ष्ण हिरवी नजर समोरच्या उमरावांवरून फिरली. बादशहाच्या मनात नेमके काय आहे याचा कोणताच अंदाज बांधता येत नव्हता. हे धार्मिक प्रवचन-वाझ-ऐकविण्यासाठी एवढ्या रात्री खलबतखान्यात गुप्त मसलत बोलाविण्याची काय गरज होती? काहीच नीट उमगत नसल्याने चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया उमटू न देण्याची प्रत्येकजण कोशिश करत होता. तोंड न उघडता जांभई देण्याची चोरटी कृती बादशहाने अल्लद टिपली आणि हिरवी नजर मीर बक्षीवर स्थिर झाली. ती नजर जणू मस्तकात आरपार शिरून त्यात सुरू असलेले विचार वाचण्याची कोशिश करीत होती. मीर बक्षी नखशिखान्त हादरला. त्याला अखेर बोलावेच लागले.

आलमपन्हा अगदी वजा फरमावीत आहेत. आलाहजरतांच्या एका शब्दावर आमची जान कुर्बान आहे. आज जे आमचे आहे ते शहनशाहे आलमांच्या मेहेरबानीचेच फळ आहे. या शरीरावर आणि त्यात वसणाऱ्या रूहवर परवरदिगारे आली अल्लातालाच्या नंतर आलाहजरत जिल्हेसुभानी शहनशाहे आलम बादशहा ए हिंदोस्ता हजरत जिंदा पीर आलमगिरांचीच एकमात्र सत्ता आहे. लेकिन अलीजा जान की अमान पाउं तो गुलाम जहन में उठते सवाल पेश करने की इजाजत चाहता है.

इर्शाद.

गुस्ताखी माफ हुजुरे आला, पण मागे एकदा अलीजांनी कुलीखानाबद्दल शक जाहीर केला होता. तो फंद करण्यासाठी दख्खनच्या शाही छावणीत दाखल झाला आहे असा. म्हणून मग आज त्याची एवढी तारीफ आणि त्याच्यावर एवढी जर्रानवाजी याचे गुलामाला थोडे आश्चर्य वाटते.

बेशक. वह शुबा अपनी जगह कायम है. त्याला शिवानेच मिर्झाराजांकडे दिलेरखानाच्या छावणीत पाठवले असावे असे माबदौलतांना आजसुद्धा वाटते. इतकेच नव्हे, तर त्याने इस्लाम कबूल केला यातसुद्धा काही राज असावा असा अंदेशा आहे म्हणूनच त्याला वजीरेआझमसारख्या सर्वांत निकटच्या आणि भरवसेमंद माणसाच्या देखरेखीत ठेवले आहे. मुसलमान झाला तरी मोकळा नाही सोडला त्याला. नजरकैद कायम आहे आणि पुढे मोहिमेवर असला, तरी ती कायम असेल. फक्त त्याला न जाणवेल, न बोचेल अशी.

परंतु आलमपन्हा आम्ही तर असे ऐकून होतो की, खुद्द मिर्झाराजांनीच त्याला आदिलशाहीतून आपल्याकडे वळवून घेतले, सरदारकी आणि जहागिरी देऊन आणि त्याला आलाहजरतांनीसुद्धा मान्यता दिली होती.

शिवा बेवकूफ नाही. जर त्याचा हा माणूस थेट शाही छावणीत येता तर तो शरणागत म्हणूनच आला असता. मग त्याला जे साधायचे ते साधता आले नसते. म्हणून त्याने प्रथम आदिलशाहीत जाण्याचे नाटक केले. शिवाच्या या सापळ्यात बुढ्ढा मिर्झाराजा बरोब्बर फसला. त्याच गुन्ह्यासाठी तो बेवक्त नरकात रवाना झाला. हा मोहरा माबदौलतांना हवा होताच म्हणूनच त्या बुढ्ढ्याच्या मसलतीला शाही मान्यता मिळाली. शिवा आग्र्यातून पळता वा न पळता, काहीही झाले असते तरी कुलीखानाच्या बाबत आज जे घडते आहे ते तसेच घडविण्याचे माबदौलतांनी मान्यता देतानाच ठरवले होते.

सुभानअल्ला. आलमपन्हांची दूरअंदेशी वाकई काबिले तारीफ आहे.

बादशहाची नजर वळताच जाफरखानाचे पुढचे शब्द गळ्यातच रुतले.

