विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 17 August 2025

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

 


राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला

🚩
भाग 9
लखुजीराजे जाधवरावांची हत्या
भातवडीच्या युद्धानंतर मलिक अंबर आणि शहाजीराजे यांचे संबंध बिनसल्यामुळे शहाजीराजे निजामशाही सोडून आदिलशाहीच्या सेवेत दाखल झाले.इतकेच नव्हे तर शहाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठा सरदारांनी यशस्वी प्रयत्न करून मोगलांकडे असलेल्या लखुजीराजांना निजामशाहीत आणले .या अगोदर मलिक अंबरने जाधव -भोसले घराण्यात वितुष्ट निर्माण करण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला. खंडागळे हत्ती प्रकरणात लखुजीराजांना दोषी ठरवून शहाजीराजांची बाजू निजामाने घेतली होती. पुढे मात्र भातवडीच्या लढाईतनंतर मलिक अंबर शहाजीराजांचा व्देष करू लागला. या धोरणामुळे शहाजीराजे निजामशाही सोडून विजापूरकडे गेले. याचाच अर्थ मलिक अंबर हा मराठा सरदारांना विरोध करून त्यांना एकत्र येऊ देत नव्हता.
मलिक अंबर हा महत्त्वाकांक्षी व अत्यंत हीन स्वभावाचा होता. त्याच्या या स्वभावाचा जाधव-भोसले कुटुंबाला चांगलाच त्रास झाला. या दोन कुटुंबात वितुष्ट निर्माण करण्याचे प्रयत्न मलिक अंबर नेहमीच करत होता. लखुजीराजे व शहाजीराजे एक दिलाने लढून निजामशाहीला विजय मिळवून देत होते.हे दोन सरदार एकत्र राहिले तर आपले वर्चस्व कमी होईल अशी भीती मलिक अंबरला नेहमीच वाटत होती. म्हणूनच खंडागळे हत्ती प्रकरणात लखुजी जाधवरावांना दोषी ठरवून त्यांना निजामशाही सोडण्यास मलिक अंबरने भाग पाडले.
भातवडीच्या लढाईत शहाजी राजांचे शौर्य ,पराक्रम, तेजस्विता, लढाऊपणा पाहून त्यांनाही निजामशाही पासून दूर केले गेले. मलिक अंबरने या दोन घराण्यात वितुष्ट निर्माण करण्याचा नेहमीच प्रयत्न केला .
पुढे मलिक अंबरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा फत्तेखान हा निजाम शहाचा कारभारी झाला.तो अत्यंत जुलमी व अत्याचारी होता. हमिदखान हा लखुजी जाधवरावाच्या विरोधात निजामशहाचे कान भरत असे. जाधवराव हे आपल्या सैन्यात राहून आपल्या राजाच्या विरोधात फार मोठे कार्य पार पाडत आहेत,असे त्यांच्यावर खोटेच आरोप करून मुर्तजा निजामशहा याने लखुजी जाधवरावांच्या विरोधात फार मोठा कट रचला. निजामशहाने लखुजी जाधवराव यांना दौलताबाद किल्ल्यावर दरबारात बोलावून घेतले.
25 जुलै 1629 रोजी नारळी पौर्णिमेच्या दिवशी लखुजीराव जाधवरावांना निजामशहाने भेटीला बोलावले. मोगलांनी जाधवरावांना 24 हजारी मोगली सरंजाम दिलेला होता.निजामशाहीत आल्यावर लखुजीराजे यांना तेवढाच सरंजाम देण्याचे कबूल केले गेले होते. त्यानुसार त्यांना निजामशाही दरबारात खिल्लत घेण्यासाठी बोलविण्यात आले .निजामशहावर विश्वास टाकून लखुजीराजे आपल्या पूर्ण लवाजम्यासहित भेटायला आले होते.लखुजीराजे आपल्याबरोबर पुत्र अचलोजी, रघुजी ,आणि नातू यशवंतराव यांचेसह गडावर सुलतानाच्या भेटीसाठी आले. लखुजीराजांचा एक पुत्र बहादूरजी आपल्या आईजवळ गडाखाली थांबले होते. लखुजीराजे जाधवराव दरबारात आले.चौघेही जाधवराव मोठ्या आदबीने सुलतानाच्या पुढे जाऊन उभे राहिले. मुजरे घातले, परंतु सुलतान एकदम दरबारातून उठून आत गेले. जाधवरावांसारख्या तोलामोलाच्या सरदारांचा मुद्दाम त्यांनी ठरवून अपमान केला .लखुजीराजे यांना अपमान फार जिव्हारी लागला. या अपमानामुळे लखुजीराजे संतापाने पाठ दाखवून चालू लागले असता, निजामशहाचा अपमान केला, या सबबीवर निजामशहाच्या सैनिकांनी दग्याने लखुजीराजांवर हल्ला चढवला.सर्र सर्र सर्र सर्र आवाज करीत म्यानातून तलवारी बाहेर पडल्या ! जाधवरावांवर हमिदखान,फर्रादखान वगैरे सरदारांनी सपासप वार केले. दगाबाजांच्या आरोळ्यांनी शाही महाल दणाणला. भर दरबारात चकमक झडू लागली .मारेकऱ्यांनी गर्दी केली. रक्ताच्या धारा उडू लागल्या. लखुजी, अचलोजी , रघुजी, आणि यशवंतराव या चौघांचीही प्रेते खांडोळ्या उडून रक्ताच्या सरोवरात पडली ! लखुजीराजे यांना सफ्दरखानाने ठार केले आणि तिघा मुलांना इतरांनी मारून टाकले.जाधवरावांचा निकाल लागला. जिजाऊंचे माहेरच संपुष्टात आले .
गडाखाली लखुजीराजे यांच्या पत्नी म्हाळसाबाई पुत्र बहादूरजी व बंधू जगदेवराव होते.हत्याकांडानंतर हे सर्वजण लपतछपत, घाबरत सिंदखेडला येऊन पोहोचले. एका शूर, बलाढ्य ,इभ्रतदार मराठ्यांची अशाप्रकारे वाताहात झाली. जिजाऊंचे पिता ,दोन भाऊ व भाचा ठार झाले .जिजाऊंचे संपूर्णपणे माहेरच उध्वस्त झाले .जिजाऊंचा शोक व संताप खदखदू लागला. कारण जिजाऊंच्या आई म्हाळसाबाई व दोन भावजया नंतर सिंदखेडला येऊन सती गेल्या. लखुजी जाधवराव यांनी तमाम मराठा सरदारांना आपल्या खंबीर नेतृत्वाखाली व प्रेमळ स्वभावामुळे बांधून ठेवल्याने निजामशाही तरली होती. तब्बल चाळीस वर्षे लखुजी जाधवराव निजामशाही वाचवण्यासाठी लढत होते. परंतु निजामशहाने त्याची कदर न करता सत्ता ,स्वार्थ ,ईर्षा व मत्सराने पेटून लखुजीराजे जाधवरावांचे हत्याकांड घडवून आणले .अशाप्रकारे जाधवरावांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे समर्पण अजरामर झाले. जाधवरावांचे हत्याकांड इतिहासाला कलाटणी देणारे ठरले.
या सर्वांच्या हत्याकांडाने जिजाऊंचे माहेर उद्ध्वस्त झाले होते. आणि तेही दगाबाजीने ! असीमदुःखा बरोबरच अलोट संताप जिजाऊसाहेबांच्या हृदयात दाटला होता. मानाचे मुजरे घालायला गेलेल्या आबांना आणि वडील बंधूंना निजामशहाने दगाबाजीने ठार मारले? लखुजीराजांनी इमानेइतबारे त्यांची सेवा केली होती. त्यांचीच त्या पातशहाने कत्तल केली? लखुजीराजे यांनी त्यांच्यावर देवापेक्षाही जास्त विश्वास ठेवला, त्यांनीच विश्वासघात केला. या प्रकारांची जिजाऊंना अतिशय राग आला.......
मोठेपणानी समजून घेणारे, जीवाला जीव देणारे बंधू, उत्तम संस्कार करणाऱ्या ,सोवळ चेहेर्याच्या आऊसाहेब ,लहानपणी मनाची भीती घालविणारे ,आधार देणारे आबा आता ह्या जन्मात पुन्हा कधीही दिसणार नाहीत, आता जिजू अशी हाक कोणी कधीच मारणार नाही ह्या विचारांनी जिजाऊ साहेबांना गलबलून आले. डोळ्यातून नकळत अश्रू पाझरू लागले...कोणासाठी रडायचे पित्यासाठी ,भावासाठी का भाच्यासाठी...
... पण रडत बसणार्यांमधील जिजाऊसाहेब नव्हत्याचमुळी! त्या अधिकच सूडाने पेटून उठल्या, आणि हा सूडाचा ध्यासच गर्भातील जीवात उतरत होता. आणि जन्माआधीच त्या बालजीवाच्या मुठी वळल्या जाऊ लागल्या होत्या.
लेखन ✒️
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग १०

