विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 10 March 2020

वारणेचा तह

वारणेचा तह
शाहू महाराज स्वराज्यात आले तेव्हा, ताराबाई साहेब आणि संभाजी यांच्याशी शाहू महाराजांचे जुळले नाही. शाहू महाराजांना सहज जे मिळायला हवं होतं ते त्यांना स्वकीयांकडून कसे मिळाले हे सर्व जाणतात. तरी संभाजीने शाहू विरोधात जी काही परिस्तिथी उभी केली. त्यातून शाहू महाराज बाहेर आले. संभाजीचा ही हक्क स्वराज्यावर आहे हे शाहू महाराज जाणून होते. कस ही झालं तरी तरी तो आपला भाऊ हे ते जाणून होते.पालखेडवर निजामाचा पाडाव होऊन संभाजीला एकटं पडल्यागत झालं, आणि पन्हाळ्यावर परत येऊन कृष्णाजी परशुराम प्रतिनिधींचे सल्ल्याने जम बसवू लागला असता शाहूने १७३० च्या मार्चात त्यावर स्वारी करून संभाजीचा पराभव केला. ता. ८ ऑगस्ट स. १७३० रोजी शाहूराजे याजकडे जाऊन तहाची बोलणी करण्याची आज्ञा संभाजीने प्रधान नीलकंठ त्रिंबकास केली.
सातारचे शाहू छत्रपती व कोल्हापूरचे संभाजी महाराज यांच्या दरम्यान शके १६५३च्या चैत्र वद्य २ स जो तह नामा झाला त्यातील कलमे अशी होती.
तहनामा चिरंजीव राजश्री संभाजीराजे यांसी प्रति राजश्री शाहूराजे यांनी लिहून दिल्हा सुरूसन इहिदे सलासीन मया व अलफ फसली ११४० छ १६ साबान विरोधीकृत सवंत्सरे चैत्र वद्य २ स बितपसील
🔹कलम १ : इलाखा वारून महाल तहत संगम दक्षिण तीर कुल दुतर्फा मुलूख दरोबस्त देखील ठाणी व किल्ले तुम्हास दिले असत.
🔹कलम २ : तुंगभद्रे पासून तहत रामेश्वर देखील संस्थाने निमे आम्हाकडे ठेवून निमे तुम्हाकडे करार करून दिली असत.
🔹कलम ३ : किल्ले कोपळ तुम्हाकडे दिला त्याचा मोबदला तुम्ही रत्नागिरी आम्हाकडे दिला.
🔹कलम ४ : वडगावचे ठाणे ( किल्ला ) पाडून टाकावे.
🔹कलम ५ : तुम्हाशी जे वैर करतील त्यांचे पारिपत्य आम्ही करावे. आम्हाशी वैर करतील त्याचे पारिपत्य तुम्ही करावे. तुम्ही आम्ही एक विचारे राज्याभिवृद्धी करावी.
🔹कलम ६ : वारणेच्या व कृष्णेच्या संगमापासून दक्षिणतीर तहत निवृत्तीसंगम तुंगभद्रेपावेतो दरोबस्त देखील गड ठाणी तुम्हाकडे दिली असत.
🔹कलम ७ : कोकणात साळशी पलीकडे तहत पंचमहाल अकोले पावेतो दरोबस्त तुम्हाकडे दिली असत.
🔹कलम ८ : इकडील चाकर तुम्ही ठेवू नये. तुम्हाकडील चाकर आम्ही ठेवू नये.
🔹कलम ९ : मिरज प्रांत: विजापूरप्रांतीची ठाणी देखील-अथणी,तासगाव वर्गेरे तुम्ही आमचे स्वाधीन करावी.
एकूण नऊ कलमे करार करून तहनामा लिहून दिल्हा असे. सदरहू प्रमाणे आम्ही चालू. यास अंतर होणार नाही.
अशाने वारणेच्या तहाने कोल्हापूरचे राज्य निर्माण झाले. म्हणूनच वारणेचा तह हा स्वराज्यातला महत्वाचा तह मानला जातो.
संदर्भ : इतिहासमंजरी : दत्तात्रय विष्णु आपटे
: मराठी रियासत : गोविंद सखाराम सरदेसाई

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...