विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.
भाग-३
......पण त्यावेळच्या परिस्थितीकडे जर आपण दृष्टी टाकली तर आपल्याला दिसेल की दक्षिणेत मुसलमानांची स्थिती तुलनेने भक्कम होती. मदूरेला मुसलमानी सत्तेची मुळे रुजली होती. पांड्य राजे नामशेष झाले होते व होयसळ सुलतानाचे मांडलिक होते. पण आतून आग धगधत होती. वरून जरी हे होयसळ मांडलिक होते तरी नाईलाजाने ते तसे रहात होते. त्यांच्या सभोवती मुसलमानी सत्तांचा फास आवळत चालला होता व त्यावेळचा होयसळांचा राजा वीरबल्लाळ प्रत्याघात करण्यासाठी योग्य संधीची वाट बघत होता. या राजाची राजधानी हळेबीडला असल्यापासून त्याने सबूरीचे धोरण स्वीकारून संरक्षणाची तयारी चालवली होती हे आपल्याला दिसून येईल. थोडक्यात मुसलमानांचे मांडलिकत्व स्वीकारल्यास त्यांची आपल्यावर नजर राहणार नाही व आपल्याला सैन्याची जमवाजमव करायला वेळ मिळेल असे त्याचे गणित होते. त्याने पहिल्यांदा आपली सीमा सुरक्षित करण्याकडे लक्ष पुरवले.
त्याच्या राज्याच्या उत्तरेला सीमेवर तुंगभद्रा नदी होती तर पूर्वेला महत्वाचा कंपलीचा किल्ला. तुंगभद्राच्या उत्तर किनार्यावर अजून एक मजबूत किल्ला होता. त्याचे नाव होते आनेगुंदी. म्हणजे तुंगभद्रेच्या उत्तर तीरावर आनेगुंदी व दक्षिण तीरावर कंपलीचा किल्ला अशी रचना होती.
महंमद तुघलकाच्या राज्यात एकदमच बंडाळी सुरू झाल्यामुळे त्याचा कडक अंमल जरा ढिला झाला. त्यातच त्याच्या पर्शिया व अफगाणीस्तानच्या आक्रमणच्या तयारीत त्याचा खजिना पूर्ण रिता झाला होता. या संधिचा वीरबल्लळ याने फायदा उठवायचे ठरविले. अर्थात स्वातंत्र्य पुकारण्याच्या त्याच्या महत्वाकांक्षे पुढे अडचणीही तेवढ्याच जबरी होत्या. पहिली म्हणजे त्याच्या दोन बाजूला मुसलमानी सत्ताच होत्या. एक देवगिरी व दुसरी मदूरेची. स्वातंत्र्य पुकारल्यावर दोन बाजूला हे दोन शत्रू लगेचच तयार झाले असते. कदाचित एका हिंदू राजा विरूद्ध हे दोन्ही मुसलमान बंड विसरून एकत्रही झाले असते. हे लक्षात घेता त्याला या दोन सुलतानांच्या एकामेकातील दळणवळण तोडण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्याने चोखपणे या दोन सत्तांमधे चौक्यांचे जाळे उभारले. इब्न बतूतने त्याच्या रिहालामधे या नाकेबंदीचा उल्लेख केलेला आहे. त्याने तर असे लिहिले आहे की या हिंदू राजाची मदूरेला वेढा घालण्याची तयारी होत आली होती.
जेव्हा मदूरेच्या सुभेदाराने सुलतानाविरूद्ध बंड पुकारले तेव्हा आता आपली संधी जवळ आली असे वीर बल्लाळला वाटू लागले. पण एकदम अविचाराने हालचाल न करता तो सुलतान महंमद काय करतो याची वाट बघू लागला. महंमदचे लक्ष आता उत्तरेकडे पक्के लागले हे लक्षात येताच वीरबल्लाळ मदूरेवर चाल करून गेला. यानंतर त्या काळाचा विचार केल्यास त्याने एक आगळीवेगळी गोष्ट केली. त्याने राजत्याग केला, स्वत:च्या मुलाला सिंहासनावर बसविले व स्वत:ला लढायांना वाहून घेतले. यावरून त्याला या मुसलमानांच्या विरूद्ध पुकारलेल्या युद्धाचे किती महत्व वाटत असेल हे लक्षात येते. या लढायांमधे त्याने मुसलमानांना मदूरेपर्यंत मागे रेटले व मदूरेवर हल्ला करण्यासाठी एक लाख पंचवीस हजार सैन्य गोळा केले. यात पंचवीस हजार मुसलमानही सामील होते. हे कदाचित देवगिरीपासून फुटलेले भाडोत्री सैनिक असावेत. आता त्याच्या आणि मदूरेमधे मुसलमानांचे त्रिचनापल्ली हे एकच ठाणे उरले होते. दुर्दैवाने या युद्धात वीरबल्लाळ मारल गेला व त्याचे हे स्वप्न अधूरे राहिले. हा होयसळांना मोठ्ठाच धक्का होता.
