विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 6 March 2026

“बसरूर स्वारी”

 २२ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी १६६५...

बखरीतील जळपती सर्जा शिवछत्रपतींची,

“बसरूर स्वारी”....
🚩

इ.स.१६६५ च्या फेब्रुवारी महिन्यात शिवाजी महाराजांनी जो बेदनुरकरांच्या बार्सिलोर (बसरूर) बंदरावर आरमारी हल्ला चढवला, त्या मोहिमेची हकीकत सभासद नोंदणी करतो, पुढे बिदनुरी शिवाप्पा नाईक जगम होता, त्याचे शहर बसनुर (बसरूर) म्हणून थोर नामांकित चालले. दर्या किनारा, तिथे पाळती पाठवून पाळती आणून वरघाटे जाता मार्ग नाही म्हणून पाणियातील आपली जहाजे आणून सिद्ध करून, आपण राजा खास जहाजांत बसून जाऊन बसनुरास एकाएकी दिवस उगवतीला गेले. शहराचे लोक बेहुशार होते, एकाएकी जहाजातून उतरले, शहर मारिले. एक दिवस शहर लुटून फन्ना केला. जैसी सुरत मारून मालमत्ता आणली, त्याप्रमाणे बसनुरची मत्ता, अगणित माल, जडजवाहीर, कापड, जिन्नस घेऊन देशास आले. मत्ता सर्व पाहता दोन कोटी होनांची आणली...!

बसनुरची मोहीम फत्ते करून छत्रपती शिवाजी महाराज प्रथम गोकर्ण महाबळेश्वर येथे पोहचले, ४००० पायदळ आणि वाटेत लागणाऱ्या नद्या ओलांडण्यासाठी १२ छोट्या तरांडी सोबत घेत महाराज अंकोल्यास आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः हे ४००० पायदळ घेऊन कारवारकडे कूच केली. मराठा आरमार हे बसनुर मोहिमेत मिळालेली संपत्ती घेऊन २१ फेब्रुवारीच्या आधीच कारवार ओलांडून पुढे गेले होते. छत्रपती शिवाजी महाराज कारवारकडे निघाल्याची बातमी कळताच इंग्रज धास्तावले, काही व्यापाऱ्यांनी आपला माल, रोकड इतर चीजवस्तू मस्कतच्या इमामाच्या जहाजावर भरले. त्याच दिवशी म्हणजे २१ फेब्रुवारी १६६५ रोजी इंग्रजांच्या नशिबाने शेरखान हा बहलोलखानाच्या आईला मक्केच्या यात्रेला जाण्यासाठी गलबताची सोय करण्यासाठी कारवारला आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी २१ फेब्रुवारीला काळी नदी पार करून सदाशिवगड काबीज केला. अचानक कामा निमित्त आलेल्या शेरखानास छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनाची माहिती समजतास खानाने इंग्रजांना निरोप पाठवून खाडीचे रक्षण करण्यास सांगितले, आपल्या आत्मरक्षणाची व्यवस्था लावून शेरखानाने आपण कारवारला आलो आहोत आपण कारवार शहरातून जाऊ नये असा महाराजांना निरोप पाठवला...

छत्रपती शिवाजी महाराजांना काळी नदीच्या जवळच इंग्रजांची व कंगोदेशाची अशी दोन गलबते नांगरून पडलेली दिसली, ही गलबते आपल्या ताब्यात द्यावीत असा निरोप महाराजांनी शेरखान यास पाठवला. शेरखानाने महाराजांचा गलबत ताब्यात देण्याचा निरोप इंग्रजांकडे पाठवला असता इंग्रजांनी उद्दामपणे निरोप पाठवुन गलबते देण्यास नकार कळवला. इंग्रजांचा उर्मट निरोप पोहचात, त्यांनी कारवार भाग सोडण्यापूर्वी या इंग्रजांची गुर्मी उतरवण्याची ठरवले, महाराज आपले पुढे गेलेले आरमार बोलवतात की काय अशी भीती इंग्रज आणि शेरखानास वाटू लागली. शेरखानाने इंग्रजांची समजुत घातली आणि कारवारच्या व्यापाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नजराणा अर्पण करत १२२ पौंड खर्च म्हणून महाराजांकडे पाठवण्यात आला. या सगळ्या घटना घडलेल्या इतिहासात नोंद असलेल्या तारीख आहेत २१ आणि २२ फेब्रुवारी १६६५...

स्वराज्यावर मिर्जाराजे जयसिंग हा चालून येत आहे. हे समजतास छत्रपती शिवाजी महाराजांनी २३ फेब्रुवारी १६६५ रोजी कारवार सोडले...

