विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 12 January 2022

सरलष्कर दरेकर गढी - आंबळे

 




























सरलष्कर दरेकर गढी - आंबळे

postsaambhar ::

Saurabh Madhuri Harihar Kulkarni

#पुढचीमोहीम

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आंबळे गावात सरलष्कर दरेकरांची ऐतिहासिक गढी आहे. आंबळे हे गाव सासवडपासून माळशिरस घाट रस्त्यावर १८ कि.मी अंतरावर आहे. गावात प्रवेश करतानाच गढीचा भव्य तट पहायला मिळतो. येथे दोन वाडे पहायला मिळतात. एक वाडा आता काही प्रमाणात नवीन बांधकाम करून खिळ्यांच्या भव्य प्रवेशद्वार व बुरूजासह बांधलेला आहे. त्याच्या समोरच दगडी तटबंदीचा अजून एक भव्य वाडा आहे. तो दुमजली आहे आणि आकर्षक आहे. आतमध्ये लाकडी कलाकुसर आणि भव्यपणा पहायला मिळतो. काळाच्या ओघात काही ठिकाणी पडझड झालेली पहायला मिळते तर काही ठिकाणी नवीन बांधकाम या गढीबाहेर एक पुरातन बारव आहे ती खूपच मोठी आहे आणि बांधण्याची रचना वेगळीच आहे. समोरच एक तटबंदी असलेला अजून एक वाडा दिसतो तो म्हणजे देऊळ वाडा. वाड्यात ५ मंदिरे आहेत. श्रीराम मंदिर एकदम अप्रतिम. तुळजाभवानी, विष्णू व गरूड यांचे मंदिर आहे.
इ.स.१७५७ मध्ये कर्नाटकामधील कडाप्प्याचा नवाब अब्दुल मजिदखान याच्यावर केलेल्या स्वारीत खंडेराव दरेकर यांनी पराक्रमाची शर्थ केली. कोलार, होसकोट, बाळापूर हा परिसर कडप्पा संस्थानात येत होता. नवाव अब्दुल मजिदखान याने मराठ्यांना खंडणी देण्यास नकार दिला. म्हणून सप्टेंबर १७५७ च्या सुमारास कडण्यावर मराठ्यांनी स्वारी केली. कडाप्प्याच्या किल्ल्यावर मोर्चे लावले. इ.स. २४ सप्टेंबर १७५७ या दिवशी अब्दुल मजिदखानाबरोबर घनघोर लढाई झाली. मराठ्यांच्या वतीने खंडेराव दरेकर, इंद्रोजी कदम, सोनजी भापकर, विसाजी कृष्ण विनीवाले लढले. या युद्धात नवाब मारला गेला. खंडेराव दरेकर यांनी पराक्रमाची शर्थ केली. मराठ्यांनी शत्रूचे ९ हत्ती, ५०० घोडे जिंकून आणले. नवाबाचे ४०० सैन्य ठार झाले व १ हजार सैनिक जखमी झाले. या युद्धात संभाजी बाजी घोरपडे मृत्यू पावले. शत्रुपक्षाने १० लाख रुपये कबूल केले व तह झाला. याबद्दल नानासाहेब पेशव्यांनी खंडेराव यांना तर्फ कडेपठार यातील मौजे 'आमळे' हा गाव इनाम दिला. त्या इनामाच्या सनदेमध्ये पेशवे लिहितात. "तुम्ही बहुत राज्यात एकनिष्ठपणे सेवा करीत आलात व सालगुदस्त अब्दुल मजदखान पठाण संस्थान कडप्पे याचे लढाईत जीवाची आशा तीलतुल्य न धरिता सिपाईगिरीची शर्त केली. हे जाणोन तुम्हावरी कृपाळू होऊन मौजे आमळे हा गाव इनाम दिला."
इ.स. १३ डिसेंबर १७७२ रोजी छत्रपती रामराजा यांनी नारायणराव यांना पेशवाईची वस्त्रे दिली तेव्हा त्या वेळी अष्टप्रधानांनाही वस्त्रे देण्यात आली. मुजुमदार, चिटणीस, वाकनीस ही पदे पूर्वीच्याच आसामींना दिली. 'सरलष्कर पदाची वस्त्रे 'खंडेराव दरेकर यांना दिली. भोसले बंधू, मुधोजी-सावाजींच्या इ.स. १७७२-७३ मध्ये झालेल्या बेबनावप्रसंगी जो कलह झाला त्या वेळी एलिचपुरचा नवाब मुधोजींस मिळाला म्हणून साबाजींनी एलिचपूरावर स्वारी केली. महिना-पंधरा दिवस लढण्याचा निकर झाला. साबाजींनी आपला वकील भवानी शिवराम यास मराठयांकडे पाठवून फौजेची मागणी केली. त्यावरून पेशव्यांनी २५ हजार फौज खंडेराव दरेकर यांच्या हाताखाली साबाजीच्या मदतीस पाठविली. साबाजी आणि खंडेराव दरेकर यांनी एलिचपूर येथे मोर्चे बसविले.
दरेकरांच्याकडे इ.स. १७९५ साली १ लाख १६ हजार ८५ रुपयांचा सरंजाम होता. त्यामध्ये त्यांच्याकडे मामले बीड व पाथरी येथील चौथाई अंमल व पुणे प्रांतातील आम हा गाव इनाम व मौजे जलगाव, उंडवडी व नायगाव या तीन गावांचा मोकासा भडारे येथील आबडपैकी चौथाई अंमल, माळवा, सागर परगणे, तरेपरड इ. गावांतील एकूण सरंजाम. वरीलप्रमाणे खर्डाच्या लढाईच्या प्रसंगी खंडेराव दरेकरांचे सुपुत्र हणमंतराव यांनी पराक्रम केल्याची नोंद आढळते.
याच घराण्याची एक शाखा भोसरे,ता.खटाव ,सातारा येथे आहे..श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी श्रीमंत सरदार सयाजी दरेकर यांना भोसरे, लोणी, वडखल, खातगूण,खटाव,हुसेनपूर , किल्ले महिमानगड या आणि इतरही गावांमध्ये मोकासा दिला होता... याच श्रीमंत सरदार सयाजी दरेकरांचे सध्याचे वंशज भोसरे,ता. खटाव येथे आहेत..तसेच आंबले येथेही त्यांचा वाडा आहे...
साभार - डाॕ सदाशिव शिवदे सर
टीम - पुढची मोहीम

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...