फारुकी राजे- हे राजे खानदेश
फारुकी राजे- हे राजे खानदेशावर स. १३७० पासून १६०० पर्यंत राज्य करीत होते. यांचा मूळ पुरुष, मलिक हा खलीफ उमर फारुकच्या वंशांतील तुर्क होता. त्याचा बाप खानजेहान हा अल्लाउद्दीन खिलजीचा सरदार होता देवगिरीचें राज्य नाहींसें झाल्यावर हसन गंगूनें बंड उभारून खानदेश आपल्या ताब्यांत घेतला. फेरोझ तुघ्लखाचा प्राण शिकारींत वांचविल्यानें त्यानें मलिक यास खानदेशांतील तालनेर (हल्लीचें थाळनेर) व करचंद हे दोन परगणे जहागीर दिलें. पुढें मलिकनें बागलाणच्या राजाला फेरोझचा मांडलिक बनवून त्याला पुष्कळ नजरनजराणे पाठविले. त्यामुळें फेरोझनें त्याला तीन हजारी दिली. नंतर मलिकनें हळू हळू मुलूख काबीज केला. फेरोझ मेल्यावर (१३९०) मलिक हा जवळ जवळ स्वतंत्र झाला. त्यानें माळव्याच्या सुलतानाची सोयरीक करून नंदुरबार व सुलतानपूर या गुजराथी प्रांतांवर स्वारी केली. परंतु गुजराथच्या मुझाफरशहानें मलिकचा पराभव केला. यानंतर मरेपर्यंत मलिकनें आपल्या राज्यांत शेतीची सुधारणा करण्यांत काळ घालविला. याच्या कारकीर्दीत दुर्गादेवीचा दुष्काळ पडला होता. मरतांना त्यानें आपल्या मलिक नासीर या वडील मुलास गादीवर बसवून त्याला थाळनेरचा किल्ला व आपल्या इफ्तिखान नांवाच्या भावास लळींगचा किल्ला दिला (१३९९). त्याची सुंदर कबर अद्यापि थाळनेरास आहे.
मलिक नासीर (१३९९-१४३७).- यानें प्रथम विश्वासघात व खून करून अशीरगड घेतला. तेथील मलिक आसा हा नाझीरच्या बापाचा दोस्त असून त्याच्या मदतीनेंच त्यानें स्वतंत्र सत्ता स्थापिली होती. या वेळीं नासीरनें माझ्यावर बागलाण, खेर्डा, अंतूर येथील राजे चालून आले आहेत, म्हणून माझा कबिला गडांत घ्यावा अशी विनवणी करून, बुरख्याच्या पालख्यांतून सशस्त्र सैनिक पाठवून गडांत प्रवेश केला व आसाचा व त्याच्या सर्व मुलांचा खून करून गड घेतला; आणि तेथें आपलें राहण्याचें ठिकाण केलें. त्याचा गुरु झैनुद्दीन याच्या स्मरणार्थ त्यानें तापीच्या पूर्व थडीस झैनाबाद ब बु-हाणुद्दीन नांवाच्या एका अवलियाच्या स्मरणार्थ पश्चिमथडीस बु-हाणपूर अशीं दोन गांवें वसविलीं. यानंतर बु-हाणपूर ही या राजांची शेवटपर्यंत राजधानी झाली. नसीरनें आपल्या सास-याच्या मदतीनें आपल्या धाकटया भावास पकडून कैदेंत टाकून सुलतानपुरावर लढाई केलीं. परंतु गुजराथच्या पहिल्या अहमदशहानें त्यांनां पिटाळून लाविलें. त्यावर नासीरनें अहमदशीं तह केला. अहमदानें त्याला श्वेत छत्र व शेंदरी तंबू (हीं स्वतंत्र राज्याची चिन्हें होत) पाठवून खान ही पदवी दिली. अबुल फजल म्हणतो कीं, एव्हांपासूनच खानदेशांस तें नांव प्राप्त झालें. नासीरनें आपली मुलगी अहमद बहामनीच्या मुलास देऊन त्याच्या मदतीनें पुन्हां गुजराथेवर स्वारी केली, पण तींत शेवटीं त्याचा पराभव होऊन तो लळिंगच्या किल्ल्यांत कोंडला जाऊन मरण पावला. त्याचा मुलगा मिरान.
