विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 5 June 2021

शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाची प्रेरणा

 


शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाची प्रेरणा -
शिवछत्रपतींचा राज्याभिषेक अखंड हिदुस्थानचं कालचक्र ज्या घटनेमुळे सुवर्णयुगापर्यंत उलटं फिरलं ती महत्वाची घटना.अखिल हिंदूंच्या मनाला सामर्थ्याची जाणीव करून देणारा सोहळा.ह्या एकाच घटनेमुळे अखंड हिंदुस्थानच्या राजकारणाचा गुरूत्वमध्य गंगा यमुनेच्या आसमंतातून कृष्णा गोदावरीच्या खोर्यात विसावला .ह्या घटनेचे श्रेय काही इतिहासकार गागाभट्टांना ,समर्थ रामदास स्वामी ह्यांना तसेच जिजाऊ आईसाहेबांना देतात.
राज्याभिषेक का करून घेतला ह्याची काही प्रमुख कारणे आपल्याकडे कायम सांगितली जातात
पैकी ब्राह्मणांना शासन करण्यासाठी हे विद्रोही म्हणतात.तर हिंदू धर्मास उर्जिताअवस्था प्राप्त करून देण्यासाठी राज्याभिषेक होता किंवा क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी पर्यायाने समाजमान्यता मिळण्यासाठी.
खर तर,स्वतंत्र सार्वभौम राज्य हि संकल्पना शहाजी महाराजांची .शहाजी महाराजांचा निजामशाही राजकारणाचा खेळ जेव्हा मोगल व आदिलशाहि ह्यांनी संपवला तेव्हा आदिलशाहि ची ताबेदारी स्विकारून शहाजी महाराज कर्नाटकी स्थिरावले.बहामनी राज्याच्या स्थापनेपासून हिंदुस्थानचे लक्ष दक्षिणेकडे स्थिरावले.यादवांचे हि सर्व लक्ष गुजरातेत ,माळव्यात व पर्यायाने उत्तरेतच होते .उत्तरेच्या लढाऊ जमाती मुसलमानांच्या मांडलिक झाल्या होत्या क्षत्रियत्वाचे मेरूमणि मुघलांचे जनानखाने भरत होते .मात्र दक्षिणेत विजयनगरचे साम्राज्य घडत होते.धर्म संस्कृती ह्या बाबतीत जेवढे दक्षिणेचे योगदान बळकट करण्यात आहे तेवढे उत्तरेचे नाही.हरिहर आणि बुक्का स्वधर्मात घेणारे विद्यारण्यस्वामीं सारखे धर्मधुरंधर दक्षिणेत होते.शुद्धिबंदीच्या धार्मिक बेड्या दक्षिणेत तुटल्या.आदिलशाहि यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना विजयनगरचे वारसदार नायक बनून स्वतःच्या दरबारात का होईना रीतिरिवाज पाळत होते.आदिलशाहिची ताबेदारी स्विकारल्यावर शहाजी महाराजांचा ह्या स्थानिक हिंदू संस्थानांची संबंध आला.स्वतंत्र राजाचा मानमरातब ते बंगलोर मुक्कामी उपभोगत होते .
राधामाधवविलासचंपूसारख्या अस्सल साधनात शहाजी महाराजांची उमटलेली जीवन शैली हि स्वतंत्र राजाला साजेशी असलेली दिसते.शहाजहान ने आदिलशाहि ला शहाजीस सह्याद्रीत न ठेवणे ह्या अटीचे उत्तर हे शहाजी महाराजांच्या स्वतंत्र वृत्तीत आहे.इ स १६४२ च्या वैशाखात
बंगळूर हून पुण्यास परतताना शहाजी महाराजांनी बालशिवाजींना स्वतंत्र ध्वज,पेशवा,डबीर,सरनौबत,सबनीस,मुझुमदार असे अधिकारी नेमून दिलेत.महाराजांच्या सुरवातीच्या काळात दिसणारे जेधे,पासलकर हे शहाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेले दिसतात.शिवमुद्रेत असलेले 'विश्ववंदिता "हे शब्दच सार्वभौमत्वाचे प्रतिक आहे.