―――――――――――――
#इतिहासकर्ते_मरहाट्टे #बसरुर_स्वारी
#छत्रपतीशिवाजीमहाराज #आरमार
#गडवाट #रणमार्तंड_मरहट्टे 

त्यागमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज

 


त्यागमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज 

🙏🏽🚩

छत्रपती शिवराय हे त्यागमूर्ती होते. त्यांनी त्यागाची परिसीमा गाठली होती. शिवरायांची त्याग करण्याची शक्ती अफाट होती, परंतु त्याचबरोबर त्यामध्ये सुसंगतता होती. आयुष्यात एकदाच कोणता तरी त्याग करून पुढचे संपूर्ण आयुष्य त्यांनी रयतेकढून सहानभूती मिळवली नाही तर जीवनाच्या प्रत्येक पाऊलावर त्यांनी फक्त त्यागच केला. अनंत त्याग केल्या शिवाय चांगली गोष्ट प्रत्यक्षात उतरत नाही. शिवरायांनी जर दुसरा मार्ग निवडला असता, ज्यामध्ये त्यांनी कोणत्यातरी त्यावेळच्या शासकाची चाकरी केली असती तर कदाचित ते खूप सुखी, समृद्ध व आरामदायी जीवन जगू शकले असते. परंतु, त्यांनी या सर्वांचा त्याग केला व दुसरा मार्ग स्वीकारला जो देश भक्तीकडे जात होता. शिवरायांबरोबर त्यांच्या प्रत्येक सहकाऱ्याने हीच भूमिका स्वीकारली. शिवरायांनी हा मार्ग स्वीकारला कारण त्यांना देशाला स्वतंत्र करून, देशाची महानता आणि स्वाभिमान टिकवायचा होता. शिवरायांच्या या कार्यामुळेच महाराष्ट्र स्वतंत्र झाला आणि त्याचबरोबर भारतातल्या इतर राज्यांना एक नवीन प्रेरणा मिळाली. पुढे ते म्हणतात, नुसताच आपल्या प्राचीन महानतेचं उदो-उदोकरून काहीच उपयोग नसतो, तर त्या महानतेला आधुनिक महानतेच्या प्रकाशाकडे घेऊन जाणे महत्वाचं असतं, कोणतीही परंपरा, संस्था, श्रद्धा, अंधश्रद्धा अशा गोष्टी जर देशाच्या प्रगतीपुढे आडव्या येत असतील तर त्या आपण बाजूला केल्या पाहिजेत. जे शिवरायांनी त्यावेळी केले, 'शिवरायांचा अभ्यास करत असताना जर आपण त्यांच्या जीवनाचे हे निष्कर्ष डोळ्यासमोर ठेवले तर तुम्ही व तुमचे राष्ट्र हे जगाच्या पातळीवर गेल्याशिवाय राहणार नाही'...

―――――――――――――
#इतिहासकर्ते_मरहाट्टे #छत्रपतीशिवाजीमहाराज
#गडवाटप्रवाससह्याद्रीचा #त्यागमुर्ती 

शिव छत्रपती स्वारी बसरुर.

 १६६५ रोजी, छत्रपती शिवाजी महाराजांची "बसरुर" मोहिमेची सुरुवात ज्या ठिकाणी झाली ते ठिकाण म्हणजे "मालोंड बंदर" 

🚩

छत्रपती शिवाजी महाराजांनी मालोंड या बंदर शहराची पाहणी केल्यानंतर या ठिकाणी तळ उभारला होता. केरळातील डच वखारी याच छत्रपतींच्या आरमाराने हल्ला करून फोडल्या होत्या. याची नोंद इतिहासामध्ये आहे. मालवण तालुक्यातील मसुरे गावाचा उल्लेख मसुरे नगरी असा व्हायचा. मसुरे गावातील मालोंड हे प्रसिद्ध बंदर होते. तत्कालीन बंदरपेठ म्हणून मालोंड बंदराचा मालती बंदर असादेखील उल्लेख केला जात असत. मालोंड पर्यंत येणारी नदी गडनदी या नावाने ओळखली जाते. तर पुढे ती मसुरे, रेवंडी, तोंडवळी असा प्रवास करत कालावल खाडीच्या रूपाने सर्जेकोट येथे अरबी समुद्रास मिळते. त्यामुळे मसुरे ते सर्जेकोटपर्यंतच्या दोन्ही किनाऱ्यावर तयार होणाऱ्या मालाचे विक्रीकेंद्र म्हणून मालोंडला बाजारपेठेचे स्वरूप होते.

