विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.
......होयसळांकडून या पाच भावांकडे सत्ता कशी आली हा एक संशोधनाचा विषय आहे व यासंबंधी अनेक प्रवाद चर्चिले जातात. पण हे बंधू होयसळांच्या पदरी सरदार असावेत व नंतर त्यांच्या हातात ही सत्ता आली किंवा त्यांनी ती घेतली या प्रवादावर विश्वास ठेवायला हरकत नाही. या भावांपैकी तिघे पूर्व किनार्
यावरील नेल्लोर ते पश्चिम किनार्
यावरचे बेळगाव ही सरहद्द सांभाळत होते. सध्याचा दक्षिण महाराष्ट्र हा हरिहरच्या ताब्यात होता व तो उत्तरेच्या मुसलमानांना थोपवून धरत होता. दुसरा भाऊ होता कंप. याचे उदयगिरीराज्यम नावाचे राज्य पूर्वकिनार्
यावर होते. मधला भाऊ बुक्क जो इतिहासात पसिद्ध आहे हा विशेष कर्तबगार असून त्याच्या ताब्यात होयसळांचे हळेबीड, पेनुगोंडचा किल्ला व आसपासचा प्रदेश होता. अजून दक्षिणेकडे शिमोगाजवळ अरग येथे एक भाऊ राज्य करत असे व शेवटचा भाऊ बुक्कच्या हाताखाली सरदार होता.
इस्लामशी टक्कर घेऊन हिंदू धर्माचे रक्षण करणे हे यांचे ध्यय होते. यांनी अत्यंत हुशारीने विजयनगर ही मध्यवर्ती सत्ता मानून आपले साम्राज्य उभे केले होते व मुसलमानी सत्तेला न जुमानता त्यांच्या छाताडावर पाय देऊन ते ताठ मानेने राज्य करत होते. त्या काळातील परिस्थितीचे आकलन ज्यांना आहे त्यांना हे काम किती अवघड होते याची कल्पना येऊ शकेल.
उत्तरेत काळाच्या ओघात हिंदू संस्कृती वरीच नष्ट झाली. भारतात हिंदूंची संस्कृती, त्यांचा धर्म, त्यांच्या कल्पना, त्यांच्या काव्य शास्त्र विनोद या विषयीच्या कल्पना याचे दृष्य स्वरूप कोठे दिसत असेल ते फक्त दक्षिणेकडेच..व याचे श्रेय जाते विजयनगरला हे निर्विवाद.....
वर आपण या राजांनी उत्तर सीमा सुरक्षित करण्यासाठी तयारी चालवली होती हे आपण बघितले. पण वीरबल्लाळचे मदूरा काबीज करायचे स्वप्न कोणी पुरे केले हे बघूयात. बुक्करायाचा कम्पराय नावाच जो मुलगा होता त्याने हे काम तडीस नेले. हा कम्परायही बुक्कप्रमाणे मोठा शूर व कर्तबगार होता यात शंका नाही. याचे शत्रूही याला नावाजत. त्याच्या कारकीर्दीत त्याने दाखवलेल्या कर्तबगारीची वर्णने त्याच्या पत्नीने लिहिलेल्या एका “कम्पराजविजयम” या संस्कृत काव्यग्रंथात आढळतात. त्या काळात एखादी राणी एखादे काव्य रचते यावरून त्यावेळी हा प्रदेश कसा सुसंस्कृत असेल हेही लक्षात येते. या राजघराण्यांमधे अनेक थोर ग्रंथरचनाकार व दी्र्घका्व्ये रचणारे होऊन गेले. मुसलमानांची हकालपट्टी केल्यावर त्याने त्याप्रित्यर्थ मुसलमानांनी उध्वस्त केलेली श्रीरंगम व मदूरा येथील देवळे पूर्णपणे नव्याने बांधून काढली. त्या देवळांवरचे हिंदू झेंडे जणू मुसलमानांपासून आता सुटका झाली आहे हे मोठ्या डौलाने फडकत सांगत होते. पण या सगळ्याला चौदावे शतक संपत अले होते. पाच भावांपैकी हरिहर व कंप मरण पावले होते तर बुक्कही खूपच वृद्ध झाला होता. ठिकठिकाणी अनेक हिंदू राजे आपले राज्य सांभाळून होते पण एकत्रीत असे काही राज्य स्थापन होत नव्हते. हा मान शेवटी बलाढ्य कम्परायला मिळाला.
त्याने बुक्काच्या मृत्यूनंतर (१३७८ साल असावे) दूसरा हरिहर असे नाव धारण करून स्वत:ला विजयनगरच्या साम्राज्याचा पहिला सम्राट म्हणून घोषीत केले.
