विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 10 November 2020

श्रीमंत बाजीराव पेशवे

 


श्रीमंत बाजीराव पेशवे


कार्यकाळ- (1720-1740)

श्रीमंत बाजीराव पेशवे यांना १७ एप्रिल १७२० रोजी
पेशवाईची वस्त्रे मिळाली आणि बरोबर वीस वर्षानी २८ एप्रिल १७४० रोजी त्यांचे देहावसान झाले. वयाच्या विसाव्या वर्षी राज्याचा भार अंगावर आल्यापासून सालोसाल त्यांनी कित्येक स्वार्या केल्या, त्यातल्या सर्वांत विजय मिळवले, यशस्वी रणसंग्राम करून मराठा स्वराज्याचे रूपांतर मराठा साम्राज्यात केले व मराठेशाहीची वृद्धि केली.

वीस वर्षात एवढा पराक्रम केल्याची उदाहरणे दुर्मीळच म्हटली पाहिजेत. बाजीरावांना पेशवाई देऊ नये असे पुष्कळ जाणत्याचे मत असताना देखील शाहूंनी केवळ अंतःस्फूतीने त्यांच्यावर अशा अल्पवयात राज्याचा भार टाकला हे एक प्रकारचे धाडसच होते. पण हे धाडस बाजीरावांनी यशस्वी करून दाखविले, यात शाहूंची योजकता व बाजीरावांचे कर्तृत्व हे दोनही गुण व्यक्त होतात.

अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या खालोखाल मराठ्यांच्या इतिहासात बाजीरावांची योग्यता समजतात ते सर्वथा युक्तच होय. अंतसमयी शिवरायांचे वय पन्नासी उलटून गेले होते, तर पेशवा बाजीराव चाळीशी उलटण्यास तीन महिने वीस दिवस कमीच होते. दोघांचाही अंत उद्वेगकर बनला, बाजीरावांना भर उमेदीत राज्याचा पसारा सोडून अकम्मात प्रयाण करावे लागले, महान पराक्रमी माणसांना मृत्युही कठोरच येतात.

शिपाईगिरी व राजकारण या दोनही बाबतीत बाजीराव पूर्ण तरबेज असून त्यांच्या जोडीस बंधु चिमाजी आप्पा किंबहुना अनेक बाबतीत काकणभर जास्त असा असल्यामुळे उभयतांकडुन अल्पावकाशात अपूर्व कामगिरी झाली, या दोघा बंधूंच्या सामर्थ्याने मराठेशाहीची मोठी मजल गाठली गेली.

बाजीरावांजवळ तोफा नव्हत्या आणि निजाम वगैरे मोगल सेनानींजवळ जय्यत तोफखाना हाताशी असताही केवळ गनिमी काव्याच्या हिकमतीवर बाजीराव पेशव्यांनी त्यास प्रत्येक संग्रामात नामोहरम केले. त्यातून पुढील अंदाज अगोदर बांधून आपल्या हातून प्रसंग निभावणार नाही असे दिसताच युक्तीने तात्पुरती माघार घेऊन पुनः योग्य प्रसंग साधून शत्रूवर मात करणे हे कसब बाजीरावांचे होय.

भोपाळचा संग्राम निजामाबरोबर खेळून बाजीरावांनी यशस्वी करून दाखविला हे त्यांच्या चतुरतेचे उत्कृष्ट उदाहरण होय. वेळेवर माघार घेण्याचे बाजीरावाचे कसब पुढे सदाशिवराव व रघुनाथराव यांच्या ठिकाणी नसल्यामुळे त्यांस पुष्कळदा अपयश आले होते.

वीस वर्षाचा तरुण मुलगा राज्यकारभार अंगावर घेऊन तो अल्पावकाशात यशस्वी करून दाखवितो अशी उदाहरण जगाच्या इतिहासात देखील फारशी मिळणार नाहीत.

अशा महान पराक्रमी आजन्म यशस्वी वीरास केवळ मस्तानीच्या घटनेत अडकवून ठेवणे अयोग्य नाही काय!!!

लेखन- 
मराठा रियासत
 

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...