● शिवाजी महाराज मालोंड गावचे पाटील यांच्याशी संवाद साधताना :
“राजे पराडकर आल्याती..”
मालोंड गावचे पाटील असणाऱ्या पराडकरांनी येत राजांची भेट घेतली. राजे दोन दिवसांपूर्वीच गावी आले होते. परंतु गावचा पाटील काही कारणाने गावात नसल्याने त्यांना जशी बातमी मिळाली तसे येऊन भेटत पाटलांनी आपली औपचारिकता पूर्ण केली.

"आम्ही बाहेर येतो.."
राजे स्वतः उठत पाटलांना भेटण्यासाठी आपल्या शामियान्याच्या बाहेर आले. पाटील म्हणजे पिकलं पान. त्यांच्या वडीलकीचा साऱ्या मालोंडला आधार होता. साऱ्यांशी प्रेमाने आपुलकीने वागणे, व्यवहारिकपणाही तितकाच चोख, गावातील तटे जातीने लक्ष देऊन सोडवणे, आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांतून चांगला संबंध असल्याने पराडकर सोयरिकी जुळवायची कामे एक जबाबदारी म्हणून पार पाडत असत. अगदी घाटावर जाऊन लोकांच्या सोयरिकी यांनी जुळवल्या होत्या. आताही पाटील जागेवर नसण्याचे कारण एका सोयरीकीचेच होते.

“राजे आपल्या येण्याने आमचा गाव, आमची पांढरी, अगदी धन्य झाली बघा. तेवढा मीच एक कमनशीबी ज्याला राजांचे हे दर्शन काहीसे उशिरा झाले. "
“पाटील आम्ही यायच्या आधीच तुम्ही गावातून गेले असल्याचे समजले होते आम्हाला, त्यामुळे आमची काही तुम्हावर खफा मर्जी नाही” राजे आता तुम्ही राज्यकर्ते. स्वाऱ्या, मोहिमा यामुळे तुमच्या येण्याजाण्या विषयी तुम्हाला गुप्तता पाळणे तसे स्वाभाविकच आहे; पण तरीही आज हेच वाटतेय की तुमच्या येण्याची आम्हाला वर्दी मिळाली असती तर आम्ही तुमचे तसे मनाजोगं स्वागत करू शकलो असतो. तुमचा चिंतामणी येऊन भेटला आम्हाला पाटील, त्याने आमचा अगदी व्यवस्थित पाहुणचार केलाय...

राजे आपण खरंच आमच्यावर रागावला नाहीत ना ! हवं तर पाय धरतो तुमचे..! अहो हे काय करताय बाबा. आम्ही राजे असलो तरी तुमच्या सारख्या वयस्कर माणसाने पाया पडणे योग्य नाही, आणि आमच्या प्रजेचे फक्त मुजरे आणि सत्कार स्वीकारण्यासाठी का आम्ही हा स्वराज्याचा पसारा वाढवलाय...

नाही राजे असे नाही, पण आपण स्वत:च उठून बाहेर आलात अन् आमच्या काळजात धस्स झाले. “अहो तुमच्यासाठीच आम्ही उठून आलोय खास, तुमच्या कामाची आम्ही चांगलीच तारीफ ऐकली आहे..”
राजं एवढा बहुमान तुम्ही आम्हाला देऊन आमच्या साऱ्या आयुष्याचेच सोने केलं जी, आम्हाला फक्त आता आज्ञा करा राजे, आम्ही आपल्यासाठी काय करू तरी काय..?

'आम्हाला तुमचा गाव दाखवा पराडकर'...
राजांचे हे मागणे ऐकून म्हातारं काहीसे चकित झाले. नक्की आपण काही चुकीचे तर ऐकले नाही ना, असा पाटलाला प्रश्न पडला. महाराजांच्या सांगण्या बरहुकूम पाटलांनी मालोंड गाव आणि आजूबाजूचा परिसर दाखवायला सुरुवात केली. मालोंड-मालडी या दोन्ही नावांनी ओळखला जाणाऱ्या या गावाला नदीच्या प्रवाहाने थोरले अन् धाकटेपण दिले. मालवण तालुक्यातील मसुरे गावचा जुना उल्लेख मसुरे नगरी असा व्हायचा अन् या मसुरे गावचे हे मालोंड प्रमुख बंदर होय. कोकणात पूर्वापार चालत आलेल्या नासवण्याच्या बाटवण्याच्या शापानेच माणसांचे जोर जबरदस्ती जात, धर्म, पंथ बदलले गेले, अन् एका मोठ्यां गावात एकदिलाने राहणारी ही मंडळी वर्णभेदाने, जातीभेदाने लांबून वाड्या-वस्त्या निर्माण झाल्या, तर कुठे धर्मवादाने नव्या वाड्या उदयाला आल्या. पुढे गावाची गावकी मोडलेल्या या कारभारातून असंख्य वाड्यांचीच स्वतंत्र गावे निर्माण झाली...

