विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 8 December 2025

छत्रपती शिवराय आणि बुंदेलकेसरी छत्रसाल बुंदेला परस्पर संबंध

 



छत्रपती शिवराय आणि बुंदेलकेसरी छत्रसाल बुंदेला परस्पर संबंध

शिवाजी पीछे हुवा बुंदेला बलवान,
प्राणनाथ का शिष्य यह छत्रसाल महान ।।
आजही बुंदेलखंडात महाराज छत्रसाल बुंदेला ह्यांच्या समाधीवर सदरील गुरु-शिष्याची महत्ता दुग्गोचर करणारं कवन जगाला प्रेरणा देत विराजमान आहे. "शिवराय पाठीशी होते म्हणून मी (बुंदेला) आज एवढा बलवान झालो." असा ह्या कवनाचा अर्थ. आजही बुंदेलखंडात शिवरायांचं नाव आत्यंतिक आदरानं घेतलं जातं. महाराजा छत्रसालांवर बुंदेलखंडात कुठेही कार्यक्रम असो शिवरायांच्या मूर्तीचे पूजन गुरुस्थानी मानूनच केलं जातं आजही.
बुंदेलकेसरी महाराजा छत्रसाल बुंदेला,
सागरासारख्या पसरलेल्या मोगलांना आयुष्यभर झुंज देणारा मध्यभारतातील एक झुंजार योद्धे.
छत्रसाल मोगलांचे सत्तापिपासू राज्यधोरण आणि बर्बर आक्रमणाने त्रस्त होऊन छत्रपती शिवरायांच्या आसऱ्याला आले तेव्हा शिवरायांनी त्यांना शरण देऊन त्यांच्यात मोगलांशी लढा देण्याची राष्ट्रचेतना निर्माण केली व स्वतंत्र बुंदेला राज्य प्रस्थापीत करण्याची एक उर्मी जागृत केली तसेच युद्धनीती आणि मुत्सद्दी राजकारणाचे पाठही दिले. शिवरायांच्या देखरेखित त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या छत्रसाल बुंदेलांनी शिवरायांनी आखून दिलेल्या मार्गाने मोगलांना पळता भुई थोडी करत बुंदेलखंड हे स्वायत्त राज्य निर्माण केले. हे सर्व होत असताना छत्रसाल बुंदेला ह्यांनी छत्रपती शिवरायांनी त्यांना केलेल्या मदतीचा विसर स्वतःला कधी पडू दिला नाही. आजही बुंदेलखंडात स्थानिक बुंदेली भाषेत शिवरायांची अनेक कवनं प्रसिद्ध आहेत. लहान मुलांसाठी त्यांच्या आया आजही शिवरायांची अंगाई गीते गातात.
शिवराय आणि छत्रसालजी बुंदेला ह्यांचा संबंध हा दोन ओळीत मांडून संपवण्याएवढा छोटा नक्कीच नाही. ह्या महाबाहु गुरु-शिष्यांच्या जोडीने हिंदुस्थानाला कलाटणी देणार इतिहास घडवला, जो आजवर अकारण दुर्लक्षित राहिला. मुळात छत्रसालांचा इतिहास आजवर महाराष्ट्रात मांडण्याचा पुरजोर यत्नच कोणी केला नाही.