 


राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला

🚩
भाग १०
🚩शहाजीराजे व जिजाऊ सहजीवन 🚩
लखुजीराजे जाधवरावांचा घात करून निजामशहाने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती. लखुजीराजे यांच्या हत्येमुळे निजामशाहीला तडाखा देण्यास दुश्मनांनी सुरुवात केली होती.निजामशहाला पहिला तडाखा दिला तो स्वतः शहाजीराजे भोसले यांनी निजामशहाच्या अशा विश्वासघातामुळे शहाजीराजांनी निजामशाही विरुद्ध अघोषित लढा सुरू केला. निजामशाही मुलखात शहाजीराजांनी धुमाकूळ घातला. अनेक किल्ले ताब्यात घेतले. चौकी पहारे बसवले. संगमनेरवरून शहाजी राजे पुण्यात येऊन ते पुढच्या योजना आखू लागले. निजामशाही आणि आदिलशाहीची शहाजीराजांना कधीच भिती वाटत नव्हती.निजामशाही संपवण्यासाठी आदिलशाही मोगलात सामील झाली आणि शहाजीराजांनी देखील बचावात्मक पवित्रा घेतला व दोन पावले मागे घेतली.
शहाजीराजांनी थेट मोगलांसोबतच जाण्याचे ठरवले .हे करण्यामागे देखील एक राजकारण होते. निजामशाहीचा बराचसा भाग शहाजीराजांच्या ताब्यात होता. फौजेच्या खर्चाचे कारण दाखवून तो सरंजामापोटी मोगलांकडून कायम करून घेण्याचा त्यांचा हेतू होता.शिवाय संधी मिळताच आणखीन मुलूख ताब्यात घेऊन वेळप्रसंगी मोगलांना हात दाखवता येणार होता. मोगलांना देखील शहाजीराजांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी शहाजीराजांच्या सर्व अटी मान्य करून ,राजांना पंचहजारी मनसब, जेष्ठ पुत्र संभाजीराजांसाठी दोन हजारी ,आणि चुलतबंधु मालोजी यांच्यासाठी तीन हजारी असा दहा हजारांचा सरंजाम मंजूर करून घेतला. जिजाऊंनी शहाजीराजांच्या मनी स्वराज्याचे विचार बिंबवले होते. त्याची पूर्तता करण्यासाठी शहाजीराजे झटत होते. जिजाऊंचे आणि शहाजीराजांचे दोघांचे एकच स्वप्न होते, आणि ते साकार करण्यासाठी दोघेही प्रयत्न करत होते.संधी मिळताच शहाजीराजे पुंन्हा आपले विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी लढणार होते.पण यावेळी राजकारणात दोन पावले राजांना मागे घ्यावी लागली होती. याची राजांना खंत नव्हती; उलट ते पुन्हा मनात नव्या योजना अखित होते .
शहाजीराजांच्या या राजकीय धामधुमीच्या व राजकीय परिस्थितीतीच्या काळात शहाजीराजे अत्यंत व्यस्त होते.आणि या काळातच जिजाऊंना दिवस गेले होते .विवाह झाल्यापासून शहाजीराजांचे सर्व कुटुंब एकत्रच राहत. दौलताबादच्या पायथ्याशी वेरूळ हे शहाजीराजांचे मुळगाव.तेथेच शहाजीराजांची लष्करी छावणी होती.भोसल्यांचा जुना गढीवजा वाडा व पुण्याला वडिलोपार्जित शहाजीराजांची जहागिरी होती. १६२५ ते १६३६ पर्यंत त्यांना आपल्या जीवनात स्थैर्य असे कधीच लाभले नाही .शहाजी राजांचे जीवन खूप अस्थिर होते. या शाहीतून त्या शाहीत जाण्यामुळे त्यांना स्थैर्य असे कधीच लाभले नाही. अशा अस्थिर जीवनातच जिजाऊंनी आपल्या पतीला सुख -दुःखाच्या प्रत्येक प्रसंगातन खूप साथ दिली.
पुढे १६२५ च्या दरम्यान शहाजीराजे पुण्याच्या जहागिरीत आले.या सार्या धावपळीत त्यांना जिजाऊसाहेबांना प्रत्येक ठिकाणी बरोबर नेता येत नव्हते.अत्यंत धावपळीच्या जीवनात मुलाच्या जन्मप्रसंगीही उपस्थित राहता आले नाही. पुत्र जन्माचा आनंदही त्यांना आपल्या कुटुंबात राहून उपभोगता आला नाही. जिजाऊंना नेहमीच शहाजीराजांपासून दूर रहावे लागे. मोठ्या आनंदाने जिजाऊसाहेब सर्व काही सांभाळत होत्या.जिजाऊंचे वैवाहिक जीवन अत्यंत कष्टमय झाले होते.
लखुजी राजांच्या वधामुळे संतापून शहाजीराजे निजामशाही सोडून मोगलांकडे गेले होते. जाधव-भोसले वितुष्ट आल्यामुळे जिजाऊंना खूप दुःख झाले होते.चुलत दिराकडून भाऊ मारला गेला,त्याचा सूड म्हणून वडिलांनी दिरास ठार मारले. प्रत्यक्ष पतिलाही वडिलांच्या तलवारीचा वार बसला. या सार्या भीषण प्रकाराचे पर्यवसान म्हणजे वडिलांनी रागावून मोगलांची सेवा पत्करली .संसारात जिजाऊंना फारशी स्वस्थता अशी लाभलीच नाही. त्यांचे संसारिक जीवन धावपळीत, गडबडीत, संकटात व कष्टात गेले होते.तरुणपणातील जबाबदारीच्या जाणीवामुळे जिजाऊसाहेब विचारी व समजूतदार होत गेल्या.त्यांना दोन्ही कुळाचा अत्यंत अभिमान होता. जिजाऊ शांत व विचारी होत्या. कोणत्याही व्यक्तीला त्या कधीच दुखवत नसत.