इथे आपण नुसत्या अशा गप्पा मारण्यासाठी जमलेलो नाही, तर महम्मद कुलीखानाची पुढची तजवीज नक्की करण्यासाठी जमलो आहोत. जाफरखान.

हुकूम आलाहजरत.

आता कुलीखानाची तबियत सम्हलते आहे. त्याचा खुराक वाढव. आता त्याला वर्दिश करायला लाव. हत्यारांची तालीम सुरू करू दे. घोड्यावरून रपेट मारू दे. म्हणजे दोन महिन्यांत तो पुरता तयार होईल. मात्र लक्षात ठेव, त्याचा पुरुषाशी, त्यातही काफिर पुरुषाशी संपर्क जितका कमी तितका प्रयत्न कर. पुढच्या हुकमापर्यंत त्याला तुझ्या जनानखान्यातून बाहेर काढू नकोस. त्याचे खिदमतगार, नौकर, बांदी-बटकी कोणीसुद्धा हिंदू असता कामा नये. हत्याराची वर्दिश करताना जोड म्हणून तार्तर बायकांनाच सुरुवातीला पुढे कर. पुढे काय करायचे नंतर हुकूम होईल.

जो हुकूम आलमपन्हा. अल्लाच्या कृपेने माझ्या हरममध्ये औषधालासुद्धा कुफ्र आणि काफिर नाही. हुकमाची तामिली शब्दश: होईल. इन्शाल्लाह.

ठीक है. कुलीखान पूर्वी छावणीत दाखल झाला तेव्हाच त्याला पाचहजारी मनसबदारी आणि जहागिरी माबदौलतांनी कबूल केली होती. त्याप्रमाणे सुप्याची जहागिरी बहाल करण्यात आली होती; परंतु मध्यंतरी जे घडले त्या काळात त्याची जहागिरी आणि संपत्ती खारिज करून सरकारात जमा करण्यात आली. आता त्याने साहेबी इमान कबूल केले आहे; त्यामुळे दिलेला शब्द पाळणे जरूर आहे. क्यों महाबतखान?

बिलकुल दुरुस्त आलमपन्हा.

महाबतखान, पाचहजारी मनसबदार म्हणून तो तुमच्या निसबतीत राहील. त्याला नकळत, पण तो सतत तुमच्या नजरेच्या टप्प्यात राहिला पाहिजे. त्याच्या फौजेतला प्रत्येक सरदार, हवालदार, दफेदार, इतकेच नव्हे तर प्रत्येक शिपाई आणि त्याच्या खिदमतीत दिला जाणारा प्रत्येक चाकर, खिदमतगार, बांदी-बटकी मुसलमानच असली पाहिजे. त्या प्रत्येकाची खातरजमा तुम्ही जातीने करून घ्या. काही गफलत झाली तर मुलाहिजा राखला जाणार नाही. यातला प्रत्येकजण नुसता मुसलमान नव्हे तर पैदाइशी मुसलमान हवा. शक्यतो किमान ज्याचा आजा मुसलमान झाला आहे असा असला पाहिजे. दोन महिन्यांत अशा प्रकारे त्याची फौज आणि शागिर्दपेशा तयार झालाच पाहिजे. वजीरेआझम, महाबतखानाच्या कामासाठी लागणारे सर्व दस्तावेज, हुकूमनामे, फर्माने उद्याच्या उद्या माबदौलतांच्या दस्तखतीसाठी पेश करा. तात्पुरत्या खर्चासाठी एक लाख अश्रफी शाही खजिन्यातून त्यांच्या सुपुर्द करा. कुसूर किंवा ढिलाई सहन केली जाणार नाही.

जो हुकूम आलमपन्हा.

दोघेही एकदमच बोलले.

दिलावरखान…

हुकूम आलमपन्हा.

शिकारपूरजवळ तुम्ही तुमच्या नव्या काबुली बेगमेसाठी नवी हवेली बांधत आहात, असे माबदौलतांच्या कानावर आहे.

जी आलमपन्हा. आलाहजरतांच्या नजरेतून चंद्रसूर्याखालची कोणतीही गोष्ट लपून राहणे शक्य नाही. बांधकाम लगभग पूर्ण होत आले आहे. सजावट थोडी बाकी आहे. महिन्याभरात मी तेथे राहायला जायचं ठरवतो आहे.

जायचे नाही. ती हवेली आम्ही कुलीखानास बहाल करीत आहोत. राहिलेले काम महिन्याभराच्या आत पूर्ण झाले पाहिजे. जाफरखान, कुलीखानाचा कबिला, जो आता मुसलमान झाला आहे, तो हवेलीचे काम पूर्ण होताच तिथे राहायला पाठव. त्यांच्या ऐशआरामाची संपूर्ण तजवीज सरकारी खर्चाने करून दे. माबदौलतांच्या हुकुमाप्रमाणे तिथला शागिर्दपेशा तयार कर.