आम्हाला महाराजा छत्रसालांचा इतिहास जोवर कळणार नाही तोवर छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी- मुरब्बी राजकारण कदापी कळणार नाही. वयाच्या साधारण १६ ते १८ वयात असणारा एक अत्यंत शूर असा राजकुमार ( छत्रसाल मोगलांशी लढा देणारा वीर चंपतरायांचे पुत्र ) स्वतः जेंव्हा शिवरायांच्या सेनेत सामील व्हायला येतो तेंव्हा एखाद्या राजाने अश्या वीराला आपल्या पदरी बाळगणं आणि त्याच्या पराक्रमाच्या जोरावर स्वतःचं राज्य वाढवणं ह्यात आनंद मानला असता. पण क्षितीजापलीकडे पाहण्याचा शिवरायांचा दृष्टीकोन इथेही दिसतो. उद्या मराठयांना अखंड हिंदूस्थानात राज्य उभं करायचं असेल तर उत्तरेत आणि दक्षिणेत खोलवर हक्काचे सैनिकी तळ असायला हवेत हा विचार शिवरायांच्या मनी पक्का होता आणि म्हणूनच दक्षिणेत राज्य विस्तारासाठी त्यांनी दक्षिणदिग्विजय मोहीम काढली आणि जिंजी- वेल्लोर पावेतो मुलुख कब्ज्यात केला. उत्तरेत मोंगल ताकतवर म्हणून छत्रसालांच्या रुपात त्याच भागातल्या प्रचंड शूर राजपुत्राला शस्त्रापासून राजकारणापर्यंत सगळं शिक्षण देऊन राज्यउभारणीसाठी उभं केलं. शिवरायांनी महाराजा छत्रसालांशी जोडलेलं हे नातं पुढे थोरल्या शाहू महाराजांपर्यंत जोपासलं गेलं मराठयांनां अगदी पानिपताच्या युद्धात बुंदेलखंडातून रसद मिळाली, माळवा- रोहिलखंड- मारवाड भागात सत्ताविस्तारात मराठयांना बुंदेलखंडातून पुढे फार मोठी मदत मिळाली ह्याची बीजं शिवरायांच्या दूरदृष्टी राजकारणात लपली आहेत.
छत्रसाल शिवाजी महाराजांकडे नेमके कसे आले ह्यावर इतिहास-अभ्यासकांमध्ये दुमत आहे. १६६५-६६ च्या काळापर्यंत शिवराय हे नाव अखंड हिंदूस्थानात फार आदरानं घेतलं जाऊ लागलं. मोंगलांच्या मगरमिठीतून शिवनीतीच आपल्याला तारू शकेल असा विचार मोंगलामुळे सर्वस्व गमावलेल्या छत्रसालांच्या मनात आला नसता तरच नवल. काहींच्या मते शिवरायांच्या भेटीच्या ओढीने ते मोंगली चौक्या चुकवत चुकवत त्यांच्या राणीसाहेबांना सोबत घेवून मराठा राज्यात आले, तर काहींच्या मते त्यांनी मराठयांसोबत युद्धावर निघालेल्या मिर्झा राजा जयसिंहांच्या सैन्यात ते मुद्दाम दाखल झाले. थेट औरंगजेबाची नौकरी न धरता स्वजातींयांच्या सैन्यात रहावं असा त्यांच्या हेतू असावा. त्या काळात घडलेल्या घटना बघता जयसिंहासोबत मराठयांच्या राज्यात विनासायास पोहोंचता येईल असा अंतस्थः हेतूही छत्रसालांनी मनी बाळगला असावा असं राहून राहून वाटत राहतं. छत्रसालांवर संशोधित ग्रंथ लिहीणारे भगवानदास गुप्त ह्यांनी छत्रसाल मिर्झाराजा जयसिंहासोबत मराठा राज्यात आले असं मांडतात.
मोंगलांच्या ज्या फौजेने पुरंदरी हल्ला चढवला त्यात छत्रसाल सामील होते. पुरंदराच्या लढयानंतर त्यांना दिलेरखानासोबत दुसऱ्या कामगिरीवर पाठवण्यात आलं. पराक्रम गाजवूनही दिलेर खानकडून अवहेलनाच पदरी पडू लागली तेंव्हा छत्रसालांनी अंतस्थः मनसुब्याला वाट मोकळी करून दिली. शिकारीचा बहाणा करून ते मराठयांचे राजे शिवराय ह्याच्या समोर दाखल झाले. "महाराष्ट्रकेसरी" समोर होऊ घातलेला "बुंदेलकेसरी" उभा ठाकला. केवढा मनोरम आणि प्रेरक असेल तो क्षण, जणू कुरुक्षेत्रावरची कृष्ण-अर्जुन भेटीचं प्रतिरूपचं.
छत्रसाल शिवाजी महाराजांकडे का आले असावेत?
शिवराय हे फक्त महाराष्ट्राचे निर्मिक नव्हते तर तत्कालीन स्वातंत्र्याची भावना मनात बाळगणाऱ्या सर्व वीर-पुरूषांचे ते दीपस्तंभ बनलेले. तत्कालीन हिंदूस्थानात विधायक दृष्टीकोन ठेवून एवढा प्रजाहितदक्ष लोकोत्तर राजा शिवरायांशिवाय दुसरा कोणीच नव्हता. ज्या चतुरतेने त्यांनी मोंगल- आदिलशाही- निजामशाहीला शह देऊन रयतेचं सुराज्य स्थापन केलं होतं त्याला कश्याचीच तोड नव्हती. "माझ्या राज्याच्या सीमा फोफावल्या पाहिजेत ह्या पेक्षा माझ्या राज्यातली प्रजा सुखी राहिली पाहिले आणि त्यासाठी माझ्या राज्यावरची परकीय सत्तेची जोखडं दूर करायला हवीत." हा विचार सर्वप्रथम मांडला आणि तो अमलात आणून दाखवला तो शिवरायांनीच.