शहाजीराजे नेहमी राजकारणात व लढाईत दंग असत. शहाजीराजांचा सहवास जिजाऊंना फार कमी वेळा मिळे ,पण त्याबद्दल त्यांनी कधीही तक्रार केली नाही. शहाजीराजांच्या सुखात त्या आपले सुख मानत. जिजाऊ अतिशय प्रेमळ, प्रसन्न वदन, व विनयशील होत्या. गृहिणी यानात्याने त्यांचे वर्तन आदर्श होते.जिजाऊ सर्व समाजात मिसळून लोकांचे दुःख समस्या ऐकून घेत.सर्व रयतेचे दुःख हालअपेष्टा पाहून त्यांना खूप वाईट वाटे. शहाजीराजे राज्यातील सर्व घडामोडी जिजाऊंना सांगत असत. दरबारातल्या गोष्टी, युद्धाचे प्रसंग सर्व काही ऐकून सारे राजकारण त्यांच्या लक्षात येत. सर्व परिस्थिती पाहून त्यांना दुःख होत व त्या विचार करायला लागत. सर्व राज्यकर्ते, गोर -गरिबांची काळजी न करता स्वतःचाच स्वार्थ का बघतात? रयतेची काळजी करायची नसेल तर हे लोक राज्य तरी का करताहेत?या शाह्या - पातशाह्यांना आमच्या गरीब रयतेची काळजी का वाटत नाही? आमच्या रयतेची काळजी नसेल तर येथे ते काय करतात? यांना काय अधिकार असे राज्य करण्याचा? या सरदारांचा अंमल एवढा कडक आहे की कोणीही येथे सुखी नाही. त्यांच्या हाताखाली, त्यांच्या राज्यात फक्त जमीनदार, जहागिरदार ,अमीर ,उमराव हेच सुखात आहेत .हे लोक आपल्या सुखापुढे रयतेची काहीच फिकीर करत नाहीत.यांच्यामुळेच आमच्या प्रजेच्या पदरी दुःखच दु:ख! हे शोषण कधी तरी थांबायला पाहिजे.आपलेच लोक या परकीयांच्या चाकरीत राहून आपल्याच लोकांना त्रास देत आहेत.लुटत आहेत ,लुबाडत आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करून जिजाऊ अत्यंत कष्टी होत. शहाजीराजांना जिजाऊंचा स्वभाव पूर्णपणे माहीत होता.जिजाऊंचे व्यक्तिमत्व जगावेगळे होते. त्यांना या गुलामगिरीची, पारतंत्र्याची खूपच चीड येत असत.गोरगरिबांनाबद्दल कळवळा व रयतेचे दुःख त्या चांगलेच जाणून होत्या. त्यांच्यामध्ये स्वाभिमान व न्यायाची आस होती.अशा विचारांच्या पत्नी शहाजीराजांना लाभल्या होत्या.सर्वसामान्यापेक्षा आपली पत्नी काहीतरी वेगळ्या व्यक्तिमत्वाची व वेगळ्या विचारांची आहे हे शहाजीराजांना कळून चुकले होते.वेदना आणि असह्य यातना त्यांच्या काळजापर्यंत जात होत्या.
जिजाऊ आपल्या मनीचे दुःख आपले पती शहाजीराजे यांच्याकडे व्यक्त करत होत्या.जिजाऊंच्या वेदना ,आक्रोश, तळमळ, दुःख शहाजीराजेनाही जाणवत होते.शांतपणे राजे सर्व ऐकत होते. आज ना उद्या आपल्यावर देखील असेच प्रसंग येऊ शकतात हाच एक विचार दोघांच्याही मनात घोळत होता. जिजाऊंचा प्रत्येक शब्द राजांच्या कानात घणाचे घाव घालत होता.शहाजीराजे दिवस- रात्र झटत होते. शहाजीराजांचे आणि जिजाऊंचे एकच स्वप्न होते ते म्हणजे स्वतंत्र राज्याचे आणि ते साकारण्यासाठी राजाचे आटोकाट प्रयत्न चालले होते. जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरणार होते .या सर्व घडामोडीत शहाजीराजेनी एक निर्णय घेतला, आता काहीही करून त्यांना स्वतःचे स्वतंत्र राज्य हवे होते. शहाजीराजांना जिजाऊंनी आपल्या वैवाहिक जीवनात सुखदुःखाच्या प्रत्येक प्रसंगात अत्यंत खंबीरपणे साथ दिली. जिजाऊ याच शहाजी व शिवाजी राजांच्या प्रेरणा होत्या. जिजाऊंच्या साथीमुळेच तर शहाजीराजे आपल्या कार्यात यशस्वी होत होते.
शहाजीराजांचे स्वराज्याचे स्वप्न हळूहळू मूर्त रूप घेत होते. यातच शहाजीराजांनी मोहीत्यांची सोयरीक करण्याचा म्हणजेच स्वतःच्या दुसऱ्या विवाहाचा घाट घातला होता .कारण मोहित्यांची माणसे अतिशय शूर, न्यायी आणि स्वामीनिष्ठ होती. स्वराज्याला अशा व्यक्तींची खूप गरज होती.या मोहित्यांना आपल्या स्वराज्यासाठी बांधून ठेवणे अत्यंत आवश्यक होते. म्हणूनच शहाजीराजांनी तोडगा नामी तोडगा काढून मोहित्यांशी प्रत्यक्ष नातेच जोडले.तुकाईसाहेब व शहाजी राजांचा विवाह झाला तुकाऊपासून शहाजीराजांना व्यंकोजी नावांचे पुत्र होते.छत्रपती शिवरायांपेक्षा ते वयाने लहान होते.
शहाजीराजांनी जिजाऊंवर स्वराज्य स्थापनेची सोपवलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे शिवबाला घेऊन पार पाडली होती.धन्यती आई आणि धन्यतो पुत्र
लेखन ✒️
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