महाराजांनी समाजमान्यता व दिलेल्या निर्णयास वजन मिळावे म्हणून राज्याभिषेक केला हा चुकीचाच प्रवाद.भोसल्यांचे कुळ मालोजीराजांपासूनच तालेवार होते हे त्यांच्या तत्कालीन सोयरिकीवरून स्पष्ट होते.जावळीच्या मात्तबर मोरे घराण्याचा वारस आदिलशाहिचा ताबेदार असून सव्वीस वर्षाचे शिवाजी महाराज बसवतात .ते महाराजांच्या तत्कालीन समाजमान्यतेचे द्योतक आहे.
सार्वभौम राज्याची कल्पना महाराजांची अफजलखान वधावेळीस पक्की झाली होती.अज्ञातदासाच्या पोवड्यात निरवानिरव करताना महाराज उमाजीस नेमावे हे सांगतात.इ.स१६४८ च्या पुरंदर तहानंतर हि मन्सबदारी शंभूछत्रपतींच्यावर ढकलून महाराज हेतूपूर्वक स्वतंत्र राहतात.रागाच्या भरात का होईना महाराज औरंगजेबाची खिल्लत नाकारतात.महाराजांची तत्कालीन वागणूक एका स्वतंत्र राजासारखी होती हे परकालदास तेव्हाच नोंदवतोय हे विशेष.
रामदास स्वामींचा महाराजांशी संबंध निखळ अध्यात्मिक स्वरूपाचा आहे तो राजकीय किंवा राज्याभिषेकाच्या प्रेरणेसाठी कधीच नव्हता. .तर गागाभट्टांची नेमणूक हि केवळ राज्याभिषेकाच्या विधींच्या पूर्ततेसाठी होती.महाराज इंग्रजांशी झालेल्या व्यापारी मसलतीत इंग्रजांच्या चलनाचे चलन स्वराज्यात नाकारून स्वतःचे विजयनगरच्या धर्तीवर सुवर्ण होन पाडतात.शेजवलकरांसारखे व्यासंगी इतिहासकार ह्याकडे लक्ष वेधताना महाराजांना दक्षिणेकडच्या विजयनगरच्या साम्राज्याचे आकर्षण होते हे सुचवतात.दक्षिणेचे पातशाही आम्हा दक्षिणियांच्या हाती हे सुत्र ह्या ह्या भावनेतून उमटले असावे.अजून एक महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांनी हेच राजकारण पुढे सुरू ठेवले.इ.स १६८०रोजी संभाजी महाराजांनी स्वतःच्या मुद्रेत जे बाकरेशास्त्रींना दानपत्र दिले त्यात ..
नमस्तडःगशिरश्र्चुम्बिचन्द्रचामरचारवे
त्रैलोक्यनगरारम्भूमूलस्तम्भाय शम्भवे ।।
हा विजयनगरच्या राजाच्या दानपत्राच्या आरंभी आलेला श्लोक लिहितात.
महाराजांनी राज्याभिषेक केला तो इथल्या संस्कृतीच्या नैतिक विजयासाठी हे राज्यव्यवहारकोशाच्या निर्मिती वरून स्पष्ट दिसते.गागाभट्टकृत समनयन ग्रंथात २६२ श्लोकात गागाभट्टांनी वेदांचा अधिकार सर्व वर्णांना आहे हे सांगितले.कायस्थधर्मप्रदीप पाठीमागील शिवछत्रपतींची भूमिका राज्यकारभारातील प्रमुख जातींमधील ऐक्य ह्या साठीच होती.
महाराजांच्या राज्याभिषेकाची प्रेरणा हि त्यांच्या तीर्थरूपांच्या विजिगीषू वृत्तीमधून आली होती.त्याला सर्वस्वी कारण महाराजांचं आरस्पनी कर्तुत्व होतं.आज आमची संस्कृती ज्या उन्नत अवस्थेत आहे त्याला कारण नुसता महाराजांचा वैयक्तिक राज्याभिषेक नसून तो इथल्या खचलेल्या मनावर केलेला शिवछत्रपतींचा राजसंस्कार होता.
-सचिन शिवाजीराव खोपडे देशमुख.
प्रांत बारा मावळ परिवार.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...