या दुसऱ्या हरिहराचा गोतावळा बराच मोठा होता व पहिल्या हरिहराच्या मुलांचा कोठे उल्लेख आढळत नाही. पहिल्या कम्पाला एक मुलगा असल्याचा भक्कम पुरावा उपलब्ध आहे पण तरी सुद्धा तिसर्या भावाच्या मुलाला गादीवर बसविण्यात आले यावरून जो कर्तबगार, त्यालाच राजा म्हणून निवडायचे धोरण प्रधानांनी व सरदारांनी स्वीकारले होते हे कौतूकास्पद आहे. थोडीफार कुरकुर झाली असणार पण इतिहासात त्याचा विशेष उल्लेख नाही. या राजावर आता साम्राज्याचे संघटन, सुव्यवस्था व हिंदूंचे स्वतंत्र राज्य असून हिंदूंकडे वाकड्या नजरेने पहाणार्यांचे डोळे काढले जातील अशी जरब बसविण्याची जबाबदारी येऊन पडली. ती त्याने मोठ्या निर्भयतेने, कुशलतेने व पराक्रमाने निभावली असे म्हणायला हरकत नाही. याने अनेक पदव्या धारण केल्या होत्या व त्यातील बहुतेक "वेद प्रणीत नियमांचे व राष्ट्र स्थापन करणारा” या अर्थाच्या आहेत. हे वेद प्रणीत हिंदू धर्मस्थापनेचे शंकराचार्यांचे कामही त्याने स्वत:च्या अंगावर घेतेले होते यावरून त्याच्या समर्थ्याची कल्पना येऊ शकते. त्याच्या सुसंस्कृतपणाची साक्ष त्याची अजून एक पदवी देते. त्याचा अर्थ आहे “वेदांवरची टीका व भाष्ये प्रकाशीत करणारा” असा आहे. या प्रकारच्या पदव्या घेतलेला राजा मला तरी दुसरा आढळला नाही. त्यामुळे हिंदूंची म्लेंच्छांपासून सुटका करणे एवढेच त्याचे काम नसून त्याने त्याच्या प्रजेच्या एकंदरीत सामाजीक उन्नतीची काळजी घेणे हेही त्याचे ध्येय असावे असे वाटते.
सामान्य लोकांना कल्पना नसते व शाळांतूनही इतिहास नीट शिकवला जात नाही त्यामुळे विजयनगरच्या साम्राज्यावर एकंदरीत चार राजवंशांनी राज्य केले हे माहीत नसते. खाली ही वंशावळ दिलेली आहे. यांच्या सनावळीबद्दल मलाच शंका आहे परंतू अंदाज येण्यासाठी या ठीक आहेत आणि मुख्य म्हणजे आपण त्यांचा इतिहास थोडक्यात बघतोय म्हणून यात अधिक खोल जाता येणार नाही.
पहिला राजवंश संगमा
हरिहरराय-१: १३३६-१३५६
बुक्कराय-१: १३५६-१३७७
हरिहरराय-२: १३७७-१४०४
विरूपाक्षराय: १४०४-१४०५
बुक्कराय-२: १४०५-१४०६
देवराय-१: १४०६-१४२२
देवराय-२: १४२४-१४४६
रामचंद्रराय: १४२२
वीरविजय बुक्कराय: १४२२-१४२४
देवराय-२: १४२४-१४४६
मल्लिकार्जूनराय: १४४६-१४६५
विरूपाक्षराय-२: १४६५-१४८५
सालुव घराणे.
नरसिंहदेवराय: १४८५-१४९१
तिम्मा भुपाला: १४९१
नरसिंहराय-१: १४९१-१५०५
तुलूव घराणे.
नरसानायक: १४९१-१५०३
वीरनरसिंहराय: १५०३-१५०९
कृष्णदेवराय: १५०९-१५२९
अच्युतदेवराय: १५२९-१५४२
सदाशिवराय: १५४२-१५७०
अरविदू घराणे
अलियरामराय: १५४२-१५६५
तुरूमलदेवराय: १५६५-१५७२
श्रीरंग-१: १५७२-१५८६
वेंकट-२: १५८६-१६१४
श्रीरंग-२: १६१४
रामदेव: १६१७-१६३२
वेंकट-३: १६३२-१६४२
श्रीरंग-३: १६४२-१६४६.
पहिला राजवंश – संगमा घराणे
या राजवंशाने विजयनगरवर साधारणपणे शंभरएक वर्षे राज्य केले असे समजले जाते. यांच्या कारकिर्दीत त्यांनी त्यांच्या उत्तरसीमेचे उत्तमप्रकारे संरक्षण केले व या दरम्यान त्यासाठी ज्या काही लढाया त्यांनी मुसलमानांबरोबर लढल्या, त्यातील दोन तीनच लढायांमधे त्यांना माघार घ्यावी लागली असेल. या युद्धातील विजयांमुळे हिंदू सैनिकांचा आत्मविश्वास इतका वाढला की दुसर्या देवरायाच्या काळात या राजांना मुसलमानांच्या आक्रमणाची फिकीर राहिली नाही. दक्षिणेकडे साम्राज्याचा विस्तार होऊन भरपूर महसूल गोळा होऊ लागला व लोककल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात आल्या. एकंदरीत शांतता व सुबत्ता व हिंदू पद्धतीप्रमाणे चांगल्या राजाचे एकछत्री अंमल असे सगळे चांगले वातावरण होते.
दुसऱ्या देवरायाच्या काळात अजून एक महत्वाची घटना घडली म्हणजे या राजाने समुद्राचे महत्व ओळखून त्यामार्गे होणार्या व्यापारावर लक्ष व अंकूश ठेवण्यासाठी लक्ष्मण नावाचा एक अधिकारी नेमला. याला पदवीच दक्षिण समुद्राचा स्वामी अशी दिली होती. पण दुर्दैवाने यावेळी व भविष्यात कधीही विजयनगरचे नौदल असल्याचा पुरावा नाही. बहुदा याचे काम समुद्रावरून येणार्या मालावरची जकात गोळा करण्याचे असावे. या राजवंशाने त्यांचा शेवटचा राजा दुसरा विरूपाक्ष सिंहासनावरून पदच्युत होई पर्यंत साम्राज्याची चांगलीच उभारणी केली.....