जमाता जिजाऊ साहेब चरित्रमाला 🚩 भाग 8

 


जमाता जिजाऊ साहेब चरित्रमाला

🚩
भाग 8
भातवडीची लढाई,शहाजीराजांचा पराक्रम
इ.स.1623 जुलै यावेळी दिल्लीचा शहाजादा शहाजहान याने आपल्या बापाविरुद्ध बंड पुकारले. महाराष्ट्रात युद्धाचे ढग जमू लागले. मलिक अंबरन निजामशहाचा वझीर निजामशाहीच्या रक्षणासाठी विजापूरच्या आदिलशहाची मदत मागितली पण आदिलशहाने निजामशाहीला मदत करण्याऐवजी मोगलांशी दोस्ती केली. मोगल आणि आदिलशाही फौजा एक झाल्या व ऐंशी हजार फौजेनिशी निजामशाही वर चालून आल्या. त्या निजामशाहीत शहाजीराजे, शरीफजीराजे, विठोजीराजे सर्व मराठे सरदार होते.त्यात निजामशाहीचा जीव वाचवण्यासाठी मराठेच लढणार होते. या लढाईत शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला आणि दक्षिणेच्या राजकारणातील आपल्या तेजस्वी कारकिर्दीचा शुभारंभ केला.
खंडागळे हत्ती प्रकरणावरून जाधवराव -भोसले यांच्यात या घटना अगदी अनपेक्षित घडल्या ; मात्र याचा फायदा मलिक अंबर यांनी घेतला. निजामाकडे लखुजीराजे यांच्या विरोधात कान भरले.कारण ही दोन शूर घराणी कधीच एकत्र येऊ नये, अशी मलिकअंबरची इच्छा होती. लखुजी जाधवराव व शहाजीराजे सासरे -जावई म्हणजे एकदम जवळचे आप्त होते व त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.ही दोन्ही मराठा घराणे तोडीस तोड, महत्त्वकांक्षी शूर व स्वाभिमानी अशी होती. ह्या दोघांच्या पराक्रमामुळे आपले महत्त्व कमी होण्याचा धोका मलिक अंबरला वाटत होता. त्यामुळे खंडागळे हत्ती प्रकरणाचा धागा धरून मलिक अंबरने जाधव भोसले यांच्यात संघर्ष ठेवण्याचा प्रयत्न चालूच ठेवला. लखुजीराजे लगेचच मोगलांकडे निघून गेल्यामुळे निजामशहा खूपच अडचणीत आला.
लवकरच दिल्लीच्या बादशाही फौजा पुन्हा एकदा निजामशाहीवर चालून आल्या. यावेळी आदिलशाही फौजा बादशाही फौजांना येऊन मिळाल्या.शहाजी राजे यांनी गनिमी काव्याने लढून या दोन्ही फौजांना हैराण केले व शेवटी भातवडी येथे या संयुक्त फौजांचा पराभव केला.( भातवडी हे गाव अहमदनगर पासून 25 किलोमीटर अंतरावर आहे ) या लढाईमध्ये शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला.भातवडीच्या लढाईमध्ये अनेक मातब्बर मारले गेले. आदिलशाही सेनापती मुल्ला मोहम्मद, शहाजीराजांचे बंधू शरीफजी इत्यादी अनेक सेनानी रणांगणावर कामास आले. शहाजीराजांनी व सर्वच मराठ्यांनी पराक्रमाची कमाल केली . भातवडीच्या लढाईतील पराक्रमामुळे निजामशाहीच्या दरबारात शहाजीराजांची प्रतिष्ठा वाढली,खुद्द मलिक अंबरला सुद्धा त्यांचा निजामशहा कडून झालेला गौरव सहन होईना झाला. परिणामी शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग करून विजापूरच्या आदिलशाही दरबाराची वाट धरली. आदिलशहाने त्यांचा मोठा सत्कार करून त्यांना "सरलष्कर "हा किताब देऊन बादशाही कारभाराची जबाबदारी त्यांच्यावर टाकून त्यांना पुणे, सुपे परगण्याची जहागिरी बहाल करण्यात आली.
भातवडीच्या युद्धात खरेतर लखुजीराजांनी भाग घेतलाच नाही. अर्थात शहाजीराजे आणि लखुजी राजे परस्परविरुद्ध लढल्याचे दिसत नाही. शहाजीराजे व लखुजीराजे यांच्यात कायमचे वितुष्ट असते, तर या संधीचा फायदा लखूजी राजांनी निश्चितच घेतला असता. परंतु भातवडीच्या युद्धात लखूजी राजांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली आणि ते तेथून निघून गेले. यावरून जाधवराव भोसले यांच्यात कोणतेही वैर नव्हते हे या प्रसंगावरून दिसून येते.
शहाजीराजांनी आदिलशाही दरबारात आपले बस्तान बसविले होते. तरीही दरबारातील इतर सरदारांचा त्यांच्यावर रोष होता. एक मराठा सरदार अदिलशहाच्या दरबारात एवढ्या मोठ्या पदावर पोहोचतो हे त्यांना सहन होण्यासारखे नव्हते. हीच गोष्ट शहाजीराजांनी ओळखून आपल्या अवतीभोवती मराठा सरदारांची भक्कम अशी फळी उभा केली. जेणेकरून शहाजीराजांच्या राजकीय स्थानाला कोणीही आव्हान देऊ शकले नाही. आदिलशाही दरबारात मुस्लीम मानकर्यांशिवाय इतर कोणालाच वजीर करावयाचे नाही हा पायंडा शहाजीराजे आदिलशाहीत असल्यामुळे मोडला गेला.
अवघ्या दीड वर्षाच्या कालखंडात घडलेल्या या घडामोडींनी निजामशाही, आदिलशाही व मोगल सत्तेत प्रचंड उलथापालथ झाली .या घडामोडीचे शहाजीराजांच्या राजकीय कारकिर्दीवर फार दूरगामी परिणाम झाले.
शहाजीराजांनसारख्या शूर मराठी सरदारांचा उदय होऊन मराठा सरदारांना तीनही प्रमुख पातशाह्यांमधे मानाचे स्थान मिळत गेले. शहाजीराजांच्या पराक्रमाच्या दृष्टीने भातवडीचे युद्ध अत्यंत महत्त्वाचे ठरले. याच युद्धानंतर शहाजीराजे हे व्यक्तिमत्व राजकीय पटलावर विशेष चमकू लागले. शहाजीराजे व शरीफजी राजे यांनी या लढाईत विशेष शौर्य दाखवले.शरीफजीस आपल्या बाणांनी पाडणाऱ्या मोगल सैन्यावर शहाजीराजे तुटून पडले व त्यांनी मोगलांची दाणादाण उडवून दिली होती. भातवडीच्या युद्धाने निजामशाहीचा बचाव झाला म्हणून इतिहासात हा प्रसंग ही लढाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शहाजीराजांनी पराक्रमाची व ,शौर्याची शर्थ करून निजाम सरदार मलिक अंबर यांना विजय मिळवून दिला. या विजयामुळे निजाम व मलिक अंबरला खूप आनंद झाला होता. त्यांना कळून चुकलेकी शहाजी राजांच्या शौर्याचा दरारा चारही पातशाहीत विलक्षण वाढला होता.मलिक अंबरने मोगलांशी पंचवीस वर्ष जो प्रचंड झगडा केला, त्यात मालोजीराजे व शहाजीराजे पितापुत्र उत्साहाने सामील झाले आणि त्याच कारणाने युध्द व राजकारण या दोन विषयाचा बहुमोल अनुभव भातवडीच्या युद्धाने शहाजीराजांना आला.या युद्धामुळे शहाजीराजांची प्रतिष्ठा वाढली ,त्यांना वगळून दक्षिणेत कोणतेही राजकारण सिद्धीस नेणे अशक्य झाले. मुख्यता गनिमी काव्याची युद्धपद्धती हे एक उत्कृष्ट साधन अनुभवाने सिद्ध झाले. एकदम समोर सामना न करता शत्रुस दाना वैरणीचा तोटा पाडून जंगली प्रदेशाच्या आश्रयाने त्यास जिंका वयाचे .हा जो क्रम पुढे शंभर-दीडशे वर्ष मराठ्यात रूढ झाला. त्याचा आरंभ या लढाईमध्ये झालेला आहे. जहांगीर, शहाजहान, औरंगजेब या त्रयीवर गनिमी काव्याने मराठ्यांनी मात केलेली आढळते .सर्वांना शहाजीराजांच्या सामर्थ्याचा शौर्याचा धाक निर्माण झाला. निजामशाहीचा बचाव झाला व शहाजीराजांचे नाव इतिहासात अजरामर झाले.
लेखन ✒️
( इतिहास लेखिका )
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 7

 


राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला

🚩
भाग 7
जाधवराव- भोसले वैर
शहाजीराजे निजामशहाच्या म्हणजेच मलिक अंबरच्या बाजूने लढत होते. त्याचवेळी लखुजी जाधवरावही निजामशहाकडेच होते. निजामशहाने एके दिवशी दरबार भरवून मोगलांशी चालू असलेल्या लढाई संबंधात चर्चेसाठी सर्व सरदार एकत्र बोलावले होते. दरबार संपला तेव्हा खंडागळे हत्ती प्रकरण घडले व जाधव-भोसले यांच्यामधे वैर निर्माण झाले.
निजामशाही दरबारामध्ये खंडागळे नावाचा एक सरदार होता. सर्व सरदार मंडळी दरबार संपल्यानंतर आपापल्या घराकडे जाण्यास निघाले असता खंडागळे सरदारांचा हत्ती अचानकपणे बिथरला. वाटेत येईल त्याला बेफामपणे चिरडून उडवू लागला. हत्तीवर माहूत होता. तो माहूत हत्तीला आवरण्याचा प्रयत्न करत होता.पण तो बिथरलेला गजराजा ,लोकांना तुडवीत,चित्कार करीत धावतच होता. त्याने असा काही अवतार धारण केला होता की, त्याला अडवण्याची कोणाची छाती होईना; त्या पिसाळलेल्या हत्तीचा रौद्रपणा दत्ताजी जाधवराव म्हणजेच जिजाऊंचे भाऊ यांना सहन होईना. कारण हत्तीने जाधवरावांच्या अनेक स्वारांना घोड्यावरून ओढून दणादणा भुईवर आदळले व पायाखाली चिरडून मारले. दत्ताजींचे सैनिक हत्तीपुढे पराभूत झाले .हा पराभव दत्ताजींना खूप झोंबला. दत्ताजी हत्तीपेक्षा जास्त पिसाळले व थेट हत्तीवर धावून गेले. स्वतः दत्ताजी हत्तीशी सामना करू लागले. त्यांनी हत्तीवर वार करून त्याची सोंड धडावेगळी केली. खूप गर्दी व गोंधळ, धक्काबुक्की आणि रेटारेटी झाली. आपल्या हत्तीला वाचवण्यासाठी खंडागळे सरदार मध्ये पडले, त्यावेळी मालोजीराजांचे बंधू खेळोजी व संभाजी खंडागळे यांच्या मदतीला धावून आले. दत्ताजी जाधवरावांनी रागाच्या भरात आपला मोर्चा संभाजी भोसले यांचेकडे वळवला .संभाजी भोसले यांचे वरती त्यांची तलवार सपासप वार करू लागली. दोघांची खडाजंगी लढाई सुरू झाली.खडाखड एकमेकांवर धाव पडू लागले. दोन्ही पक्षात अटीतटीची झुंज सुरू झाली .क्षणभरातच दत्ताजी जाधवराव व संभाजी विठोजी भोसले एकमेकावर तुटून पडले.हत्तीचा विषय बाजूलाच राहिला व जाधवराव भोसले आपआपसात लढू लागले.संभाजीराजे व दत्ताजीराजे इतक्या आवेशाने लढत होते की,दोघांनीही आपल्या भोवती तलवारींचे तेजोवलय निर्माण केले होते.युध्द गर्जनांनी दिशा सुन्न झाल्या होत्या. नातगोत विसरून एकमेकांवर साता जन्मीचे वैरी असल्यासारखे एकमेकांवर हत्यार चालवत होते.खरेतर जिजाऊ यांच्या विवाहात ह्याच दोघांनी व्याहीभेट घेतली होती.अगदी उराउरी कवटाळुन .....आणि आता एकमेकांचे सैनिकही एकमेकांवर हल्ला करू लागले होते. दत्ताजी जाधवरावांनी भोसल्याकडील सैनिकांच्यावर प्रतिहल्ला करून अनेक लोकांना ठार मारले .हे पाहून विठोजी भोसले यांचा पुत्र संभाजी यांनी दत्ताजी जाधवराव यांच्यावर हल्ला करून त्यांचे शिर धडावेगळे केले. भुईवर तर अगदी रक्ताचा सडाच पडला होता.त्यावेळी लखुजी जाधवराव तेथे नव्हते. त्यांना व शहाजीराजांना हे वृत्त समजतात ते दोघे माघारी फिरले व आपापल्या लोकात मिसळून एकमेकांच्या वर तुटून पडले .आपला पुत्र ठार झाल्याचे पाहून लखुजीराजे यांच्या डोळ्यात अंगार फुलला. संतापाने लखुजी जाधवराव लाल झाले. त्यांच्या क्रोधाने अवघ्या दाहीदिशा शहारल्या.लखुजीराजे यांना समोर दिसले ते आपले जावई शहाजीराजे .प्रत्यक्ष जावई .लाडक्या लेकीचे कुंकू. कसली माया आणि कसली नाती .आपल्या पोटच्या गोळ्याचा अंत करणाऱ्याचा नायनाट करण्याकरिता त्यांनी आपली तलवार उपसली. या रागातच त्यांनी संभाजी विठोजी भोसले यांना ठार केले. आपला भाऊ आता वाचत नाही हे पाहून शहाजीराजे मध्ये पडले. परंतु लखुजी राजांनी संतापून आपले जावई शहाजीराजे भोसले यांच्या दंडावर तलवारीने वार केला. झालेल्या जखमेतून भळाभळा रक्त वाहू लागले. त्याचा परिणाम होऊन शहाजीराजे बेशुद्ध पडले. मलिक अंबरने मध्ये पडून आपापसातील भांडण मिटवले .या प्रकरणात जाधव-भोसले कुटुंबातील दोन जीव विनाकारण बळी गेले. यामुळे दोन्ही कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण झाले. एक तासापूर्वी कोणाला कल्पनाही नव्हती येथे असा काही भयंकर प्रकार घडेल.
जाधव-भोसले याचसाठी लग्न बंधनाने एकत्र आले होते का ?ढाली- तलवारी घेऊन लढण्यासाठी का ? आपल्या बायकांच्या कपाळीचे कुंकू रक्षणासाठी का पुसण्यासाठी ?
आता काय म्हणायचे ह्या दैवगतीला? काय नाव द्यायचे ह्या यादवीला? दत्ताजींच्या आणि संभाजीराजांच्या राण्यांचे! दोघींच्याही भाळी वैधव्य आले .बांगड्या फुटल्या.... कशासाठी? काय कारण?.... काही नाही! काय तर म्हणे एक हत्ती बिथरला .पण म्हणून काय माणसाने एवढे बिथरायचे ?
हत्तीसाठी जाधवराव- भोसले आपआपसात
झुंजले .मात्र जिजाऊंचे माहेर आपोआपच तुटले गेले. भोसले -जाधवराव कायमचे अंतरले .परंतु जिजाऊंनी सासर -माहेरच्या भांडणाचा राग आपल्या संसारावर कधीच होऊ दिला नाही.पुढे जाधव भोसले वैर फार काळ टिकले नाही.भातवडीच्या लढाईत लखुजीराजे जाधवराव व शहाजी राजे भोसले एकमेकाविरूद्ध न लढता ,लखुजीराजे निघून गेले.पुढे निजामशाहीत ते एकत्र येऊन लढाई करू लागले.
आता जाधव कुटुंबीय अश्रू ढाळत होते दत्ताजीराजांसाठी तर, भोसले कुटुंबीय रडत होते संभाजीराजांसाठी .पण जिजाऊंचे काय? त्यांनी कोणासाठी रडायचे? भावासाठी का दिरासाठी? त्या रडत होत्या मराठ्यांमधील यादवीसाठी ! पारतंत्र्यासाठी! ह्या अंधःकारासाठी.
🙏अशा या थोर जाधवराव- भोसले यांना आमचा मानाचा मुजरा 🙏
लेखन ✒️
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
( इतिहास अभ्यासक पुणे )

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 6

 


राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला

🚩
भाग 6
शहाजीराजे भोसले यांचा उदय
शहाजीराजांच्या जन्मानंतर सन 1599 मध्ये शहाजीराजांचे आजोबा बाबाजी भोसले यांचे निधन झाले. त्यावेळी शहाजीराजांचे वय अवघे पाच वर्षाचे होते.पुढे पिता मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत धारातिर्थी पडले. त्यावेळी शहाजी राजांचे वय बारा वर्षाचे होते. मालोजीराजे यांच्या मृत्यूनंतर सर्व कुटुंब काका विठोजीराजांजवळ राहत होते. मालोजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांची मनसब व जहागिरी शहाजीराजांकडेच कायम होती. शहाजीराजांचे बालपणाचे वर्णन फारसे आढळत नाही.परंतु शहाजीराजे प्रथम आपल्या मातेजवळ व नंतर आपले काका विठोजी यांच्याकडे राहून वाढले. तत्कालीन रिवाजाप्रमाणे त्यांना लढाईचे शिक्षण दिले गेले. त्याकाळात लेखन-वाचन व राज्यकारभारास आवश्यक असे सर्वसामान्य व्यवहारज्ञान देण्याची व्यवस्था त्याकाळी होती. लहान मुलांना वडिलांबरोबर दरबार, कचेरीत बसावयास लागे. त्यामुळे त्यांना मिळणारे अनुभव व ज्ञानाचा पाया भक्कम होत होता.
शहाजीराजांच्या काळात शिक्षक जे काही सांगावयाचे ते संस्कृत पुस्तकांच्या आधारेच सांगत असल्याने, संस्कृत भाषाही आपोआपच या सरदार मंडळीच्या मुलांना समजू लागत असे. तत्कालीन पद्धतीप्रमाणे आई-वडिलांच्या संस्कारातच मुले आपले ज्ञान विकसित करत असत.
मालोजीराजांच्या अकाली मृत्यूने शहाजीराजांना त्यांच्या पित्याच्या सरंजामीची जबाबदारी वयाच्या पाचव्या वर्षीच घ्यावी लागली. सहाजिकच विठोजी राजे यांनी प्रत्यक्ष कारभार पाहिला असला तरी तो शहाजीराजांना साक्षी ठेवून पाहणे प्राप्त होते.
शहाजीराजांचे वय लहान असल्याने विठोजीराजे यांनी शहाजीराजांच्या शिक्षणाची जबाबदारी फार चांगल्या रितीने पार पाडली. शहाजीराजे जरी प्रत्यक्ष कारभार पाहत नसले तरी, सदरेवर अथवा निजामशहाच्या दरबारात जाऊन आपल्या पंचहजारी मनसबेच्या जागेवर जाऊन इतर सरदारांचे मानाचे मुजरे त्यांना स्वीकारावे लागत. त्यामुळे दरबारी रितीरिवाज शहाजीराजांना लहानपणापासूनच अवगत होते.
शहाजीराजे वयाच्या पाचव्या वर्षीच निजामशाहीचे जहागिरदार झाले होते. रूपाने अत्यंत देखणे व तेजस्वी असे शहाजीराजे दिसत होते. त्यांची किर्तीही निजामशाही आणि आदिलशाहीत कदाचित इतर कुळातील सरदारांपेक्षा अधिक प्रस्तुत झालेली होती. शहाजीराजांच्या आई उमाबाई फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील असल्यामुळे त्या अत्यंत धाडसी, दूरदृष्टी असलेल्या महिला होत्या. त्यांच्या देखरेखीखाली शहाजीराजे घडले व वाढले होते .त्यांना बालपणापासूनच राजकारण, समाजकारण जवळून पाहता आले, त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला युद्धशास्त्र निपुणतेचे उच्चकोटीचे अधिष्ठान लाभले होतेच; परंतु त्यांचे मनावर चांगले संस्कारही झाले होते. त्यामुळे ते फक्त योद्धा नसून त्यांचे मन साहित्य -संगीत इत्यादी कलांकडेही आकर्षित झाले होते. मालोजीराजें कडून शूर, लढवय्येपण ,द्रष्टेपण आणि रयतेच्या सुखाला प्राधान्य देण्याचे औदार्य हे गुण पित्याकडून उचलले होते. तर आई उमाबाईराणी साहेबांकडून धाडस, दूरदृष्टी आणि गोरगरीब रयतेसाठी 'करूणा' हे गुण शहाजीराजांनी आत्मसात केले होते.
शहाजीराजे मुळातच महापराक्रमी राजे होते. त्यामुळे पुढे युद्धात त्यांची मदत मिळविण्यासाठी निजामशाही, आदिलशाही आणि मोगलशाही वेळप्रसंगी प्रयत्न करत होते. शहाजीराजे ध्येयधुरंदर व अत्यंत महत्त्वकांक्षी होते.राजनीती व प्रशासनाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते.' सत्ता ही खऱ्या अर्थाने सत्ताधीशांना नव्हे तर आम रयतेला सुखावणारी असावी, हे ब्रीद त्यांनी मालोजी राजांचाकडूनच शिकून घेतले होते. वडिलांच्या पश्चात आपल्या कारकिर्दीला निजामशाहीतून त्यांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती. मोठ्या जबाबदारीने, इमानेइतबारे आपल्यावर सोपवलेले काम व लढ्याचे नेतृत्व ते असामान्य धैर्य, पराक्रम व संयम ठेवून करत असत. मुत्सद्देगिरी ,शौर्य ,युद्धनिपुणतेत त्यांच्या एवढा प्रसिद्ध योध्दा कोणीच नव्हता. प्राचीन संस्कृती व संस्कृत विद्येचे ते महान उपासक होते. त्यांचा स्वभाव कमालीचा मनमिळावू, दूरदृष्टीचा व विकास कार्याचा ध्यास असणारा होता. शेतकरी व रयतेविषयी ते कमालीचे अस्तेवाईक होते. स्वातंत्र्याचे थोर उपासक व प्रजाहितदक्ष राजे म्हणून त्यांचा उल्लेख महत्त्वपूर्ण ठरतोच.
मराठी मातीत स्वराज्य निर्मीतीचा पाया प्रथमतः शहाजीराजांनीच घातला.आपले स्वप्न आपल्या मुलांच्या हातून साकार करून घेणारा नवा पायंडा जगासमोर ठेवणारा हा राजा होता. स्वराज्य स्थापनेची स्फूर्ती जिजाऊ- शिवरायांना देणारा व स्वातंत्र्याचा खंदा पुरस्कर्ता म्हणून शहाजीराजांचे योगदान लक्षणीय आहे.
लेखन ✒️
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

राजमाता जिजाऊ साहेब चरित्रमाला 🚩 भाग 5

 


