विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 8 December 2025

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी. भाग-१

 




विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी. भाग-१

(छायाचित्र-१)
तीन् वर्षापूर्वी विजयनगरच्या साम्राज्याला पहिली भेट दिली आणि एका देवळातील कोपऱ्यात विचारांती मन खिन्न झाले. (छायाचित्र-२) तेथे गेल्यावर त्या भग्न अवस्थेतील इमारती पाहिल्या आणि त्या साम्राज्याच्या गतकाळातील वैभवाची कल्पना येऊन रात्री झोपेचे खोबरे झाले. रात्री सारखे डोळ्यासमोर त्यावेळी कसे असेल या कल्पनेची दृष्ये येऊ लागली व पहाट केव्हा होतेय आणि मी परत केव्हा त्या साम्राज्यात जातोय असे वाटू लागले. असे बेचैन होत चार दिवस काढले आणि पुण्याला परत आलो. परत आल्यावर मी झपाटल्यासारखे विजयनगरवर मिळतील ती पुस्तके वाचून काढली व नेहमीच्या सवयीनुसार टिपाही काढल्या. यात बहुतेक वेळा ते वैभव, साम्राज्य ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले असेल अशा लोकांची प्रवास वर्णने मोठ्या चवीने वाचून काढली. त्यातून पेसच्या लिखाणाचे भाषांतरही करायला घेतले पण ते मागे पडले. त्या दरम्यान ज्यांनी भेटी दिल्या त्यांच्या विषयी माहिती गोळा झाली म्हणून म्हटले चला त्यांच्यावर तर अगोदर लिहू आणि मग पेसकडे बघू. या लेखमालिकेत मी तेथे काढलेली अनेक छायाचित्रेही टाकणार आहे. अगोदर नुसतीच छायाचित्रेच टाकणार होतो पण म्हटले जरा लिहावे ! आशा आहे तीही आपल्याला आवडतील. यातील वरचे हे पहिले चित्र प्रत्येक भागावर असेल. (थंबनेल स्वरूपात).
अगोदर विजयनगरच्या साम्रज्याबद्दल :
तेराव्या शतकात उत्तर भारतात मुसलमान साम्रज्याचा विस्तार झाला तेव्हापासून आपण इतिहासात डोकावूया. कारण त्याच्या मागे जायचे म्हणजे मला एक मोठे पुस्तक लिहावे लागेल. तर उत्तर भारत मुठीत आल्यावर मुसलमानांनी दक्षिणेकडे आपले हातपाय पसरायला सुरवात केली. विंध्यपर्वत ओलांडून त्यांनी दक्षिणेतील एकेक साम्राज्याचा नाश चालवला. ही क्रिया इतकी सावकाश चालली होती की त्यात लक्ष घातले तरच त्याचे स्वरूप लक्षात येऊ शकेल.
१२९३ मधे अल्लाऊद्दीन खिलजीने दक्षिणेवर स्वारी केली तेव्हाही त्याचा उद्देश फक्त संपत्तीची लुटमार एवढाच होता. या लुटालुटीच्या स्वाऱ्यांमधे त्या काळात हे राजे अजून एक महत्वाचे काम उरकत आणि ते म्हणजे त्या प्रदेशाची तपशिलवार माहिती गोळा करणे. अल्लाऊद्दीन खिलजीनेही तेच केले. त्या माहितीत त्याला दक्षिणेत किती महापराक्रमी राजे महाराजे आहेत हे कळाले आणि त्यांच्या संपत्तीची मोजदाद करता येणे अशक्य आहे हेही कळाले. पुढे सिंहासनावर बसल्यावर त्याने पठाणी टोळ्यांचा बंदोबस्त करून दक्षिणेचा विचार करायला सुरवात केली. अल्लाउद्दीन खिलजी अत्यंत हुशार व धोरणी व्यवस्थापक होता. त्याच्या लक्षात एक गोष्ट आली ती म्हणजे दक्षिणेकडची राज्ये जिंकायची म्हणजे पदरात विस्तव बांधण्यासारखे आहे. (त्या काळात). त्यापेक्षा त्या प्रदेशातील राजे एकामेकांशी भांडत राहिले, युद्ध करत राहिले तर ते कमकुवत राहतील व जेव्हा तो शेवटचे आक्रमण करेल तेव्हा प्रबळ अशी सत्ता त्या तेथे उरलेली नसेल. यासाठी त्याने दक्षिणेकडे फक्त खंडणी वसुलीचे ध्येय ठेवले. यासाठी त्याने मलिक काफूर याला दक्षिणेकडे पाठवून देवगिरी व वरंगळ ही दोन राज्य काबीज करून मांडलिक केली व तो त्यांच्याकडून नियमीत खंडणी वसूल करू लागला.
दक्षिणेकडे त्या काळात अजून दोन प्रबळ सत्ता होत्या त्यांची नावे होती – होयसळ व पांड्य. होयसळ राजांची राजधानी होती सध्याचे म्हैसूर आहे त्याच्या आसपास तर पांड्य राजांची राजधानी होती मदूरा येथे. थोडक्यात पांड्यांवर हल्ला करण्यासाठी होयसळांचे राज्य पार करूनच जावे लागे. अल्लाऊद्दीनच्या फौजांनी होयसळांचा पराभव करून पांड्यांच्या मदूरा व रामेश्वरही लुटल्याच्या इतिहासात नोंदी आहेत. पण या भागात अल्लाऊद्दीनचा पूर्ण अंमल (महसूल सोडून) कधीच बसला नाही असे मानायला जागा आहे.
लवकरच अल्लाऊद्दीन खिलजीचा मृत्यू झाल्यावर देवगिरीच्या यादवांनी राजा हरपाल देव याच्या अधिपत्याखाली खिलजींची सत्ता झुगारून दिली व स्वातंत्र्य पुकारले. अल्लाउद्दीनचा मुलगा मुबारक खान हा सिंहासनावर बसला. या चिरंजीवांना मुसलमान इतिहासकारही त्या सिंहासनाला लागलेला डाग असे समजत होते, हे म्हटले म्हणजे त्याच्या लिलांबद्दल जास्त काही लिहायला नको. वर उल्लेख झालेल्या मालिक काफूरने याच्या खुनाचा प्रयत्नही केला होता. चोवीस तास हा बायकांच्या गराड्यात व मद्याच्या धुंदीत असे. जनानखान्यातील एकसोएक सुंदर बायकांच्यात राहून राहूनही याचे खरे प्रेम त्याच्या एका खुस्रो खान नावाच्या गुलामावर होते. पण बहूदा हे एकतर्फी असावे. कारण याच गुलामाने त्याचा खून केला. ( हा खरे तर एक गुजरातचा शूर हिंदू महार होता व तो धर्म बदलून मुबारकच्या पदरी लागला. असे म्हणतात की याने मुबारकचा सूड उगवण्यासाठी हे सगळे केले व शेवटी त्याचा खून केला.) असो. या मुबारक खिलजीने हरपालचे बंड शमवून त्याला पदच्यूत केले व त्याच्या जागी पहिल्यांदाच मुसलमान अंमलदार नेमला. हे झाल्यावर मात्र दक्षिण भारत खडबडून जागा झाला. ....
जयंत कुलकर्णी
क्रमशः

No comments:

Post a Comment

सज्जनगडाचा "किल्लेदार जिजोजी काटकर"

  सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला “परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड”... ●...