विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 10 November 2020

चिमाजी आप्पा पेशवे-


 चिमाजी आप्पा पेशवे-


(1707-1740)

अपत्ये-सदाशिवराव,बयाबाई

बाजीरावांच्या कीर्तामुळे बंधु चिमाजी आप्पांचे नाव पुष्कळसे लोपून गेले आहे. योग्यतेच्या मानाने पाहिल तर चिमाजी बाजीरावांहून कमी नव्हे, उलट काही काही बाबतीत ते बाजीरावाहून जास्त होते असेच वाटते.

बाजीरावाच्या दोषांवर पांघरूण घालून चिमाजीने मोठ्या प्रेमाने व आस्थेने त्यांचा चांगला पाठपुरावा केला, आपलाच हेका चालविण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. त्यांचा स्वभाव विचारी, मनमिळाऊ व धोरणी होता. दुसर्याचे मन न दुखविता युक्तीने व निश्चयाने काम करून घेण्याची हातोटी त्यांस होती. प्रत्यक्ष बाजीरावावरही त्याचा दाब असून यामुळे राज्याचे काम बरेचसे चांगले झाले.

छत्रपती शाहू महाराज व सरदारही बाजीरावाकडे एखाद्या बाबतीसंबंधाने परभारे बोलणे न करता चिमाजीच्या तंत्राने कार्यभाग करून घेत. कुटुंब
व बाहेरच्या मंडळींचे व्यवहार चिमाजी परभारे उलगडीत असे; जरूर तेव्हाच बाजीरावास विचारी.

राज्यकारभारात पुढे दिसून आलेले नानासाहेबांचे धोरण त्यांनी चिमाजीपासून उचलले असावे असे दिसते. कुटुंबातील लग्नकार्ये, आप्तसोयर्यांचा परामर्ष, तीर्थयात्रा, दानधर्म इत्यादि गृहकार्याचे प्रकार बहुदा चिमाजी उलगडत असे.

शाहु महाराजाचे मन तर चिमाजींनी व विशेषतः नानासाहेबाने आपल्या अंकित करून घेतले
होते. रघुनाथरावांची मुंज व सदाशिवरावांचे लग्न ही कार्य पुण्यास १७४० च्या फेब्रवारीत एकत्र झाली, तेव्हा बाजीराव स्वारीत असल्याने शाहू महाराज सातार्याहून पुण्यास आले ते चिमाजी व नानासाहेब यांच्या आग्रहावरून.

कित्येकदा बाजीरावाशी सरदारांचे खटके उडत,
त्यांची समजूत चिमाजी करी. बाजीराव बाहेर स्वारीत व राजकारणांत निमग्न असल्यामुळे तळावरचे बैठे व्यवहार चिमाजीला पाहावे लागत.

चिमाजींच्या शौर्याची कसोटी वसईच्या युद्धात लागलीच आहे. हबशावरील मोहीम
बाजीरावांनी अर्धवट टाकली ती चिमाजींनी सिदी सातास ठार मारून यशस्वी केली, गिरिधर बहादूर व दयाबहादूर यांस चीत करून माळवा प्रांत काबीज करण्याचे श्रेय चिमाजींस आहे. गुजरातचे व्यवहार तर बहुतेक त्यांनीच उलगडले. १७३७ ची फिरंग्यावरील मोहीम अपूर्ण राहिली होती ती चिमाजींनी १७३९ मध्ये पुर्ण केली.

पुढे सदाशिवरावभाऊंच्या अंगात आपल्या बापाची तडप चांगलीच उतरली होती असे दिसते.

बाजीराव व चिमाजी दोघेही बंधु अल्पायुषी ठरले.
दुहीमुळे जितके मराठशाहीचे नुकसान झाले तितकेच बहुधा बाजीराव, चिमाजी, नानासाहेत्र, विश्वासराव, माधवराव आणि सदाशिवराव अशा पराक्रमी पुरुषांच्या अकाली मृत्यूने झाले हे स्पष्ट दिसते.

©maratha_riyasat

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...