त्यामुळे कधी कुठल्या काळी एक नाव असलेल्या गावाची अशा धर्मांतर, युद्ध, वा आणखी एखाद्या मोठ्या प्रसंगातून वेगवेगळी नावे पडल्याचे लक्षात येते. मसुऱ्याच्या या बंदराला कधी काळी मालती बंदर म्हणूनही ओळखले जात असे. याच मालती शब्दाचा नको तो अपभ्रंश होऊन मालडी हे नाव पुढे आले असल्याचाही एक मतप्रवाह आहे. या बंदराच्या काठाने पूर्वी वाणी समाजाची मोठी वस्ती होती, त्यामुळे याला साधूवाण्याचे बंदर म्हणूनही संबोधले जात. (सत्यनारायण कथेतील साधूवाण्याचे बंदर ते हेच.) तळाशीलच्या खाडीपासून सह्याद्री पर्वतापर्यंतच्या सर्व गावांना माल पुरवणारे प्रमुख केंद्र म्हणून या बंदराचा सर्व व्यापारी वर्गात चांगलाच बोलबाला झाला होता. मालोंड बंदरात असंख्य व्यापाऱ्यांचा दिवस रात्र असणारा राबता, ही तशी नित्याचीच बाब होऊन बसली होती. घाटावर उगम पावणाऱ्या गडनदीचा तसा प्रवास हा मोठाच. त्यात तिला रेवंडी, तोंडवळी, मसुरे अशा अनेक उपनद्या येऊन मिळतात. कालावल खाडीच्या येथे ही नदी समुद्रास जाऊन मिळते...

हे गाव जसे नदी आणि बंदरामुळे लोकांच्या परिचयाचे असले तरी गावचे जुनेपण अगदी आदीमानवापासून अबाधित आहे. मसुरे, डांगमोडे, मालोंड, बेलाचीवाडी इथल्या उंच माळ रानावर, सड्यावरील कातळावर बरीच जुनी कातळीशल्प आढळून येतात. त्यामुळे माणसाच्या उत्पत्तीदरम्यानच्या ज्या गोष्टी आपणास ठाऊक आहे त्या पद्धतीने या गडनदीच्या काठानेही एक मानवी संस्कृती इथे नांदत असल्याच्या खुणा आहेत. नदीच्या उतारामुळे त्या काळीसुद्धा इथे मानवी वस्ती वास्तव्य करत असल्याचा संभव अधिक आहे. स्वराज्यात सामील होण्याआधी इथे आदिलशाही अंमल अस्तित्वात होता; परंतु शिवाजीराजांनी ज्या पद्धतीने कोकण घुसळून काढले. त्यामुळे १६६५ च्या काही काळ आधीपासून इथे असलेला सुलतानी अंमल नष्ट झाला आणि ही मोक्याची जागा अलगद मराठ्यांच्या हाती येऊन पडली...

गडनदीच्या काठाने वसलेल्या या गावाचे भौगोलिक महत्त्व तसे विशेष होते. दोन्ही किनाऱ्यावर होणाऱ्या मालाचे विक्री केंद्र म्हणून मालोंडला दुमदार बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गडनदीचे हे पात्र खोल असल्याने या बंदरामध्ये अरबी समुद्रातून खुश्कीच्या मार्गाने अगदी आखातापर्यंत व्यापारी मालाची ने-आण सुरू असायची. धाकट्या मालडीकडे नैसर्गिक थांब्याची सोय जास्त चांगल्या प्रकारची असल्याने त्या बाजूला तारव्या- तराफ्यापासून विविध नौकांचा राबता जास्त असायचा तर थोरल्या बाजूला गाव वसे. यातही अनेक व्यापाऱ्यांनी इथे आपली घरे, माल साठवणुकीसाठी छोटेखानी बांधकाम केले होते. इथे उतरवला जाणारा माल बैलगाडी, ओझी वाहणारी गाढवं, खच्चड यांच्या साहाय्याने फोंडा, रामगड पेठ, बिडवाडी पेठ, खारेपाटण असा सर्वत्र पोचवला जात तर घाट चढून जाण्यासाठी वाहतुकीच्या जनावरांसह हमाल लोकांवरच सारी भिस्त असे...