त्या काळात छत्रपती शिवरायांच्या कर्तुत्वाचा डंका थेट पर्शिया (इराण) पावेतो वाजत होता, फक्त महाराजांची कीर्तीच तिथवर पोहोंचली असं नाही तर औरंगजेबाच्या अब्रूची धिंडवडेच महाराजांनी पर्शियाच्या वेशीवर टांगले गेलेले.
महाराजांबद्दल औरंगजेबाला इराणचा बादशाह "शाह अब्बास सानी" पत्राद्वारे लिहीतो त्याचा थोडक्यात सारांश तो असा,
"आम्ही ऐकले की, बादशहा असमर्थ व असहाय आहे असे समजून हिंदूस्थानात बर्याच ठिकाणी बंडखोरांनी बंडाळी माजवली असून त्यांनी बरीच ठिकाणे ताब्यात घेतली आहेत व त्या राज्यातील लोकांना ते त्रास देत आहेत. त्यापैकी मुख्य "शिवा" ( शिवाजी महाराज ) नावाचा काफीर असून तो आजपर्यंत कोणाला माहिती नव्हता. बादशहाची पुष्कळ किल्ले त्याने ताब्यात घेतली. कित्त्येक बादशाही शिपाई त्याने मारले, मुलुख उजाड केला आणि आता तो बादशहाशी बरोबरीचे नाते सांगू पाहतो आहे (स्वतः बादशहा होऊ पाहतो आहे असा सदरील वाक्याचा अर्थ.). याउलट बादशहा (औरंगजेब) मात्र बापाला कैदेत टाकणे म्हणजे जग जिंकणे असे मानतो व आपल्या भावांना गादीचे जे न्याय्य वारस आहेत त्यांना मारून जादूटोण्यात गढून राहिला आहे. बंडखोराला त्याच्या हातून शासन होणं अशक्य दिसत आहे, आमच्या वंशजांनी ज्याप्रमाणे हुमायुनला गादी मिळवून देण्याच्या कामी मदत केली त्याप्रमाणे हुमायुनचा वंशज अडचणीत आहे असे पाहून (आम्ही) जातीने सैन्य घेऊन मदत करण्याचे ठरविले आहे."
इसवी सन १६६४ सालचं हे पत्र, महाराज सिंहासनाधीश्वर चक्रवर्ती सम्राट होण्याआधी बरोबर दहा-वर्ष. औरंगजेबासारख्या कळीकाळाशी महाराजांनी एवढी जबर धडक घेतली होती की इराणच्या बादशहालाही महाराजांची दखल घ्यावी लागली. जुलमी राजवटी-विरोधाचे शिवराय प्रतिक बनलेले. महाराजांची प्रेरणा घेवून अखंड हिंदूस्थानात त्याकाळी बंडाचे निशाण फडकायला लागली. दक्षिणेत बेडर आणि नायक ह्यांनी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून स्वतःची छोटी छोटी राज्य स्थापन केली. हाच स्वातंत्र्याचा विचार छत्रसालांच्या मनात रुजला आणि त्यांनी शिवाजी महाराजांकडे धाव घेतली.
छत्रसाल महाराजांना १६६७ च्या शेवटला म्हणजे १६६७ च्या नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये भेटले. आणि १६७१ साली ते स्वराज्यस्थापनेसाठी बुंदेलखंडात परतले. म्हणजे साधारण तीन ते चार वर्ष ते महाराजांच्या देखरेखित असावेत.
छत्रसालांचे एक पुत्र जगतराजाला त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल मोठं आकर्षण. ते(जगतराज) नेहमी आपल्या पित्याला त्याबद्दल विचारणा करत. पण तत्कालीन काळ हा अत्यंत धामधुमीचा असल्याने दोघांनाही एकत्र मोकळा वेळ असा फार कमी भेटे. त्यामुळे छत्रसाल जगतराजांना पत्राद्वारे त्यांच्या प्रारंभीच्या घटना बयाजवार कळवत. आजही ही पत्र उपलब्ध आहेत.
