विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.
भाग-५
.........यांच्या राजवटीत अजून एक अत्यंत महत्वाचे कार्य झाले. हिंदू शिक्षण पद्धतीमधे गूरू-शिष्य़ परंपरेमधे सर्व विद्या ही गुरूकडून विद्यार्थ्यांकडे पाठांतराने जात असे. पण जेव्हा हिंदू मुसलमान हा झगडा चालू झाला व मुसलमानांच्या अत्याचारी व क्रूरतेमुळे ही परंपरा वारंवार खंडीत होऊ लागली. हे टाळण्यासाठी ही सर्व विद्या, ग्रंथ लिखित स्वरूपात आणायचे काम यांच्या कारकीर्दीतच चालू झाले. यामुळेच कदाचित बुक्क याने वेदांची टिका व भाष्ये प्रकाशीत करणारा अशी पदवी धारण केली असावी. यांच्याच काळात प्रासिद्ध माधवाचार्य व सायणाचार्य या द्वयींनी इतर विद्वानांबरोबर व राजांबरोबर बरीच ग्रंथ निर्मती केली. राजघराण्यतील स्त्रियाही ज्ञानी असत याचा उल्लेख वर आलाच आहे. या सर्व वातावरणाने ज्ञान व संस्कृतीची सर्व बाजूने वृद्धी झाली. व्यापारवृद्धीचे तर बोलायलाच नको. सुबत्ता म्हणजे खरोखरच सोन्याचा धूर निघत असे व हिरे माणके तर अगणित जमा झाली होती. विजयनगरचा व्यापार चौदाव्या शतकात तीनशे बंदरातून चालत असे यावरून आपल्याला याची कल्पना येऊ शकेल.
दुसरा राजवंश – सालुव घराणे
पण चांगल्या वाईटाचा फेरा येतच असतो या नियमाप्रमाणे या राजवंशाचा शेवटचा राजा दुसरा विरूपाक्ष याला त्याची सत्ता गमवावी लागली. अर्थात त्याला तोच जबाबदार होता. तो दुर्बळ व दुर्वतनी असल्यामुळे त्याच्या दरबारात अनेक तंटे बखेडे उभे राहिले व त्यातच याच घराण्यातील पण दुसर्या पातीच्या कुटुंबातील नरसिंह या राजपुत्राने सत्ता हस्तगत केली. हे सत्तांतर व्हायला बरीच कारणे होती. कलिंगराज्यात (ओरिसा) सत्ताबदल होऊन कपिलेश्वर नावाच्या सरदाराने गादी बळकावली होती. तो व त्याचा मुलगा पुरुषोत्तम यांनी सत्तेवर आल्या आल्या आपल्या राज्याच्या विस्ताराची योजना हाती घेतली. अर्थातच त्यांना पहिला अडथळा होता तो विजयनगरचा. त्यांनी पूर्वकिनार्याने खाली उतरून राजमहेंद्रीपर्यंतचा मुलूख जिकला व ते कृष्णाकाठाने विजयनगर साम्रज्यात उतरले. बघता बघता त्यांनी अर्काट पर्यंतचा मुलूख आपल्या अधिपत्याखाली आणला. हे झाल्यावर विजयनगरच्या राजाच्या दुबळेपणाची चीड येऊन बहुदा त्याला सिंहासनावरून हटविण्याचे कारस्थान झाले असावे. त्याच काळात बहामनी सुलतानानेही विजयनगरचा कृष्णा व तुंगभद्रा या पट्यातील सुपीक प्रदेश बळकावला होता. नशिबाने याच काळात बहामनी सत्तेतही सत्तेसाठी कुरबुरी चालू झाल्या होत्या ज्यामुळे नरसिंहाला त्यांनी बळकावलेला सर्व मुलूख परत मिळविण्यात यश आले. नरसिंहाच्या या कामगिरीमुळे जनमत त्याच्या बाजूने झुकले पण दुर्दैवाने उत्तरेची मोहीम हाती घेण्याआधीच तो शूर राजा मरण पावला.
याच्या नंतर याचा मुलगा गादीवर आला परंतू नरसिंहाला आपल्या मुलाच्या कुवतीची कल्पना असल्यामुळे त्याने मरायच्या आधीच त्याला नामधारी राजा करायचे ठरविले होते. ही योजना त्याने त्याचा एकनिष्ठ सेनापती नरसानायक याला समजावून सांगितली व त्याप्रमाणे राज्यशकट हाकायची त्याच्याकडून शपथ घेतली. त्या शपथेनुसार नरसानायक याने त्या मुलाला गादीवर बसवून प्रधान राज्यकारभार म्हणून हाती घेतला. हा नरसानायकही कर्तबगार होता. त्याने जिवावर उदार होऊन दिलेले वचन पाळले. याच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी त्या दुर्बळ राजाने नरसानायकाच्या मुलावर टाकली. वचनाची देवाणघेवाण आदल्या पिढीत झाली असल्यामुळे त्या वचनाचे ओझे या नवीन प्रधानाला वाहायचे काही कारण नव्हते. त्याने त्या राजाला पदच्यूत करून विजयनगरची सत्ता हस्तगत केली. योगायोगाने याचेही नाव नरसिंहच होते.