मालोंडच्या निसर्ग संपन्नेत भर घालण्याचे काम हे या गड नदीने केले असले तरी, अनेक घटकांमधील ती नदी एक घटक आहे असे म्हणावे लागेल. एका बाजूला भिंतीसारखा सरळसोट भव्य, बारामाही हिरवागार असणारा दरडीचा डोंगर, या डोंगराला सरळ जाऊन धडकतच नदी आपला प्रवाह डाव्या बाजूला काइळ गावाच्या दिशेने वळवते, त्यामुळे इथले वातावरण हे नेहमीच हिरवेगार भासते. दुसऱ्या बाजूला असणारी डोंगरासारखीच असणारी, लाल दगडाची काप. या कापाच्या आधारानेच थोरली मालडी विसावली आहे. तर मालडीच्या तिसऱ्या बाजूस भटवाडी निवांतपणे विसावली आहे. सगळीकडून भरगच्च रान माजले असल्याने या ठिकाणी रानात भेकरे, रानडुक्कर, ससे, लाव्हे, असे बरेच प्राणी आढळतात. नदी, डोंगर यासह निसर्गाच्या किमयेतून इथे अस्तित्वास आलेल्या समृद्ध बंदरामुळे इथले वातावरण काही वेगळेच होते. शेतकामासह बंदरात येणारे मोठमोठे पाडाव खाली करण्याच्या कामातून इथल्या नागरिकांना तसा चांगला रोजगार मिळत असे. व्यापारी मालाच्या ने-आणीतून हे बंदर रात्रभर माणसांनी भरलेलं असतं. आणि यामुळेच मालडी रात्रभर जागीच असते असे सांगितले जाते...

शिवकाळात बंदरे ही मुख्य किनाऱ्यापासून तशी आतच असत कारण वाऱ्याच्या तडाख्यापासून, समुद्राचा रुद्रावतार व चाचांच्या उपद्रवापासून बंदराचे रक्षण व्हावे व जमिनीवरील सैन्याची मदत बंदराच्या रक्षणार्थ व्हावी, हा मुख्य हेतू होता. हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावरील हिंदू काळातील सर्व बंदरे भौगोलिक दृष्ट्या अशीच आत वसलेली होती. खंबायत, भडोच, सुरत, गणदेवी, सुपारी ठाणे, नागोठणे, चौल, राजापुरी, महाड, चिपळूण, संगमेश्वर, साठवली, राजापूर, खारेपाटण, ताम्हणे, मालवण, गोवे ही बंदरे अशीच वसवली होती. समुद्राच्या भरतीचे पाणी जिथपर्यंत आत तारवे आणू शकेल तीच बंदरांची जागा ठरे. काठांवरील बंदरे ही पाश्चात्यांनी स्थापन केली व भरभराटीस आणली. महासागरातून सफर करणारी त्यांची मोठाली जहाजे, काठांजवळील खोल पाण्यातच थांबण्यासारखी होती...

या बंदरांपासून देशावर सह्याद्रीच्या घाटवाटांतून जनावरांच्या पाठीवर माल वाहून नेला जाई. परदेशाहून येणारा माल कोकणातील स्थानिक याच रीतीने हिंदुस्थानात दूरवर घेऊन जात व सर्वत्र फैलावत. राजधान्यांची मुख्य शहरे राज्यातील मुख्य बंदरांना जोडलेली असत. सुरतेचा माल खानदेशात, कल्याणकडील वाहतूक नाशिककडे, चौलास उतरणारा माल जुन्नर व तेथून अहिल्यानगर छ.संभाजीनगर असा पुढे जात असे. मध्ययुगीन चौल बंदरात उतरवणारा माल अष्टमी, पाली वगैरे गावांवरून कुवारी गडाजवळील शहापूर पेठेच्या मार्गाने पवनेच्या खोऱ्यातून तवेगावजवळ पोहोचून इंद्रायणी ओलांडून इंदुरी, नऊलाख उंबरे, कडूस, घोडे, या गावांवरून जुन्नरास जाई व तेथून अहिल्यानगरास व पुढे बेदरासही पोहोचे...

महाडपर्यंत तारव्यातून येणारा माल वरंधा व पार घाटाने नीरा व भीमेच्या खोऱ्यातून पंढरपूर, सोलापूर, विजापूरपर्यंत पोहोचे. तीच गोष्ट चिपळूणवरून कराडास जाणाऱ्या मालाची. राजापूर बंदराचा अनुस्कुरा घाटाने कोल्हापूर, मिरज, अथणी व तेथून पुढे विजापूरपर्यंत वाहतूक केली जाई. खारेपाटण बंदरातून फोंडा घाटाने निपाणी, रायबाग, या मार्गाने कृष्णेच्या दक्षिणेकडील प्रदेशांत मालाचा पुरवठा होई. मालवण बंदरातून नरडाव्याच्या घाटानी, पाडगाव, गारगोटी या कोल्हापूरच्या दक्षिणेकडील भागात माल पोहोचे. वेंगुर्ल्याहून बेळगाव, सापगाव, धारवाड, हुबळी, गदग, कोपळपर्यंत व्यापार होई...