जगतराजाला लिहीलेल्या एका पत्रात महाराजा छत्रसाल म्हणतात,
''औरंगजेब बादशहाने पचास बरस राज करो. बनके बखत मै सिवाजी के पास पुना को गये. खबर नही आए हम कोन साल मे गए तीस पैतीस बरस गई. ई सिवाजी के पास हम बहुत दिन रहे. विद्या सीखी (राज्यकारभार- गनिमीकावा युद्धनीती इत्यादी). बान चलावे वगैरा. जो हम वहासे आए सो बादशाहसे हमने बैर ठाण लिया.''
ह्याचा सारांश असा की मराठा राज्यात ते जेवढी वर्ष राहिले त्यात महाराजांनी त्याना स्वतंत्र बुंदेलखंडाचा राजा बनण्या हेतूनेच शस्त्रात-शास्त्र पारंगत केलं असं दिसून येतं.
ह्या पत्रावर सेतू माधवराव पगडी ह्यांनी फार सुंदर भाष्य केलं आहे, ते लिहीतात;
"पुणे मुक्कामी शिवाजीमहाराजांनी छत्रसालाला धनुर्विद्या( व इतर विद्या) शिकवल्या आणि औरंगजेबाला प्रखर विरोध करण्याची संथा दिली. धनुर्विद्या- शिवाजीमहाराज- शिष्योतम छत्रसाल आणि मुक्काम पुणे म्हणजे नॅशनल डिफेन्स अॅकडमीचे (NDA) सतराव्या शतकातील बिजरूप. हे प्रेरणादायी दृष्य छत्रसालच्याच पत्रात सापडले म्हणून कळाले. प्रशिक्षणाचे सुंदर चित्र कुणा तरी चित्रकाराकडून तयार करवून घेऊन खडकवासल्याच्या नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीत ठेवायला काय हरकत आहे ?"
तत्कालीन हिंदूस्थानातली राजपूत घराणी अत्यंत युद्धनिपुण. राजा छत्रसाल बुंदेला हे स्वतः गहेरवार राजपूत वंशातले. ही युद्ध निपुण राजघराणी एकतर बादशहाशी अत्यंत एकनिष्ठ असत किंवा मग बंड करतील तर जीव गेला तरी बेहत्तर पण झुकायची नाहीत. दोन्ही अतिरेकी गोष्टींमुळे विनाश हा ठरलेलाच.
पण साधारण १६६७ ते १६७०-७२ छत्रसाल महाराजांच्या सानिध्यात होते जिथे त्यांनी राजकारणाचे धडे महाराजांच्या देखरेखीत गिरवले ज्याचा त्यांनी अतिशय पुढे सुंदर उपयोग केला. आणि स्वतःला लव्हाळ्यागत बनवलं, "महापुरे झाडे जाती । तेथे लव्हाळे वाचती ।।" ह्या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे.
औरंगजेबासारख्या बेरकी आणि धूर्त राजाच्या बगलेत राज्य असूनही त्यांनी कधी कायमचे गुढगे टेकले नाहीत की कधी बादशाही मिंधेगिरी पत्करली नाही. युगप्रवर्तक शिवरायांच्या सानिध्याची ही जादू होती.
बुंदेला वंशात अजून एक पराक्रमी बुंदेला होऊन गेला, रावदलपत बुंदेला त्याचं नाव. रावदलपत बुंदेला हा कायम औरंगजेबाशी अत्यंत एकनिष्ठ राहिला. त्याने मराठयांशी लढताना युद्धाची परमोच्च पराकाष्ठा केली. हा रावदलपत मराठयांसोबत लढताना अनेकदा जखमी झाला, अनेकदा मरता- मारता वाचला पण त्याला हवी तशी बढती मात्र मिळाली नाही. शेवटपर्यंत बादशहाचा तो जवळचा होऊ शकला नाही उलटपक्षी राजकारण करणारी मुसलमान सरदार त्यांच्या पेक्षा मोठ्या हुद्द्यावर गेली. हे कारस्थानी मुसलमान सरदार ह्याच्या विरुद्ध औरंगजेबाचे कान भरायचे आणि हलक्या कानाचा औरंगजेब ह्याची मनसब वेळोवेळी कमी करायचा. असं असूनही रावदलपताची औरंगजेबावरची निष्ठा ढळली नाही. राव दलपतापेक्षा त्याचा पुत्र रामचंद बुंदेला शहाणा निघाला बापाविरुद्ध बंड करून तो छत्रसालांशी मिळालेला.