हुकूम आलमपन्हा.

अब रही बात दिलावरखानच्या बेगमेच्या सोईची. तर दिलावरखान, तुम्ही आग्रा शहरात कुंवर रामसिंहाच्या हवेलीच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत नवी हवेली बांधा. त्यासाठी सरकारातून तुम्हाला पंचवीस हजार अश्रफी दिल्या जातील.

जो हुकूम आलमपन्हा.

पण दिलावरखानच्या शब्दात जोर नव्हता. स्वरातील नाराजी प्रयत्न करूनसुद्धा त्याला लपविता आली नव्हती.

माबदौलतांचा फैसला जनाब दिलावरखानांना पसंद आलेला दिसत नाही. तसे असेल तर स्पष्ट बोलण्याची मुभा दिली जात आहे. दुसरी तजवीज लगेच करता येईल. दीनी कामात माबदौलतांना कोणाची नाराजी वा बददुवा नको आहे. कोणाचा हक मारून केलेले काम अल्लाच्या दरबारात रुजू होत नाही. रोशनआरा बेगमेची यमुनापार असलेली कोठी कुलीखानाला देता येईल. दीनच्या कामात ती भावाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही. तिची दुसरी तजवीज होईपर्यंत ती शाही महालात गैरसोय सोसूनसुद्धा राहायला सहज तयार होईल.

झोपलेल्या वाघाच्या शेपटीवर पाय देऊन त्याला जागे करण्याचे फायदे, मोगली रियासतीत आणि दरबारात मुरलेला दिलावरखान चांगलेच जाणून होता. स्वत:वर ताबा मिळवत तो लगेच गुडघ्यांवर बसला. दुवासाठी उचलतात तसे हात उचलून दीन स्वरात तो म्हणाला–

आलाहजरत आलमपन्हांनी गलतफहमी करून घेऊन मनात कोणताही शक धरू नये अशी गुलामाची इंतजा आहे. दीनच्या या नेक कामासाठी हजरत हुजुरे आलांनी या नाचीज गुलामाची निवड केली यापेक्षा मोठा सन्मान तो कोणता? आलाहजरतांनी मंजूर केलेल्या जागेवर माझ्या बेगमेसाठी मी नवी हवेली जरूर बांधून घेईन. पण त्यासाठी आलाहजरतांनी सरकारी खजिन्यावर भार टाकण्याची तसदी अजिबात घेऊ नये. आलाहजरतांनी आरंभलेल्या या दीनी कामात माझ्यासारख्या नाचीज गुस्ताख गुलामाचा लहानसा वाटा असावा म्हणून मी शिकारपूरची नवी हवेली आलमपन्हांच्या चरणांवर अर्पण करीत आहे. कुबूल असावी.

बहोत खूब. कुबूल है. तुझा हा त्याग माबदौलत कायम स्मरणात ठेवतील.

बादशहाचे शब्द ऐकून दिलावरखानाचा जीव एकदम भांड्यात पडला. जान सलामत तो हवेली पचास! बंदगी करीत करीत तो जागेवर जाऊन उभा राहिला. बादशहाची हिरवी नजर सुरतवरून खास भेटीसाठी आलेला व्यापारी हाजी कासमखान याच्यावर स्थिरावली. आता आपल्यावर कोणती बिलामत येऊन कोसळते या चिंतेने हाजी कासम नखशिखान्त हादरला.

हाजी कासम सुरती, तुमच्याकडे एक खास उलखास जिम्मेदारी द्यायची आहे.

जहे किस्मत अलीजा. बंदा ती जिम्मेदारी पुऱ्या ताकदीने निभावण्यात जीवनाची कृतकृत्यता समजेल.