वर उल्लेखलेल्या या बंदरांतूनच परदेशी माणसे आपल्या बंदुकीच्या दारूस आवश्यक असा ‘सोरा' हे खनिज, कापड, सूत व मसाल्याचे पदार्थ मुख्यतः आपल्या देशांत नेत तर कोकणातून देशावर जाणारा आवश्यक माल म्हणजे मीठ, कोकम, सुंभ, नारळ, सुपारी व परदेशांतील खजूर, खारीक, बदाम, बेदाणे, हींग व निरनिराळे धातू होय. हा माल आपल्याच बंदरातून व घाटातून वर जाऊन आपल्या जकातीचे उत्पन्न वाढावे याकरिता दुसऱ्या राजसत्तेच्या अखत्यारीत असणाऱ्या घाट रस्त्यावर सातत्याने काही ना काही तंटे बखेडे, लूटमारसदृश घटना घडत. यामुळेच मराठ्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या घाटवाटांतून बराच माल वर चढत असे...

:

शिव छत्रपती स्वारी बसरुर.

―――――――――――――
#इतिहासकर्ते_मरहाट्टे #बसरुर #मालोंड_बंदर
#छत्रपतीशिवाजीमहाराज #आरमार
#गडवाट #रणमार्तंड_मरहट्टे #स्वारी_बसरुर

२३ फेब्रुवारी १७३९ “किल्ले रेवदंडा”..

 


२३ फेब्रुवारी १७३९ “किल्ले रेवदंडा”...

🚩
एक डच आरमार फेब्रुवारी १७३९ मधे गोव्याजवळ आले होते. व्हॉईसरॉयने रेवदंडा डच सत्तेला देण्यास कबूल केले व मराठ्यांविरुद्ध मदत मागितली. पण डच नी नकार दिला. मानाजी आंग्रे यांनी २३ फेब्रुवारी १७३९ रोजी रेवदांड्यावर झडप घातली. मोर्चे लावले ते पोर्तुगीजांना भारी पडले व उडवून लावले पण मानाजी आंग्रे ह्यांनी जिद्द काही सोडली नाही. उलट एप्रिल १७३७ मधे रेवदांडा पडकोट जिंकला व स्वराज्यात आणला आणि मराठ्यांचे वर्चस्व चालू ठेवले. हे बघून पोर्तुगीज सत्ता कमजोर झाली व त्यांनी पार वसईच्या शरणागती नतंर हयातीत ठेवलेले किल्ले होते फक्त दिव दमण...
२५ नोव्हेंबर १७४० रोजी तहानुसार मराठ्यांनी पोर्तुगीजांना कुंकळली व असोळणे हि साष्टीतील दोन गावे दिली आणि त्याबद्दल पोर्तुगीजांकडून रेवदांडा कोट ( चौल ) व कोरलाई किल्ला ( castle curlew ) हे समोरा समोर चे दोन किल्ले स्वराज्यात परत शामिल करून घेतले...
१९ डिसेंबर रोजी चिमणाजी बल्लाळ प्रधान रेवदांड्यावर वर्चस्व गाजवायचे म्हणून निशाण चढविले पण आंग्रे घराणं हे समुद्रावरची शिवरायांची स्वाभिमानी मराठा सत्ता असून पेशव्यांचे वर्चस्व समुद्र किनाऱ्यावर त्यांना नको होते.. (रेवदांडा व कोरलाई किल्ले हे माझे किल्ले आहेत आणि आपण श्रीमंतास एकंदर देत नाही आणि आयुष्यात कधी देणार हि नाही त्यामुळे आम्ही स्वता सर्वस्वास उदक घातले आहे) अशी पवित्रा आंग्रेंनी घेतला.. हा आंग्रे घराण्याचा दरारा कुठल्या हि समुद्रावर हुकूमत चालू करणाऱ्या सत्तेला भारी पडला पण दुसरे बाजीराव पेशवे परत रेवदांडा घेण्यास तय्यार झालेले तरीपण त्यांना किल्ला हासील झाला नाही १८०६ मधे परत इंग्रजांच्या ताब्यात येत असताना आंग्रे ह्यांना मोहिमेवर असलेलं कळालं तेव्हा त्यांनी पुन्हा झडप घालून इंग्रज कापले व १८१७ पर्यंत स्वराज्यात आणला आंग्रे ह्यांनी तेव्हा लगेच गोपाळ शेणवी यांना रेवदांडा व कोरलाई ह्याचे सुभेदार पद दिले....
(दुर्ग- सतीश अक्कलकोट).
――――――――――――
📷 @animeshkshatriya ♥️🔥

छत्रपतीसंभाजीमहाराज

 १६८९ च्या फेब्रुवारी महिन्यात संभाजी महाराज मुघलांच्या हाती लागले. छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेसाठी आलेल्या औरंगजेबाच्या हाती पहिले काही वर्ष काहीच लागले नव्हते. पण आदिलशाही आणि कुतुबशाही बुडवल्यावर मात्र त्याची हालचाल वाढली. याची खबर संभाजी महाराज व मुघल दोघांवर लक्ष ठेऊन असलेल्या इंग्रजांना लागली...