राजमाता जिजाऊ साहेब चरित्रमाला

🚩
भाग 5
शहाजीराजे जिजाऊ विवाह
शहाजीराजे व जिजाऊसाहेब यांचा विवाह म्हणजे दोन शूर, सामर्थ्यशाली व तितकेच प्रतिष्ठित तोडीस तोड घराण्यांची सोयरीक होती.शहाजीराजे व जिजाऊसाहेब यांचा विवाह म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण घटना होती. लखुजी जाधवराव व मालोजीराजे भोसले हे तितकेच तोलामोलाचे सरदार होते. म्हणूनच त्यांच्यात नातेसंबंध घडून यावे असा विचार झाला व त्याप्रमाणे तो अमलातही आला.लखुजीराजे जाधवराव व मालोजीराजे भोसले एकत्रच पराक्रम गाजवत होते.तेव्हा दोघांनी आपल्या इच्छेनुसार विवाह निश्चित केला. जाधवराव -भोसले घराणी पूर्वीपासूनच नातेसंबंधांने जोडली होती. पूर्वीच्या संबंधांना उजाळा देण्याचाही प्रयत्न या दोन लग्नामुळे झाला .
मालोजीराजे भोसले यांची इच्छा होती शहाजीराजांचे लग्न सिंदखेडकर लखुजी जाधवराव यांची कन्या जिजाऊ यांच्याशी व्हावा. लखुजीराजे ही निजामशाहीतील फार मोठी आसामी होती.परंतु या सर्वाहूनही मोलाचा ठेवा म्हणजे त्यांची लेक जिजाऊ.जाधवरावांच्या अंगणात चमकणार्या एका चाणाक्ष चतुर चांदणीवर मालोजीराजे भोसले यांचे लक्ष खिळले होते.हीच आपली सून व्हावी अशी त्यांची खुप ईच्छा होती.
जाधवरावांची ही लेक होतीच तशी देखणी व बहुगुणी ,जशी सोन्याच्या समईतील लवलवती सोनेरी ज्योतच. चपळ, नाजूक, सुंदर ,हुशार,प्रसन्न आणि तितकीच ज्वलंत दीपकळी.हसर्या शहाजीराजांच्या शेजारी जिजाऊ शोभाव्या कशा ? अभिमन्यूशेजारी उत्तरा जशा.खरोखरच जिजाऊसारखे कन्यारत्न श्रीने पैदा केले होते!
आपले भाऊ मालोजीराजे भोसले यांच्या ईच्छेनुसार विठुजीराजे भोसले यांनी लखुजीराजे जाधवरावांशी विवाहाची बोलणी लावली .सनईची लकेर उठली. लखुजीराजे जाधवराव तर हरखूनच गेले .शहाजीराजांसारखा सोन्याचा तुकडा जावई म्हणून लाभतोय, हे पाहून ते आनंदले.लगीन घाई उडाली.कामाधामांची गर्दी उडाली . शुभ मुहूर्त पाहिला.कुंकवाचे टिळे लावले.तांबडे तुषार उडाले. दरवाज्यावर गणरायांनी आसन मांडले.मांडव पडला .बोहले सजले .
ढोल -ताशे -चौघडे- शहाजणे- सनई आपापले सूर धरू लागले.अन एक दिवस वर्हाडी मंडळी आलीच. जाधवरावांची परकरी जिजा आता लगीन साज सजली.हळद लागली .नितळ गोर्यापान पायावर हळदी कुंकवाची स्वस्तिके रेखली गेली.दो हाती हिरवा चुडा किणकिणू लागला.अंगावर मोराची हिरवीकंच पैठणी आली. भाळी मळवट भरला. त्यावर अक्षता चिकटल्या. मुंडावळ्या आणि बाशिंग भाळावर विराजले. अंगावरचे मौल्यवान सोन्या ,हिर्यामोत्यांचे दागिने, शेला अन पदर सांभाळता सांभाळता लहानग्या जिजाऊ पार दमून गेल्या.
लगीन साज ल्यायलेल्या जिजा राणीच्या भांगात रत्नजडित बिंदी चमकत होती.
सरळ नासिकेतील नथ चांदण्या फेकीत होती .कानात मोत्याचे झुबे डुलत होते. कमरेवर जडावाचा कंमर पट्टा शोभत होता. दंडावरती सुबक घडीव वाक्या होत्या. पायात तोडे , साखळ्या , जोडवी, मासोळी ,हातामधे लखलखत्या हिर्याच्या बांगड्या चमकत होत्या. वेणीवर फुलांची जाळी असून त्यात रत्नांचे रेखीव अलंकार घातले होते.टपोर्या भावभ-या नेत्रात काजळ दाटून आले होते.नखशिखांत सोन्यामोत्याने मढलेली सही सही लक्ष्मीच जणू! शहाजीराजेही लगीन साज सजले होते.त्यांनाही हळद लागली. कपाळावरील शिवगंध अधिकच हसर झालं होत.ओठांवरील मिसरूड आणखीनच काळवंडल. मस्तकावरील मुक्त केशसंभार टोपाखाली अलगत बसला होता. गळ्यात पाणीदार मोत्यांचा कंठा रूळू लागला होता.नवरदेवाचे तेज नेत्रात तळपू लागले होते.
मुहूर्ताची घटका बुडाली. तोफा बंदुकांचा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला .अंतरपाट दूर झाला . शहाजीराजांनी आपल्या हातातील पुष्पमाला जिजाऊंच्या गळ्यात घातली. शहाजीराजांच्या शेल्याची जन्म गाठ बांधून घेऊन जाधवांच्या राजकन्या जिजामाता भोसल्यांच्या राजलक्ष्मी झाल्या. शहाजीराजे आणि जिजाईचा जोडा लक्ष्मीनारायणा सारखा सुंदर दिसत होता.अहो, अभिमन्यूला - उत्तरा,शंकराला पार्वती शोभावी त्याप्रमाणे शहाजीराजांना जिजाऊ खुलून दिसत होत्या .हसर्या शहाजीराजांच्या शेजारी तितक्याच हसर्या लाजर्या जिजाऊ खरोखरच दृष्ट लागाव्या अशाच दिसत होत्या.
कोणतीही मुलगी लग्नात सुंदर दिसतेच.ते लगीन तेज असतेना! पण जिजाऊ मुळच्याच रूपाने सुंदर होत्या. त्यातून लग्नाचा साज सजलेली सही सही लक्ष्मीच.दुसरी उपमाच नाही. गोड शब्द स्वर, प्रेमळ बोलणे ,विनयी वागणे आणि प्रसन्न हसणे .अशी जिजाऊंची मूर्ती होती.
रुंद छातीच्या , पुष्ट खांद्याच्या , चमकदार डोळ्यांच्या, बळकट दंडाच्या व बाकदार नाकाच्या शौर्याने पृथापुत्र अर्जुनासारखा , दातृत्वाने विक्रमादित्यासारखा,शस्रास्रात पटाईत असणारे जावई लखुजीराजांना न आवडतील तरच नवल.
मालोजीराजांनी हा विवाह शहाजीराजे लहान असतानाच पक्का केला होता. लखुजीराजांनी योग्य ,देखणा व कर्तृत्ववान मुलगा पाहूनच सर्वसंमतीने आपली एकुलती एक कन्या देण्याचा निर्णय घेतला होता .एकूणच लग्न सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा झाला. विवाहाला एकच दु:खाची किनार म्हणजे सोहळा पाहायला मालोजीराजे नव्हते. इंदापूरच्या लढाईत मालोजीराजे धारातिर्थी पडले होते. सार्यांना खंत तेवढीच होती. मालोजीराजे स्वर्गाच्या गवाक्षातून अश्रूंच्या अक्षता टाकीत म्हणाले असतील की बाळांनो माझा आशीर्वाद आहे .उदंड आयुष्य लाभो. संसारी सुखाचे रामराज्य करा. शहाजीराजे व जिजाऊ साहेब यांचा विवाह म्हणजे दोन शूर सामर्थ्यशाली व प्रतिष्ठित घराण्यांची सोयरीक होती.
सारे विवाह विधी यथासांग पार पडताच शहाजी राजे आणि जिजाऊ जोडीने मातोश्री उमाबाईसाहेबांपुढे आशिर्वादासाठी वाकले.आपल्या सुनेचे देखणे रूप आणि शालिनता, वागणे पाहून उमाबाईसाहेबही आपले दुःख विसरल्या ,त्यांनी मोठ्या मनाने आणि भरल्या नेत्राने आशीर्वाद दिला. उमाबाई साहेबांना लेक नव्हती त्यामुळे जिजाऊंना पाहून ऊमाबाई साहेबांना अगदी धन्य धन्य वाटत होते. काका विठोजीराजांनाही धन्यता वाटली .खरोखरच भोसल्यांची भाग्यभवानी उदयाला आली होती. भोसल्यांच्या कुळात सौभाग्य आले. नवा आनंद आला .वराडची रुक्मिणी सोन्याच्या पावलांनी पुणे प्रांती आली. जिजाऊंनी सासरी येऊन आपल्या सासूचे दुःख हलके केले .सुनेच्या सहवासात उमाबाई पती निधनाचे दुःख विसरल्या.
हा विवाह म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना म्हणावी लागेल .कारण पुढे हिंदवी स्वराज्य सम्राटक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शहाजीराजे व जिजाऊसाहेब या दोघांच्या पोटी झाला.
🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
लेखन ✒️
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