नाही, नाही; अशी काही मोठी जानची जोखीम वगैरा असणारी जिम्मेदारी नाही. तुमची नेहमीचीच कारोबारी जिम्मेदारी आहे. कुलीखानाची जी संपत्ती सरकारात जमा झाली आहे ती आता त्याला परत करण्याचे आणि त्याचे जहागिरीचे उत्पन्न सुरू होईपर्यंत कुटुंबाच्या पालनपोषणाची तजवीज करून द्यायचे ठरवले आहे. मात्र सध्या माबदौलतांची माली हालत जरा नाजूक असल्याने तुमच्याकडून दोन लाख अश्रफी कर्जाऊ मिळाव्यात अशी इंतजा आहे. तारण म्हणून काय द्यावे लागेल हे विनासंकोच सांगावे. मात्र इस्लामची मनाई असल्याने कर्जावर व्याज देता येणार नाही. तीन वर्षांच्या आत कर्ज चुकते होईल. या कर्जाला, मीर बक्षी आणि हाजी सय्यद बेग जे तुमच्याच गावचे आहेत, जामीन असतील. अर्थात त्यांना मान्य असेल आणि तुम्हाला चालत असेल तर.

तौबा! तौबा!! अलीजा, कर्ज आणि आपल्याला? तौबा!!! आज आम्ही जी डाळ-रोटी खात आहोत ती अल्लाच्या कृपेने आणि आलाहजरत जिल्हेसुभानींच्या मेहेरबानीनेच. माशाल्ला अलीजांच्या सलतनतीत छोटा-मोठा कारोबार करीत आहोत तर अलीजा, आपल्या डोळ्यांची फडफडसुद्धा आमच्यासाठी फर्मानापेक्षा वरचढ आहे. आपली ख्वाहिश पूर्ण करणे ही गरिबासाठी मोठी सुन्नतच आहे. आज अलीजा स्वत: तोशीस सहन करून इस्लाम कायम करण्यासाठी, वाढवण्यासाठी झटत आहेत. बादशहा असून फकिरी पत्करून राहत आहेत. अशा परिस्थितीत दीनच्या या नेक कामात काही हाथ बटवण्याची संधी मिळत असेल, तर ती ठोकरणाऱ्याला जहन्नममध्येसुद्धा जागा नसीब होणार नाही. दोन लाख अश्रफींचा हा जिम्मा या गुलामावर सोपवून आलाहजरतांनी निश्चिंत मनाने दीनच्या सेवेकडे ध्यान द्यावे. इच्छा व्यक्त होईल त्या क्षणी ही रक्कम हजरतांच्या पायाशी हाजिर असेल. अल्ला कसम.

सुभानअल्ला! सुभानअल्ला!!

सुभानअल्ला. अल्लाच्या मार्गावर अशी भक्ती असणारी आणि त्याच्या कामासाठी झिजण्यास तयार असणारी अवाम आम्हाला दिल्याबद्दल आम्ही परवरदिगारे आली रहिमाने रहीम अल्लातालाचे शुक्रगुजार आहोत. हाजी कासमखान सुरती, तुमची ही धर्मभावना आणि दानशूर वृत्ती माबदौलत कधी विसरणार नाहीत.

मुबारक हो हाजी कासमखान मुबारक हो।

त्यानिमित्ताने उपस्थितांनीसुद्धा सुटकेचा नि:श्वास सोडला. हाजी कासमने संधी साधून बादशहाच्या नजरेत भरण्यात यश मिळविल्याने हाजी सय्यद बेगचा जळफळाट झाला.

आता जो एक अहम सवाल माबदौलतांना छळतो आहे, त्याचा फैसला करण्यासाठी तुम्हासारख्या तजुर्बेकार दरबाऱ्यांच्या मशवऱ्याची गरज आहे. कुलीखानाची सुप्याची जहागिरी जप्त झाली आहे. त्याला ती परत करणे तर कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही; त्यामुळे नवी जहागिरी द्यावी लागणार. तर त्याला कोणती जहागिरी द्यावी हा जरा तिढाच होऊन बसला आहे.

आता आपल्या जहागिरीवर किंवा तिच्या काही भागावर गदा येते की काय या भीतीने प्रत्येकाच्या पोटात गोळा उभा राहिला. आपल्यावर येऊ पाहणारी बला परस्पर दुसऱ्यावर ढकलता आली तर पाहावी या हेतूने सल्ले पुढे येऊ लागले. हे निमित्त पुढे करून बादशहा आपल्याला गंडा घालण्याची संधी साधून घेईल या भीतीने धास्तावलेला त्याचा काका पर्वीझखान तत्परतेने म्हणाला–

वास्तविक अलीजा कोणताही निर्णय घेण्यास पूर्णत: काबील असताना आमच्यासारख्या मर्यादित बुद्धीच्या नाचीज गुलामांचा मशवरा मागतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आमच्या इज्जत अफजाहीबद्दल मी आलाहजरतांचा ऋणी आहे. माझ्या मनात असा विचार येतो की, कुलीखान सतत नजरेच्या टप्प्यात राहावा या बाबीचा विचार करता त्याची जहागिरी दिल्ली–आग्र्यापासून फार दूर नसावी.

