विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 10 March 2020

मुरार जगदेव

मुरार जगदेव
saambhar :शुभम् सरनाईक (Shubham Sarnaik),

मुरारपंडित हा मूळचा धोम गावचा ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण. हा विजापूरच्या आदिलशाही दरबारात सुरुवातीला जहागीरदार होता व पुढे १६२८-१६३५ च्या दरम्यान हा विजापूर सल्तनतीचा वजीर झाला.
१६२७-१६२८ मध्ये मुघल शासक शहाजहाँचा सरदार व सासरा आसफखान (नूरजहाँचा भाऊ , अर्जुमंद बानू उर्फ मुमताजमहल बेगमचा पिता) याला दख्खनवर पाठवले तेव्हा दौलताबादच्या वजीर फत्तेखान याने निजामशाहाला ठार करून मुघलांचा आश्रय घेतल्याने आसफखान विजापूरच्या दिशेने आला. तेव्हा महंमद आदिलशाहने त्याच्या बंदोबस्तासाठी मुरारपंतास पाठवले व मुरारपंताने आसफखानाचा खरपूस समाचार घेतला.
मुरारपंत इथेच थांबला नाही व त्याने थेट निजामशाही प्रदेशातील परिंंडा किल्ल्यावर धडक मारली व तेथील दोन इतिहास प्रसिद्ध तोफा मुलूख-ए-मैदान व कडकबीजली/धूळधाण या घेऊन तो विजापूरला परतलायला निघाला. रस्त्यात ही मुलूख-ए-मैदान तोफ भीमेच्या पात्रात बुडली पण मुरारपंताने द्राविडी प्राणायाम करून ती १४ फूट लांब व ४० खंडी वजनाची अक्राळविक्राळ तोफ पुन्हा वर काढली व २२/०८/१६३२ रोजी विजापुरास आणली पण धूळधाण मात्र बुडाली ती पुन्हा वर काढता आली नाही.
निजमशाहिवर शहाजीराजे भोसले यांनी एका अर्भकास गादीवर बसवून जेव्हा कारभार सुरू केला व आसफखान त्यांच्यावर चालून आलेला बघून मुरारपंत व रणदुल्लाखान निजामशाहिच्या मदतीला व दख्खनच्या रक्षणाला धावून गेले व त्यांनी मुघलांना पुन्हा हुसकावून लावले.
महंमद आदिलशाहाच्या हुकुमावरून मुरारपंत व रायाराव या सरदाराने १६२९ मध्ये शहाजीराज्यांची जहागिरी पुणे शहर जाळून बेचिराख केले. पुढे जाऊन त्याने जवळच पंताने दौलतमंगल किंवा मंगळगड हा किल्ला उभारला.
मुरारपंडित मोठाच धार्मिक व्यक्ती होता , त्याने भीमा-इंद्रायणी नदीच्या संगमरवरील नांगरगाव येथे संगमेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करून स्वतःची स्वर्णतुला करून घेतली. या प्रसंगी खुद्द शहाजीराजे भोसले उपस्थित होते व त्यांच्याच कल्पनेने भीमेच्या पात्रात एका होडीत हत्तीस बसवून जेवढा भाग पाण्यात बुडाला तेवढी खूण करून हत्तीस उतरवून तेथे दगडधोंडे टाकून त्याचे वजन करवून तेवढ्या वजनाचे दान मुरारपंताने केले. यानंतर उभयतांनी या गावाचे नाव तुळापूर केले जेथे १६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली.

मुरारपंडित व शहाजीराजे भोसले यांचे संबंध अतिशय चांगले होते व त्यामुळेच शहाजीराज्यांना आदिलशाहीत स्थान मिळाले व निजामशाही चालवण्यासाठी वारंवार विजापूरहून मदतही.
पण मुस्तफाखान व खवासखास यासारख्या काही आदिलशाही सरदारांना मुरारपंतासारख्या हिंदू व्यक्तीचे वाढते महत्व खटकत होते व त्यामुळे त्यांनी महंमद आदिलशाहाचे कान भरून मुरारपंताची हत्तीवर कैद करवून विजापूर शहरात धिंड काढली व शेवटी १६३५ मध्ये त्याचा शिरच्छेद करविला.
स्रोत : गो. स. सरदेसाई लिखित मुसलमानी रियासत भाग एक
चित्रस्रोत : गुगलImage result for मुरार जगदेव

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...