"शिवरायरुपी परिसाचं महत्व कळतं ते इथे. छत्रसालांनी झुझारसिंह- चंपतराय आणि शिवाजी महाराजांसारख्या वीरपुरूषांचा आदर्श डोळ्यासमोर कायमचा ठेवला आणि इतिहासात अजरामर ठरले. उलटपक्षी औरंगजेबासारख्या कारस्थानी बादशहाच्या चाकरीत अडकलेला राव दलपत पराक्रमी असूनही फक्त कुसंगतीमुळे काळाच्या काळदरीत कायमचा गाडला गेला."
महाराजा छत्रसालांच्या दरबारातले लालकवी ह्यांच्या छत्रप्रकाश या ग्रंथात काही कवनं आहेत. त्यातल्या एका कवनात शिवाजी महाराजांनी छत्रसाल महाराजांना केलेल्या उपदेश दिला आहे. त्याचा सारांश तो असा;
"हे पराक्रमी (छत्रसाल)! शत्रूंचा नाश करून विजय प्राप्त करा. स्वदेशावर स्वतःचे राज्य प्रस्थापित करा. जेंव्हा मोगल तुमच्यावर आक्रमण करतील, तेंव्हा मी शत्रूंचे तुमच्यावरील आक्रमण दूर करण्यास पूर्ण मदत करेन. शत्रूवर विजय मिळवला तर राज्य आणि अमर कीर्ती प्राप्त होईल. यासाठी आपण बुंदेलखंडात जा आणि विजयश्री मिळवा."
हाही एक अत्यंत महत्वाचा समकालीन उल्लेख आहे. "जेंव्हा मोगल तुमच्यावर आक्रमण करतील, तेंव्हा मी शत्रूंचे तुमच्यावरील आक्रमण दूर करण्यास पूर्ण मदत करेन. " हा शिवाजी महाराजांचा शब्द पुढे थोरल्या शाहू महाराजांनी पाळला. थोरल्या शाहूंच्या कारकिर्दीत उतार वयाकडे झुकलेल्या छत्रसालांवर बंगशाचे आक्रमण झाले तेंव्हा छत्रसालांनी मदतीसाठी थोरले शाहू आणि पेशवा बाजीराव ह्यांना पत्र लिहीली. आणि पुढे मराठयांनी त्यांच्यावरचे संकट कसे दूर केले ह्याचा उल्लेख सदरील पुस्तकात "बंगश-बुंदेला" ह्या प्रकरणात आपण वाचला असेलच.
थोरले शाहू आणि महाराजा छत्रसाल ह्यांच्याबद्दल कविराज भूषण आपल्या "छत्रसालदर्शन" मधल्या नवव्या कवनात लिहीतात.
"आन राव राजा एक मन में न लाऊँ अब ।
साहू को सराहौं कैं सराहौं छत्रसाल को ।।"
अर्थ:- आता कोणत्या राव किंवा राजस मी मनामध्ये आणणार नाही. कुठल्याही अन्य राजाचा विचारसुद्धा करणार नाही. एकतर मी शाहू (छत्रपती) राजांची प्रशंसा करीन किंवा छत्रसाल नृपतींची.
शिवरायांनी छत्रसाल महाराजांना फक्त प्रेरणा दिली ह्यावर आपल्या इतिहासकारांचे एक मत आहे पण फक्त प्रेरणा किंवा योग्य शिक्षण देऊन महाराज थांबले नाहीत तर राज्यउभारणीसाठी लागणारा पैसा आणि शस्त्रही महाराजांनी छत्रसालांना पुरवली. ह्याचा उल्लेख समकालीन मोगली इतिहास लेखक भीमसेन सक्सेना ह्याच्या "तारिखे- दिलखुशा" ह्या ग्रंथात मिळतो.