हा सल्ला बादशहाने मानला तर आपले नुकसान होणार हे निश्चित हे जाणून खानजहान लोधी लगोलग बोलून गेला–

बिलकुल दुरुस्त फरमा रहे हैं जनाबे आली पर्वीझखान. एखाद्या गुस्ताख काफिराचे वतन जप्त करून ते कुलीखानाला सहज फरमावता येईल.

दाऊदखान कुरेशीने तत्परतेने त्याची री ओढली–

आलमपन्हा, मला गुलामाच्या तुच्छ बुद्धीला जे पटते ते पेश करण्याची इजाजत असेल तर मला असे अर्ज करावे वाटते की, मिर्झाराजा जयसिंह आणि कुंवर रामसिंह यांनी शाही तख्ताची जी बेअदबी केली आहे आणि आलाहजरतांचा जाहीर अपमान करून त्यांच्या दिलाला जी ठेस पोहोचवली आहे उसके मद्देनजर त्यांच्या वतनाचा हिस्सा जप्त करून कुलीखानाला बहाल करण्यात यावा; त्यामुळे सारे कसे व्यवस्थित साधता येईल.

बादशहाची हिरवी गहरी नजर वजीर जाफरखानावर स्थिर झाली. सुरुवातीपासूनच भरपूर शोभा झाल्यामुळे शक्यतो तोंड न उघडण्याचे ठरवून तो उभा होता. पण बादशहाची नजर चुकविणे, त्यात अभिप्रेत असलेला हुकूम डावलणे शक्य नव्हते.

आलमपन्हा जिल्हेसुभानींचा दिल लोण्यासारखा मुलायम आहे. विनाकारण आणि वाजवीपेक्षा जास्त तोशीश कोणाला पोहोचवण्याच्या ते खिलाफ असतात. एखाद्याचा जायज हक मारून मनमानी करणे ते स्वप्नातसुद्धा खपवून घेणार नाहीत. आलाहजरतांच्या दिलात शिवा आणि कुलीखान यांच्या संबंधाने जो शक आहे तो अनाठायी असणे शक्य नाही. कारण मर्यादित बुद्धीच्या अतिसामान्य गुलामांना ज्याचा वाससुद्धा जाणवत नाही, ते आलाहजरत सूर्यप्रकाशात पाहावे तसे स्वच्छ पाहतात; त्यामुळे कुलीखानाचा काफिर हिंदूंशी संपर्क टाळण्याचे जे धोरण चालवले आहे तेच यापुढेसुद्धा चालू राहावे हेच योग्य ठरेल. साहजिकच याची जहागिरी अशा प्रदेशात असावी जिथून त्याला दख्खनशी संधान ठेवणे शक्य राहणार नाही. मग दख्खन जवळ करण्याचे स्वप्न तर दुरापास्त ठरावे. त्याची आजवरची जिंदगी कोहस्तानी मुलखात गेली आहे; त्यामुळे तो डोंगराळ मुलखात सहज रमून जाईल; अर्थात त्याला पेशावर सुभ्याची जहागिरी मंजूर करावी अशी माझी राय आहे.

बहोत खूब! वहाव्वा! सुभानअल्ला वजीरेआझम जाफरखान, तुमच्या या अशा मशवऱ्यांमुळेच माबदौलतांना तुमची वजिरी कायम ठेवण्याचा मोह पडत राहतो. वा! तुमच्या या मशवऱ्यावर माबदौलत निहायत खूश आहेत. माबदौलतांच्या ओठावरचे अलफाज तुमच्या जुबानी ऐकवून माबदौलतांचा दिल तुम्ही जिंकून घेतलात. माशाल्ला आमचा दिल तुम्ही बरोब्बर वाचलात सुभानअल्ला! मघाशी तुम्ही पेश केलेले तोहफे, एक वगळून आणि हा मशवरा माबदौलत कुबूल फरमावतात. ती कुराणशरीफची प्रत परत न्या. प्रत्यक्ष अल्लाचे शब्द ज्यात दर्ज आहेत असे पुस्तक चामड्यासारख्या नापाक वस्तूवर सोन्यासारख्या मोह उत्पन्न करणाऱ्या आणि जगातल्या सर्व भांडणांचे मुख्य कारण असणाऱ्या अशा सोन्यात लिहिणे रहमाने रहीम अल्लाला कधीच मंजूर होणा?

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...