मिरान अदिलखान (१४३७ ते ४१)- यानें गुजराथच्या शहाची मदत घेऊन बहामनी सरदाराचा लळिंगचा वेढा उठविला. चार वर्षांनंतर त्याचा बु-हाणपूर येथें खून झाला.
मिरान मुबारिक (१४४१ ते ५७).- हा अदिलचा मुलगा; यानें विशेष गडबड न करतां १७ वर्षें शांतपणें राज्य केलें.
अदिल दुसरा (१४५७ ते १५०३)- या नांवाच्या मुलानें ४६ वर्षांच्या राजवटींत आपलें राज्य भरभराटीस व मजबुतीस आणलें. त्यानें गोंडवन व गढामंडळ (गढा =म्हणजे हल्लींचें जबलपूर) येथील राजांनां आपलें मांडलिक बनवून भिल्ल व कोळी या वाटमा-यांचा बंदोबस्त केला. नंतर त्यानें ठराविक खंडणी न दिल्यानें गुजराथच्या महमूद बेगडयानें त्याच्यावर स्वारी करून सर्व खानदेश उध्वस्त केला व अशीरगडास वेढा घातला. शेवटीं अदिलनें सर्व खंडणी पावती केल्यावर तो परतला (१४९९). यानंतर चार वर्षांनीं अदिल मेला. त्यानें अशीरगडाची जास्त बळकटी केली, मलैगड बांधला, बु-हाणपुरास बरेच राजवाडे बांधले व शाह-इ-झरकुंड (जंगलीशहा) ही पदवी घेतली. त्याचें थडगें बु-हाणपुरास दौलतमैदानजवळील राजवाडयानजीक आहे.
दाऊदखान (१५०३ ते १०).- हा अदिलचा धाकटा भाऊ; याने नगरच्या निजामशहावर स्वारी करण्याचें ठरविलें असतां निजामशहानेंच त्याच्यावर हल्ला करून त्याला अशीरगडांत कोंडलें (१५०७). तेथून आपल्यास खंडणी देण्याच्या अटीवर माळव्याच्या शहानें त्याची सुटका केली.
अदिल तिसरा (१५११ ते २०)- दाऊदच्या नंतर त्याचा वडील मुलगा घाझी अथवा आझीम हा गादीवर बसतो न बसतो तों व थोड्या दिवसांत त्याचा खून झाला. नंतर त्याच्या अलम व अदिल या दोन भावांत भांडणें लागलीं. आलमला निजामशहाचें व अदिलला गुजराथच्या महंमद बेगडयाचें पाठबळ होतें. बेगडयानें आपली नात अदिलला देऊन व पैशाची आणि सैन्याची मदत करून त्याला गादीवर वसविलें. राज्यांत स्वतःच्या विरुद्ध अनेक कट झालें असतां, व गुजराथच्या राजानेंहि त्रास दिला असतां अदिलनें आपली सत्ता बळकट करून दहा वर्षें राज्य केले.
मिरान मुहम्मद (१५२०-३५)- या अदिलच्या मुलाने इमादशहाच्या मदतीनें बु-हाण निजामवर स्वारी केली (१५२६). पण तींत याचा पराभव झाला. म्हणून पुन्हां गुजराथच्या बहादूरशहाच्या मदतीनें स्वारी करून अहमदनगर घेतलें. पुढें (१५३४) हुमायूननें बहादूरवर स्वारी केलीं असतां यानें बहादूरला मदत केली. बहादूर हा शत्रूच्या लोकांस हांकलून लावीत असतां दीव येथें मरण पावला (१५३५). तेव्हां मिरानला गुजराथचा शहा म्हणून कबूल करण्यांत आलें. त्याप्रमाणें तो अहमदाबादकडे जात असतां वाटेंतच मरण पावला.