राजमाता जिजाऊ साहेब चरित्रमाला 🚩 भाग चौथा

 


राजमाता जिजाऊ साहेब चरित्रमाला

🚩
भाग चौथा
भोसले घराण्याचा उदय
भोसले घराणे हे सूर्यवंशी होते. त्यांचे गोत्र कौशिक व निशानाचा रंग भगवा होता. उदयपूरचे शिसोदीया आणि दक्षिणेतील भोसले वंश एकच आहेत. सूर्यवंशात श्रीरामचंद्रापासून 125 व्या पिढीत शिसोदिया कुळाचा राजा भोसाजीचा वारस म्हणून त्यांचे नाव भोसले पडले .भोसले हे महाराष्ट्रात आणि वर्हाडात वस्ती करून होते.
छत्रपती शिवाजीराजे हे भोसल्यांच्या कुळात जन्मले.ते भोसले कूळ शहाण्णव कुळांपैकी एक क्षत्रिय कुळ आहे. देवगिरीच्या वैभवशाली यादव साम्राज्याची उपशाखा असलेले जाधवरावांचे घराणे जसे मराठ्यांमध्ये प्रतिष्ठित मानले जाते, त्याचप्रमाणे मेवाडच्या सिसोदिया वंशाच्या पराक्रमाचा वारसा सांगणारे महाराष्ट्रातील वेरुळचे भोसले घराणे हेही तेवढेच तोलामोलाचे मानले जाते.
वेरूळच्या बाबाजी भोसले यांचा जन्म स.1430 चा समजला जातो.बाबाजी भोसले यांना दोन मुले.एक मालोजीराजे व दुसरे विठोजीराजे.हे दोघेही अत्यंत पराक्रमी निपजले.यानंतर काही काळ मालोजीराजे, विठोजीराजे हे बंधू वेरूळमधे वास्तव्य करू लागले .पुढे वणगोजी नाईक निंबाळकर(फलटण) यांच्या सैन्यात राहून तत्कालीन परिस्थितीत आवश्यक असे युद्ध शिक्षण घेतले. वणगोजी नाईक निंबाळकर त्यावेळी निजामाकडे सरदार होते .वणगोजींनी मालोजीराजे व विठोजीराजे या दोन बंधूंना घोडे ,शस्त्रे ,व बक्षीस म्हणून 2 हजार सरंजाम देऊन आपल्या सैन्यात रुजु करुन घेतले. वनंगपालांनी आपल्या सैन्यासह कोल्हापूर प्रांतात केलेल्या लढाईत मालोजीराजे व विठोजीराजे यांनी चांगलाच पराक्रम केला .मालोजी राजांचा पराक्रम जेंव्हा निजामशहाला समजला तेव्हा त्यांनी खुश होऊन मालोजीराजे यांचे वडील बाबाजी भोसले यांची जप्त केलेली दीड हजारी मनसब पुन्हा मालोजीराजे व विठोजीराजे यांना परत दिली.मालोजीराजे भोसले हे निजामशाहीचे दीड हजारी मनसबदार झाल्याची बातमी लखुजीराव जाधव यांनी पत्राद्वारे वणगोजी नाईक निंबाळकर यांना दिली. पुढे लखुजीरावांच्या मध्यस्थीने वणगोजी नाईक निंबाळकर यांची कन्या दीपाबाई यांचा विवाह मालोजीराजांशी ठरवण्यात येऊन तो पार पाडण्यात आला .लखुजीराजांची पत्नी म्हाळसाबाई ह्याही नाईक -निंबाळकर घराण्यातील असल्याने जाधवराव, भोसले, नाईक निंबाळकर या घराण्याचे नातेसंबंध जुळून आले.ऊमाबाई यांचे भाऊ वणंगपाळ उर्फ वणगोजी नाईक निंबाळकर मोठे जबरदस्त व्यक्तिमत्व होते.ते विजापूरच्या अदिलशहाच्या दरबारात सरदार होते.लोक त्यांच्या शूरपणावरून म्हणत,'राव वणंगपाळ, बारा वजिराचा काळ!'
मालोजीराजांनी आपल्या पदरी हत्यारबंद मराठी जवान जमा केले.पागा सजवल्या .मालोजीराजे हत्यारबंद व फौजबंद बनले. दारात हत्ती झुलू लागले. वैभव प्राप्त झाले. आपल्या वतनी उत्पन्नाची व्यवस्था त्यांनी शहाण्या ,कर्तबगार कारभार्यांच्यावर सोपवली. स्वतंत्रपणे पदरी असा जमाव जमविणे म्हणजे धाडसाचेच होते.एरवी त्यांना बंडखोरच ठरवले असते,परंतु या वेळी मोगलांच्या सैन्यांचा निजामशाहीत धुमाकूळ चालला होता. या वेळी निजामशहाला व त्याचा वजीर मलिक अंबर याला चांगल्या लढाऊ मराठ्यांची गरज होती. निजामशहाला मालोजीराजे यांचे नाव समजल्यावर त्यांनी आपणहून मालोजीराजे यांना फर्मान धाडले.ताबडतोब मालोजीराजे दौलताबादमध्ये जाऊन हजर झाले. निजामशहाने मालोजीराजे यांना पुणे व सुपे परगण्याची जहागिरी देऊन दोघांनाही पदरी ठेवले व पंचहजारी मनसब देऊ केली.ही. या जहागिरीमुळे हाती पडेल त्याचा चांगला उपयोग करायचा हे धोरण मालोजीराजे यांनी ठरवले. राजांचे देवावरचे आणि लोकांवरचे प्रेम कधीच कमी झाले नाही. त्यांच्या जहागिरीच्या मुलखातले मावळ मराठे सावलीसारखे सुखावले .राजाने परगण्याची आबादानी केली .
मालोजीराजांच्या आणि उमाबाईंच्याा मनाला आता एकाच गोष्टीची रुखरुख लागून राहिली होती. यांना पुत्र नव्हता! दोघेही पती-पत्नी देवापाशी 'उजवा' कौल मागत होते. पुत्रप्राप्तीसाठी राजे व उमाबाई शिवाची आराधना करीत होते, व्रतवैकल्ये करीत होते ,उमाबाईं अत्यंत धार्मिक होत्या. त्यांचे एकच मागणे होते.मला एका सुपुत्राची आई कर! आणि लवकरच ऊमाबाई यांना दिवस गेले. दोघेही आनंदले .शंभू शिखरीचा राजा प्रसन्न झाला. पुत्र झाला. मुलगा फार देखणा आणि सुदृढ होता. मुलाचे नाव शहाजी ठेवले. मालोजीराजांनी खूप मोठा दानधर्म केला. पुत्र उत्सव केला .दोन वर्षे उलटली आणि त्यांना दुसरा पुत्र झाला त्याचे नाव शरीफजी ठेवले. उमाबाईंच्या मांडीवर शहाजी आणि शरीफजी खेळू लागले.पुढे याच शहाजी राजे भोसले यांचा लखुजीराजे जाधवरावांच्या कन्या जिजाऊ यांच्याशी विवाह झाला.
🚩जय जिजाऊ 🚩
🚩जय शिवराय 🚩
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...