● त्याबाबत मद्रासहुन इंग्रज लंडनला लिहितात,
"संभाजीराजेंला मदत करणाऱ्या दोन्हीही शाह्यांचा नाश केल्यानंतर आता आपल्यावर येणाऱ्या संकटाला कसे तोंड द्यावे या विवंचनेत संभाजीराजे सध्या तयारीत गुंतलेले आहे. मुघलांच्या छावणीतून भगवानदास नावाचा एक ब्राम्हण इथे आला आहे. तो म्हणतोय की औरंगजेब संभाजीराजेंला जीवंत पकडण्याची भाषा करतो आहे." दोन शाह्या बुडवण्याचं मोठं यश हाती लागलेल्या औरंगजेबाचा आत्मविश्वास दुणावला असणार एवढं नक्की. दोन्ही शाह्या जिंकल्यानंतर औरंगजेबाने त्याची सगळी ताकद संभाजी महाराजांच्या शोधासाठी लावलेली असणार. मुकर्रबखानाला संभाजी महाराजांची माहिती औरंगजेबाने पेरलेल्या हेरांनी दिली असण्याची जास्त शक्यता आहे...

कारण औरंगजेब त्याचा अधिकारी असदखान याला लिहितो,
"ज्याला तू पन्हाळा घ्यायची जबाबदारी दिली आहेत त्या मुकर्रबखानाला माझे आदेश कळव की 'त्या जमीनदारला लवकर कैद कर'. तू त्याला लिही की सध्या तो घमेंडी जमीनदार एकटाच रायगडाहून खेळण्याला गेला आहे. तो त्याच्या नातेवाईकांचे वाद मिटवण्यासाठी जात आहे. तिथे त्याला पकडून मुस्लिमांवर अन्याय करणाऱ्याचा बदला घे." यावरून असे लक्षात येईल की खुद्द औरंगजेब त्याच्या हेरांमार्फत संभाजी महाराजांवर लक्ष ठेऊन होता...

―――――――――――――
#इतिहासकर्ते_मरहाट्टे #

छत्रपतीसंभाजीमहाराज

#बलिदान_मास #११मार्च_वढू_तुळापूर
#गडवाटप्रवाससह्याद्रीचा #रणमार्तंड_मरहट्टे 

छत्रपती थोरले शाहू महाराजांची मदत आणि इंग्रज पराभूत.

 


छत्रपती थोरले शाहू महाराजांची मदत आणि इंग्रज पराभूत...


शत्रूंच्या वरील हालचाली कान्होजींना कळत होत्या. त्यादृष्टीने त्यांचीही तयारी चालू होती. त्यांनी पोर्तुगीजांना पत्र पाठवून आपण तडजोड करावी असा प्रयत्न केला. त्याच वेळी साताऱ्याला शाहू महाराजांना मदत पाठवावी अशी विनंती केली. त्यानुसार महाराजांनी लगेच १५०० घोडदळ पिलाजी जाधवांच्या नेतृत्वाखाली पाठविले. तोवर अलिबागवर चालून गेलेल्या शत्रूवर पिलाजींनी एवढ्या त्वेषाने हल्ला केला की, त्यात शत्रूची फार मोठी जीवहानी झाली आणि त्यांना माघार घ्यावी लागली. पिलाजींच्या या पराक्रमावर संतोष होऊन महाराजांनी त्याबद्दल त्यांना नंतर ४ नोव्हेंबर १७२२ रोजी काही प्रदेशाची जहागिरी दिली. इंग्रजांना मराठ्यांनी याप्रमाणे शह दिला. पोर्तुगीज गव्हर्नर आजारी पडला. १६ डिसेंबर १७२१ त्याला परतावे लागले. शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली ६००० घोडदळ कान्होजींच्या मदतीस पाठविले. त्यामुळे मराठ्यांचा उत्साह व बळ वाढले. सागरावर कान्होजी सक्षम होते. आता बाजीराव या प्रसिद्ध योद्ध्यामुळे भूभागावरून शत्रूवर सर्व प्रकारे तीव्र प्रतिकार सुरू झाला. मराठ्यांच्या तोफांनी शत्रूची दाणादाण उडवून दिली. त्यादरम्यान शाहू महाराजांच्या संमतीने बाजीरावाने पोर्तुगीजांकडे तहाची बोलणी सुरू केली. मराठ्यांचे सामर्थ्यं पाहून आणि पंधरा दिवसांच्या अनुभवाने गव्हर्नर पूर्ण हतबल झाला होता. त्याने पेशव्यांचा प्रस्ताव लगेच मान्य केला. २९ डिसेंबरला तह मान्य झाला. सरदेसाई ९ जानेवारी १७२२ अशी तारीख देतात. बाजीराव व कान्होजी यांनी मान्यता दिली. पोर्तुगीजांनी युद्ध संपवले. दुसऱ्या दिवशी ३० डिसेंबर १७२१ रोजी इंग्रजांची वरील चार जहाजे, सैन्य, अपयश पदरी घेऊन मुंबईला परतले. हे होते सामर्थ्य मराठ्यांचे आणि हा होता शाहूकालीन मराठा आरमाराचा विकास. इंग्रज हे पोर्तुगीजांसमवेत मोहिमेत होते. म्हणून हा तह संमतीसाठी मुंबईला पाठविला. पण, तह अमान्य केला. त्यांच्या पुरता विषय संपला...

