२४ ऑक्टोबर “मराठा आरमार दिन”...
भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते. शिवरायांच्या पूर्वीही हजारो वर्षांपासून आपल्याकडे आरमार होते. मात्र त्यानंतर काही कारणांमुळे भारतात आरमाराचा वापर पूर्णपणे बंद झाला. एवढेच काय तर समुद्र उल्लंघायला देखील बंदी करण्यात आली याचा फायदा पोर्तुगीज-इंग्रज-डच-फ्रेंच-सिद्दी यांनी उठविला आणि आपल्याला अनेक वर्षे गुलामगिरीत काढावी लागली त्यावेळचे बलाढ्य सम्राट मोगल, आदिलशाह, निजामशहा, कुतुबशाह इ. यांनी देखील प्रबळ असे लढाऊ आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही...
मात्र शिवाजी महाराजांनी कोकणाचा मुलुख ताब्यात आल्या नंतर तेथील समुद्र पाहून सिद्दी व युरोपियनांच्या उचापती पाहून लढाऊ आरमार उभे केले एवढेच नाही तर अत्यंत कमी कालावधीत उत्तमोत्तम सागरी किल्ले बांधले.धार्मिक चालीरीती झुगारून देऊन आपल्या मावळ्यांना बलाढ्य युरोपियनांविरुद्ध लढण्याची नवी प्रेरणा दिली आणि मग पुढच्या पिढीने आपल्या समुद्रावरील युरोपियनांची सत्ता खिळखिळी करून टाकली पोर्तुगीज तर स्वतःला हिंदी महासागराचे मालकच समजत समुद्रामध्ये बाहेर पडणाऱ्या कोणत्याही जहाजांना मग ते बलाढ्य मोगलांचे असले तरी त्यांना पोर्तुगीजांकडून कार्ताझ (परवाने) विकत घ्यावे लागत मोगलांची हि स्थिती.. त्यावेळच्या सागरी किनारपट्टी वरील बलाढ्य शाह्यांपुढे मराठयांची नव्याने उदयास आलेली सत्ता अगदीच छोटी होती मात्र शिवरायांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी आरमाराची गरज ओळखली...
शिवाजी महाराजांनी इ.स १६५६ मध्ये जावळी काबीज केली. जावळी मध्ये कोकणाचा बराचसा भाग येत असल्याने राजांचा कोकणात प्रवेश झाला ४ नोव्हेंबर १६५६ पूर्वी मराठ्यांच्या सिद्दीशी अनेक झटापटी झाल्या ऑक्टोबर १६५७ ते जानेवारी १६५८ या कालावधीत शिवरायांनी १००किमी. लांबीचा समुद्रकिनारा व मुलुख मिळविला. मिळविलेल्या या नव्या मुलुखाच्या संरक्षणासाठी व सिद्दीच्या कुरापती थांबविण्यासाठी व त्याला समुद्रमार्गे मिळणारी रसद तोडण्यासाठी नाविक दल (लढाऊ आरमार) असणे गरजेचे होते त्यासाठी योग्य अशी जागा/तळ असणे गरजेचे होते ऐन समुद्रामध्ये नौका बांधता येत नाहीत लष्करीदृष्ट्या समुद्रामधून आत घुसलेली खाडी हि जहाजबांधणीसाठी उत्तम जागा असते...
आणि अखेर तो दिवस उजाडला...!
२४ ऑक्टोबर १६५७ रोजी ऐन दिवाळीत (धनत्रयोदशी) कल्याण, भिवंडी काबीज केली आणि कल्याण, भिवंडी व पेन येथे मराठ्यांच्या नव्हे तर भारताच्या पहिल्या जहाजाची निर्मिती झाली, यावर्षी या घटनेस ३६५ वर्षे पूर्ण झालेली आहेत हि आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे...
अशा शुभमुहूर्तावर शिवरायांनी आरमाराची उभारणी केली म्हणून ‘२४ ऑक्टोबर’ हा दिवस ‘मराठा आरमार दिन’ साजरा केले जात. भारतीय मराठा आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते...

सर्वाना मराठा आरमार दिनाच्या सह्याद्री, जलदुर्ग एवढ्या शुभेच्छा...
जय जिजाऊ । जय शिवराय । जय शंभूराजे ।।

No comments:
Post a Comment