संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न का झाले नाहीत
भाग २
पोस्तसांभार : आदित्य गोखले
संगमेश्वर आणि शिर्के
संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी कैद करण्यात आले - संगमेश्वर - ती जागा लक्षात घेणे गरजेचे आहे. कोल्हापूर आणि सातारा खालचा सह्याद्रीचा प्रदेश - श्रुंगारपूर , संगमेश्वर, सध्याचा चांदोली अभयारण्याचा प्रदेश तसेच प्रचितगडचा भाग हा सह्याद्रीचे खर्या अर्थानी रौद्र रूप प्रदर्शित करणारा भाग. हा संपूर्ण प्रदेश उत्तुंग डोंगररांगा, अतिशय दुर्गम असे घाट रस्ते आणि गर्द जंगल-झाडीनी परिपूर्ण असा भाग आहे - इथे कुठलाही गनीम छत्रपतींवर कुरघोडी करेल ही कल्पनाही करवत नाही. परंतु ह्या दुर्गम डोंगराळ भागाचा ताबा अशा लोकांकडे होता जे खरे तर स्वराज्याचे मातब्बर सरदार, पण निदान त्या वेळी तरी त्यांचे छत्रपतींशी वितुष्ट होते - सरदार शिर्के. सरदार गणोजी शिर्के हे खुद्द संभाजी महाराजांचे मेव्हणे पण त्या वेळी दोघांचे संबंध बिघडले होते कारण शिर्क्यांना वतन बहाल करायला महाराजांनी नकार दिला होता. तरीही ह्या भागात गनिमाला स्वराज्याच्या आतून मदत मिळाल्याशिवाय संभाजी महाराजांवर कुरघोडी करणे शक्य नव्हते आणि दुर्दैवाने अगदी असेच घडले.
ऐतिहासिक लिखाण सांगते की संभाजी महाराज रायगड हुन शृंगारपूर-संगमेश्वर भागात आले ते शिर्क्यांशी भांडण मोडून काढायला. शिर्क्यांनी कवी कलशांवर हल्लाबोल केला होता आणि त्यांची परिस्थिती इतकी अवघड झाली की त्यांनी पळून खेळणा(विशाळगड) ला आश्रय घेतला.संभाजी महाराजांना त्यांच्या मदतीसाठी स्वतः तातडीने यावे लागलं. शिर्क्यांची आघाडी मोडून काढत संभाजी महाराजांनी मोगली आक्रमणाखाली असलेल्या व फितूरीला जवळजवळ बळी पडलेल्या पन्हाळ्याची व्यवस्था लावली. त्यानंतर ते काही दिवस विशाळगडावर होते.तिथली व्यवस्था लावून संभाजी महाराज, कवी कलश, म्हाळोजी घोरपडे आणि इतर लोकांनी संगमेश्वर गाठले. ह्या ठिकाणी बरेचसे समकालीन इतिहासकार असे म्हणतात की कवी कलश ह्यांनी बांधलेल्या भव्य वाड्यात महाराज ऐषोआरामात दंग होते - इतके की त्यांच्या गुप्तहेरांनी मोगल फौज येत असल्याची वर्दी देऊन ही त्यांनी त्याकडे कानाडोळा केला.एकूण त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करता हे सगळं सपशेल खोटं आणि अशक्य वाटतं. खरंतर महाराज आणि इतर लोक त्या वेळी कसबा संगमेश्वरच्या सरदेसाई वाड्यात राहिले होते - इथेच त्यांना मुकर्रब खानाने कैद केले. सरदेसाई हे शिवाजी महाराजांच्या काळापासूनचे स्वराज्याचे कारभारी होते त्यामुळे त्यांचा वाडा हा ऐषोआरामाचा अड्डा असेल हि शक्यताच नाही.
ह्या सर्व घटनाक्रमाचा आधीची एक घटना खूप महत्वाची आहे. मोगल सरदार शेख निझाम हैद्राबादीला (ज्याला मुकर्रब खान हा खिताब बहाल होता) किल्ले पन्हाळा सर करायच्या मोहिमे वर रवाना करण्यात आले होते. त्याचा मुक्काम त्यावेळी कोल्हापूर भागात होता. अशी एक शक्यता वाटते की वरवर जरी पन्हाळा जिंकायची मोहीम असली तरी त्यात एक गुप्ता योजना असावी. शिर्क्यांनी काही कुरापत काढून संभाजी महाराजांना रायगड उतरायला लावायचा आणि त्यांच्याशी शृंगारपूर-संगमेश्वर भागात लढाई करायला भाग पडायचे.त्या नंतर त्यांच्याशी सला करून त्यांना थोडे दिवस ह्याच भागात राहायला भाग पडायचे. अगदी ह्याच सुमारास मुकर्रब खानाने कोल्हापूरहुन निघून काही फितुरांच्या मदतीने आंबा घाट उतरून संभाजी महाराजांना पकडायचा प्रयत्न करायचा. हि योजना खरी मानली तर ह्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते की थेट रायगड गाठण्या ऐवजी महाराज व इतर लोकं संगमेश्वरला एखाद दोन दिवस का होईना पण का घुटमळले . दुसरी शक्यता अशी की आधी सांगितल्या प्रमाणे हा प्रदेश इतका दुर्गम आणि अवघड होता कि त्यामुळे इथे गनिमा पासून धोका नाही असा साहजिक आति आत्मविश्वास बाळगला गेला. असे दिसते की संभाजी महाराजांनी संगमेश्वरला थांबून रयतेचे काही निवाडे निर्णयी लावले तसेच तळ कोकणात नुकत्याच फितूर झालेल्या काही देशमुख-सावंतांची खबर घेतली. एका रक्तरंजित चकमकीनंतर, ज्यात सरनोबत म्हाळोजी घोरपड्यांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले, संभाजी महाराज आणि कवी कलश ह्यांना २ किंवा ३ फेब्रुवारी १६८९ ला जिवंत कैद करण्यात आले.
No comments:
Post a Comment