● यानंतर शाहू महाराज असेपर्यंत इंग्रजांनी आंग्रेविरुद्ध कसलीही हालचाल केली नाही. १७१५ ते १७२२ ही ब्रूनची कारकीर्द अपयशाने संपली. त्याच्याबद्दलचे मूल्यमापन या शब्दात केले आहे,
"The net result of Boone's excessive zeal and industry was that at the end of his tenure of office the East India Company's stock had slumped for lower than it had been upon his arrival..."

इंग्रजांविरुद्धचा संघर्ष चालू असताना अखेरच्या काळात मराठा सत्तेला बसलेला धक्का म्हणजे कर्तबगार, मुत्सद्दी पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे निधन होय. कान्होजी आंग्रे यांना फार दुःख झाले, कारण त्या दोघांची एकमेकांना मोलाची साथ मिळाली होती. कान्होजींना शाहू महाराजांच्या बाजूला घेऊन एक प्रकारे मराठा साम्राज्याच्या निर्मितीत सामील करून घेण्याचे श्रेय मोठ्या प्रमाणात बाळाजीस जाते. त्यांच्या नंतर त्यांचा कर्तबगार मुलगा बाजीराव पेशवा याने इंग्रजांचा पराभव करून संकट संपविण्यात वाटा उचलला होता. जरी या मोहिमेत अपयश आले होते तरी इंग्रजांनी आपले आरमारी बळ वाढविण्याकडे लक्ष कायम ठेवले होते. त्यासंबंधीचे काही संदर्भ देत आहोत. ७ जून १७२२ रोजी फोर्ट सेंट जॉर्जहून मुंबईच्या गव्हर्नरला पत्र पाठवून माहीम नदीत पोर्तुगीज व आंग्रेंविरुद्ध केलेल्या संघर्षाबद्दल अभिनंदन केले होते. प्रत्यक्ष आंग्रेविरुद्ध त्यांनी संघर्ष केला नाही, पण तयारी चालू होती. त्यांचे प्रत्यंतर या पत्रातून मिळते. १ ऑक्टोबर १७२२ रोजी सुरतहून मुंबईला कळविले होते की, ‘आंग्रेविरुद्ध लढण्यासाठी सुरत येथे गलबते बनवली आहेत...'

आंग्रेविरुद्ध अपयशाचे कारण कंपनीने मुंबईला सांगितल्या नुसार आंग्रेचे आरमार प्रबळ होते हे मान्य केले आहे. म्हणून यापुढे आपले बळ वाढविण्यासाठी इंग्लंडहून १७२८ साली ‘प्रिन्सेस कॅरोलीन' हे प्रबळ जहाज पाठविले. १७३० साली ‘किंग जॉर्ज’ व ‘प्रिन्स ऑफ वेल्स' ही अधिक प्रबळ दोन जहाजे पाठविली. दरवर्षी एक 'गार्डशिप' पाठवण्याचाही निर्णय घेतला...

―――――――――――――
#इतिहासकर्ते_मरहाट्टे #छत्रपतीशाहूमहाराज
#रणमार्तंड_मरहाट्टे #गडवाटप्रवाससह्याद्रीचा 

“बसरूर स्वारी”

  २२ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी १६६५... बखरीतील जळपती सर्जा शिवछत्रपतींची, “बसरूर स्वारी”.... इ.स.१६६५ च्या फेब्रुवारी महिन्यात शिवाजी महार...