मुबारिक (१५३५-६६).- हा मिरानचा भाऊ; यानें गुजराथी सरदारांच्या विनंतीवरून बहादूरच्या पुतण्यास तेथलें राज्य देऊन त्या मोबदल्यांत सुलतानपुर व नंदुरबार हे परगणे मिळविलें . पीर मुहम्मद नांवाच्या एका मोंगल सरदारानें १५६१ सालीं खानदेशांत स्वारी करून सर्व प्रांत बेचिराख केला व लोकांची कत्तल केली. परंतु तो लूट घेऊन जात असतां मुबारिकनें त्याला नर्मदेवर अडवून व लढाईंत ठार मारून लूट परत मिळविली; ३२ वर्षें राज्य करून मुबारिक मेला.
मिरान मुहम्मद दुसरा (१५६६-७६).- यानें गुजराथच्या गादीवर हक्क दाखविण्यासाठीं अहमदनगरावर स्वारी केलीं, परंतु तींत त्याचा पराभव झाला. पुढें अकबरबादशाहाच्या मिर्झा नांवाच्या चुलतभावांनीं खानदेशांत शिरून खूप लुटालूट केली. इमादशहास मिराननें मदत केल्यामुळें मुर्तुझा निजामशहानें बु-हाणपुरावर स्वारी करून व खानदेश लुटून अशीरगडास वेढा दिला. शेवटीं ४ लक्ष रुपये खंडणी घेऊन तो परत गेला (१५७४). यानंतर मिरान दोन वर्षांनीं मेला.
राजाअलीं (१५७६-९६)- मिरानचा मुलगा लहान असल्यानें त्याचा भाऊ राजाअली हा गादीवर आला. हा शूर, धोरणी, बुद्धिमान असल्यानें, व अकबराचें महत्त्व वाढत चालल्याचें पाहून त्यानें त्याची अधिसत्ता कबूल केली. अकबराचा व-हाडचा सुभेदार सलाबत यानें निजामशहाविरुद्ध आपल्यास राजाअल्लीनें मदत न केल्यामुळें ब-हाणपुर जाळून लुटलें. परंतु अल्लीनें त्याला नर्मदेवर गांठून त्याचा पराभव केला. पुढें अकबरानें निजामशहावर पुन्हां सैन्य पाठविलें. त्यांत पहिल्यानें अलीनें निजामशहास मदत केली, परंतु पुढें तो अकबरास मिळाला. त्यामुळें त्याला अकबरानें पंचहजारी बनवून खानदेश जहागीर दिला. मुरादच्या निजामशहावरील लढाईंत मोंगलांतर्फे लढत असतां सोनपतच्या लढाईंत हा ठार झाला. (१५९६).
बहादूरखान, (१५९६-१५९९)- अलीचा हा मुलगा. यानें बु-हाणपूरच्या पूर्वेस ३ कोसांवर बहादुरपूर वसविलें. दानियल (अकबराचा मुलगा) याचा मान ठेवला नाहीं व फौज जमवून तो स्वतंत्र बनला. तेव्हां स्वतः अकबरानें अशीरगडास वेढा दिला. गडांत युद्धसामुग्री भरपूर होती, परंतु बहादुरचें व त्याच्या नोकरांचें विशेष चांगलें नसल्यानें किल्ला पडला. अकबरानें बहादुरास ग्वाल्हेरच्या किल्ल्यांत कैदेत ठेवून खानदेश खालसा केलें. तत्कालीन यूरोपियन प्रवाशांच्या हकीकतीवरून त्यावेळीं खानदेश अत्यंत भरभराटलेला व श्रीमान होता. त्याची लांबी ७० व रुंदी ५० कोस होती. प्रांतांत मोठमोठ्या बाजारपेठा होत्या, खानदेशात ३२ महाल होते व वसूल ३० लाख २१ हजारांचा होता. बु-हाणपूर येथें निरनिराळ्या देशांतील लोक रहात होते. तेथील जुम्मामशिदींत या राजांच्या वंशावळीचा एक संस्कृत शिलालेख आहे. (ऐने-ई-अकबरी; केर्स व्हॉयेज; इलियट, पु. ६; फेरिस्ता, पु.२, ६; बदौनी, पु. २; डफ; लॉक-डेक्कन हिस्टरी.)
No comments:
Post a Comment