हा होता तिसरा राजवंश - तुलूव घराणे
हा मुळ राजघराण्यातील नसल्यामुळे याला जनतेकडून व इतर सरदाराकडून बराच विरोध झाला पण हा सगळ्यांना पुरून उरला. याच्या नंतर (१५०५) याचा धाकटा भाऊ सिंहासनावर बसला त्याचे नाव “कृष्णदेवराय” हाच तो इतिहास प्रसिद्ध कृष्णदेवराय. यालाही सिंहासनावर येताच बराच त्रास देण्यात आला पण काहीच काळात त्याची कर्तबगारी लक्षात आल्यामुळे त्याला होणारा विरोध शांत झाला. त्याने गेलेले वैभव व प्रदेश परत मिळवायचा विडा उचलला. त्याची धडाडी बघून त्याला इतर सरदारांनी उत्तम साथ दिली व त्याच्या कारकीर्दीत गेलेला बहुतेक प्रदेश विजयनगरमधे परत समाविष्ट करण्यात त्याला यश आले.
याच काळात बहामनी राज्यात बंडाळी माजून त्याचे पाच तुकडे झाले. या गोंधळाचा फायदा उठवण्यासाठी कृ्ष्णदेवरायाने आपली सेना बाहेर काढली. पहिल्याच धडाक्यात त्याने त्याचा जुना शत्रू कलिंगाच्या राजावर आक्रमण केले. पूर्वी गमावलेला सर्व प्रदेश त्याने काबीज केलाच पण एवढ्यावर न थांबता त्याने कटक येथील राजालाही आपले मांडलिक केले. ही मोहीम सुरू करण्याअगोदर त्याने कृष्णा व तुंगभद्रा या नद्याच्या मधे असलेला प्रदेश खालसा केला (रायचूरचा दुआब) व म्हैसूरच्या दक्षिणेत एक गंगवंशी राजा जरा त्रास देत होता त्याचे पारिपत्य केले. अशा तऱ्हेने विजयनगरची उत्तर सरहद्द परत एकदा निर्वेध झाली.
कृष्णदेवरायच्या या कामगिरीमुळे विजयनगरचा दबदबा सर्वदूर पसरला. उत्तरेकडून होणार्या मुसलमानांच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्याच्या प्रयत्नात शेवटी अशा प्रकारे यश मिळाले. कृष्णदेवरायने अजून एक महत्वाचा उपक्रम राबवला त्याची फळे आपण आजही उपभोगतोय तो म्हणजे उध्वस्त देवळांच्या पुनरूज्जीवनाचा उपक्रम. त्याने पडलेली देवळे बांधायला घेतली व यासाठी निधीची कमतरता भासू दिली नाही. त्याच्या या उत्तेजनाने पडलेली देवळे उभीच राहिली नाही तर नवीन देवळे बांधण्याचा वेगही वाढला. नवीन नवीन प्रकारच्या देवळाचे बांधकाम होऊ लागले. त्यासाठी वास्तूशास्त्रज्ञ दूरदुरहून आणण्यात आले. दक्षिण भारतात बहुतेक सगळ्या देवळांना जी मोठमोठी गोपूरे बांधलेली आहे यांना रायगोपूरम असे संबोधले जाते. असे म्हणतात ही रचना कृष्णदेवरायने करविली असल्यामुळे याला असे नाव पडले. खाली गोपूर आतून कसे दिसते त्याचे छायाचित्र दिले आहे. हे आतून पोकळ असते. वरून याचा डोलारा बराच मोठा असतो. याचे बांधकाम विटांचे व अचूक असावे लागते व याचा गुरूत्वमध्य बरोबर पायात पडवा लागतो. ( बाहेरची रचना कशीही असली व मोठी असली तरी मग ही वास्तू स्थिर राहू शकते.) एका ढासळलेल्या व बांधकाम अर्धवट सोडलेल्या गोपूराच्या आत जाऊन मी हा फोटो काढला होता...
क्रमशः
जयंत कुलकर्णी...










No comments:
Post a Comment