इतिहासात वरंगळच्या दोन भावांनी हरिहर व बुक्क यांनी विजयनगरच्या साम्राज्याची पायाभरणी केली असे जे इतिहासात सांगितले जाते ते तपासून बघितले पाहिजे. वीरबल्लाळच्या धडपडींमुळे या साम्राज्याचा पाया यानेच घातला असावा असे मला वाटते. अर्थात हे आपण इतिहासकारांवर सोडून पुढे जाउया. वीरबल्लाळच्या मृत्यूनंतर जो राजा गादीवर आला तो दोन तीन वर्षातच मरण पावला. कशाने हे इतिहासाला ज्ञात नाही. पण त्याने व त्यानंतरच्या राजांनी व त्याच्या प्रधानांनी उत्तर सीमा मजबूत करायचे काम मोठ्या जोमात केले हे मात्र खरे. याच प्रयत्नात कंपलीचा किल्ला मुसलमानांच्या ताब्यात गेल्यावर अशाच एका मजबूत तटबंदीची गरज भासू लागली असावी व विजयनगरचा उदय झाला असावा.
कंपलीचा किल्ला मुसलमानांच्या ताब्यात गेला १३२८ साली व त्याच्या आसपासचा काळ हा विजयनगरच्या स्थापनेचा काळ असे समजायला हरकत नाही. १३४० पर्यंत हरिहर व बुक्क यांची नावे विशेष उजेडात येत नव्हती हेही लक्षात घेण्यासारखे आहे. विजयनगरची तटबंदी उभारण्याचा काळ हाच या साम्राज्याच्या स्थापनेचा काळ समजायला हरकत नाही. १३२७/२८ च्या आसपासचा काळ !
१३२७ सालापासून पुढे सतत अनेक वर्षे या हिंदू राजांनी हा लढा चालू ठेवून हिंदूंचा प्रतिकार जागृत ठेवला याबद्दल आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. मुसलमानांशी टक्कर घेऊन हिंदूत्व जिवंत ठेवणे हे विजयनगरच्या राजांचे घ्येय होते. त्यासाठी दक्षिणेत ठिकठिकाणी उगवलेली मुसलमानी सत्तेची बेटे बुडविणे हाच एक मार्ग होता. हे ध्येय त्यांनी शेवटी पन्नास वर्षांनी साध्य केले असे मानायला हरकत नाही. मदूरेच्या मुसलमान सुभेदाराला संपविले तेव्हा या कार्याचा एक महत्वाचा भाग संपला. दुसरे एक लक्षात घेतले पाहिजे की जरी तुघलक उत्तरेत अडकले होते तरी त्यांचे मात:बर सरदार अजूनही दक्षिणेत प्रबळ होते व त्यांची ताकद वाढतच चालली होती. किंबहुना तेही स्वतंत्र होण्याच्या मागे लागले होतेच. उत्तरेकडे गुलबर्गा येथे बहामनी सुलतानाच्या कहाण्या कानावर येत असल्यामुळे उत्तर सीमा बळकट करायचे काम चालू झाले. यातच महंमद तुघलकानंतर दिल्लीच्या तख्तावर आलेल्या फिरोजशाने उत्तर हिंदूस्तान हेच आपले कार्यक्षेत्र ठरविल्यामुळे त्याने दक्षिणेकडे दुर्लक्ष केले. त्याचा फायदा घेऊन बहामनी सुलतानाने आपले राज्य दक्षिणेकडे वाढवायचे ठरवले. अर्थात त्यात वावगे काहीच नव्हते. कोणीही असेच करेल. पण त्यामुळे विजयनगरची उत्तर सीमा सुरक्षीत करण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य हरिहर, बुक्क व त्यांचे तीन भाऊ करत होते.....
क्रमशः
जयंत कुलकर्णी.





No comments:
Post a Comment