भीमसेन सक्सेना "तारिखे- दिलखुशा" मध्ये लिहीतो,
"छत्रसालाला फार थोडी मनसब होती. तो अडचणीत होता. त्यामुळे तो लष्करातून निघून शिवाजीकडे गेला. उत्तर भारतातील लोकांवर शिवाजीचा फार थोडा विश्वास होता. त्याने छत्रसालाला बरेच द्रव्य दिले आणि त्याचा योग्य सत्कार करून त्याला परत जाण्याचा निरोप दिला. निरुपाय होऊन छत्रसाल आपल्या देशी गेला, त्याने उत्कृष्ट सैन्य तयार करून आपले राज्य ताब्यात घेतले."
सदरील विधान भीमसेन सक्सेना ऐकीव माहितीच्या आधारे करतोय. शिवरायांनी छत्रसाल ह्यांना द्रव्य दिलं हे खरं असलं तरी "उत्तरेतल्या लोकांवर शिवाजीचा फार थोडा विश्वास होता." ह्या वाक्याला आधार नाही. बरेच मोठा इतिहासकार भीमसेन सक्सेनाच्या ह्या वाक्यावर फसले. "तारिखे- दिलखुशा" च्या मराठी भाषांतराच्या प्रस्तावनेत सेतूमाधवराव पगडींनी ह्याचे फार सुंदर विवेचन केले आहे.
"भीमसेन सक्सेनाच्या वरील वाक्याचा हवाला देऊन सर जदुनाथ आपल्या शिवाजी चरित्रात म्हणतात;
the contemporary historian, bhimsen, however tells us that chhatrasal returned from rajgarh (?) in disappointment as he found the provincial spirit of the deccani court uncongenial to him and shivaji never gave his trust or any high office to men from northern India.
(:- जदुनाथ सरकार लिखित शिवचरित्र (पाचवी आवृत्ती:- पान १८१))
यावर सेतूमाधवराव म्हणतात,
शत्रुपक्षातून एखादा सरदार आपल्याकडे आला म्हटल्यावर सावधगिरीची भूमिका घेणं हे साहजिकचं होतं. यातून प्रांतीय भावनांचा अर्थ काढणे म्हणजे मोठा अनर्थ होय."
महाराजा छत्रसालांच्या चरित्राचा सखोल अभ्यास केल्यास कायम जाणवतं की छत्रसालांनी आयुष्यभर शिवरायांच्या नीतीशास्त्राचा पुरेपूर वापर करून मोगली सत्तेपासून बुंदेलखंड मुक्त केला. पाच- पंचवीस सैन्यांपासून सुरु झालेलं स्वातंत्रसंगर पुढे सार्वभौम राज्यात बदललं ही सर्वसामान्य गोष्ट नक्कीच नाही. शिवरायांप्रमाणेच छत्रसालांनीही आयत्या पिठावर रेघोट्या मारल्या नाहीत तर शून्यातून विश्व निर्माण केलं. शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि त्यांनी दिलेली तलवार घेवून दतिया नरेश शुभकर्ण बुंदेल्यांकडे सुरुवातीच्या काळात जेंव्हा छत्रसाल स्वतंत्र बुंदेलखंडाचं स्वप्न घेवून गेले तेंव्हा त्याने छत्रसालाला मदत नाकारली उलटपक्षी स्वातंत्र्यप्राप्तीच्या विचारापासून त्यांना दूर नेण्याचाही प्रयत्न केला. औरंगजेबाकरवी मोठा मरातब आणि मनसबी मिळवून देण्याचेही कबूल केलं पण शिवरायांच्या तेजस्वी विचारांनी भारलेल्या छत्रसालांनी मोगली मनसबी धुडकावून लावल्या आणि मदत न मिळाल्याने निराश न होता स्वबळावर सुराज्य स्थापलं. महाराजा छत्रसालांचा लढाऊ दर्जा पंजाबात शीख धर्म गुरु गुरु गोविंद सिंहजी, राजस्थानात राणा प्रताप सिंहजी आणि महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा जो आहे अगदी त्याच तोडीच खचितच होता आणि आहे.
शिवरायांचा सुराज्याचा विचार उत्तरेत डौलाने फडकवणाऱ्या महाराजा छत्रसालांचा उद्घोष मराठीजनांनीही करायलाच हवा.
"छत्रसाल महाबली करियो भली भली………!!!"
:- रवी राजेंद्र पवार

No comments:

Post a Comment

सज्जनगडाचा "किल्लेदार जिजोजी काटकर"

  सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला “परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड”... ●...